सुपा | नगर सह्याद्री
बऱ्याच दिवसांच्या शांततेनंतर पारनेर शहराला लागून असलेल्या लोणी रोड परिसरात तुरीच्या शेतात पुन्हा एकदा बिबट्याच्या दर्शनाने मोठी खळबळ उडाली आहे. शहराच्या अगदी जवळ असलेल्या या भागातील कार्ले यांच्या मालकीच्या तुरीच्या वावरात दि. 22 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास परिसरातील नागरिकांना बिबट्याचे स्पष्टपणे दर्शन झाले. या अनपेक्षित घटनेमुळे संपूर्ण परिसरात पुन्हा एकदा भीतीचे गडद वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लोणी रोडवरील शेत वस्तीच्या जवळच असलेल्या कार्ले यांच्या शेतातील तुरीचे पीक सध्या वाढलेले आहे. तुरीचे उंच आणि दाट पीक असल्याने बिबट्याला लपण्यासाठी सुरक्षित जागा मिळाली आहे. दि. 22 रोजी रात्री 9 च्या दरम्यान काही स्थानिक नागरिक या भागातून जात असताना त्यांना अचानक वावराच्या कडेला बिबट्या निदर्शनास आला. रात्रीच्या अंधारात बिबट्याचे मोठे डोळे चमकताना पाहिल्यानंतर नागरिकांनी तत्काळ आरडाओरड करून तेथून पळ काढला. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरली आणि संपूर्ण लोणी रोड परिसर तसेच परिसराच्या आजूबाजूच्या वस्त्यांमध्ये दहशतीचे सावट पसरले.
या घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण अधिक वाढले आहे, कारण याच परिसरात काही महिन्यांपूव शैलेंद्र औटी यांच्या अंगणात बिबट्या दिसल्याची घटना ताजी आहे. बिबट्या सातत्याने मानवी वस्तीच्या आणि शहराच्या अगदी जवळच्या भागात वावरत असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. नैसर्गिक अधिवास कमी झाल्यामुळे किंवा भक्ष्याच्या शोधात हे वन्यजीव शहरालगतच्या शेतीत आश्रय घेत असल्याचे दिसून येते. रात्रीच्या वेळी पाण्याच्या शोधात किंवा पाळीव प्राण्यांच्या (कुत्री, शेळ्या) शोधात बिबट्या मानवी वस्तीत घुसण्याची शक्यता अधिक असल्याने, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
बिबट्याच्या या वावरामुळे परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारावर थेट परिणाम होत आहे. भीतीपोटी नागरिक सायंकाळी 7 वाजल्यानंतर घराबाहेर पडणे पूर्णपणे टाळत आहेत. रस्त्यावर पूर्णपणे शुकशुकाट पसरत आहे. शेतकरी वर्गाला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. सध्या रब्बी हंगामाची कामे सुरू आहेत. अनेक शेतकऱ्यांचे शेतातील पंप रात्रीच्या वेळी सुरू असतात, त्यांना पाणी देण्यासाठी शेतात जावे लागते. तसेच दुग्ध व्यवसाय करणाऱ्या नागरिकांना जनावरांना चारा आणि पाणी देण्यासाठी रात्रीच्या वेळी शेतावर जावे लागते. मात्र, बिबट्याच्या भीतीमुळे ही कामे पूर्णपणे थांबली आहेत.स्थानिक रहिवासी सांगतात, दिवसा तर काम करणे शक्य आहे, पण रात्रीच्या वेळेस भीतीमुळे घराबाहेर पडणेही शक्य होत नाही. वन विभागाने या बिबट्याला पकडण्यासाठी तातडीने पिंजरा लावावा, अन्यथा कोणतीही मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वन विभागाने कार्यवाही करावी
या बिबट्याच्या दर्शनानंतर तातडीने वन विभागाने घटनास्थळी भेट देऊन परिसराची पाहणी करणे आवश्यक आहे. तुरीच्या वावरात बिबट्या तळ ठोकून राहण्याची शक्यता असल्याने वन विभागाने आवश्यकतेनुसार पिंजरा लावण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरू करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.



