20-25 आजी-माजी नगरसेवक करणार शिंदे गटात प्रवेश | पदाधिकाऱ्यांचाही समावेश
दोन दिग्गज नेते अन आजी-माजी नगरसेवकांचा प्रवेश होणार ः जाधव
सुनील चोभे | नगर सह्याद्री:-
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील पदाधिकारी संपर्कात आहेत. जिल्ह्यातील दोन दिग्गज नेते प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. शनिवारी उपमुख्यमंत्री शिंदे यांची नगरसेवकांसह भेट घेतली आहे. येत्या 29 जानेवारीला नगरसेवक व पदाधिकाऱ्यांच्या पक्ष प्रवेशाचे नियोजन सुरू असल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख सचिन जाधव यांनी ‘नगर सह्याद्री’शी बोलताना दिली.
विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. नुकतेच छत्रपती संभाजीनगर येथे 35 स्थानिक नेत्यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यातच आता अहिल्यानगर शहरामध्ये 20-25 आजी माजी नगरसेवक व काही पदाधिकारी पुढील आठवड्यात 29 जानेवारीला ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळत आहे. त्यास अहिल्यानगरमधील शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून दुजोरा देण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला चांगले यश मिळाले आहे. तसेच आगामी एप्रिल मे महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे. त्यामुळे महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या अनुषंगाने अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील दिग्गजांनी सत्ताधारी पक्षांची वाट धरली आहे. त्यातच शिवसेना ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत उमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पवेश करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. शिंदे गटात प्रवेश घडवून आणण्यासाठी जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, शहरप्रमुख सचिन जाधव यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांसह
नेत्यांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. 6 जानेवारी रोजी माजी शहरप्रमुख दिलीप सातपुते यांची घरवापसी झाली. तसेच दत्ता जाधव, दीपक खैरे, प्रशांतगायकवाड यांनी शिंदे गटात प्रवेश केला.
दरम्यान, 18 जानेवारी रोजी शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम, संजय शेंडगे, बाळासाहेब बोराटे, सचिन शिंदे, संतोष गेनप्पा, श्याम नळकांडे, परेश लोखंडे, संग्राम कोतकर यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाणे येथे भेट घेतली. नगरमधील 20-25 आजी-माजी ठाकरे गटाचे नगरसेवक शिंदे गटात जानेवारीच्या अखेरीस प्रवेश करतील अशी खात्रीशीर माहिती मिळत आहे.
18 जानेवारीला घेतली उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत यश मिळाले आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील राज्यातील अनेक मातब्बरांनी महायुतीची वाट धरली आहे. राज्यात ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. छत्रपती संभाजीनगर पाठोपाठ आता अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाला मोठे खिंडार पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यासाठीच शनिवार 18 जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाकरे गटाचे शहरप्रमुख यांच्यासह नऊ दिग्गज नगरसेवकांनी भेट घेतली. तसेच प्रक्षप्रवेशाबाबत चर्चा केली असल्याची माहिती आहे.