अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
नागरी वस्तीमध्ये वन्य प्राण्यांचा वावर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यामुळे बिबट्याच्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली असून, पुन्हा एक हृदयद्रावक घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील देवठाण गावात घडली आहे. अंगणात खेळत असलेल्या तीन वर्षीय चिमुकलीवर बिबट्याने झडप घालत तिला उचलून नेले. यामध्ये तिचा दुर्दैवी मृत्यू झाला असून परिसरात भीतीचे व वातावरण आहे.
प्राप्त माहितीनुसार, देवठाण येथील शेळके वस्तीमध्ये काल (१४ ऑक्टोबर) सायंकाळी कविता लहानु गांगड (वय ३) ही बालिका घराच्या अंगणात खेळत होती. यावेळी अचानक बिबट्याने तिच्यावर हल्ला चढवला व तिला उचलून ऊसाच्या शेतात घेऊन गेला. काही वेळातच गावकऱ्यांच्या लक्षात हा प्रकार आला.
त्यांनी आरडाओरड करत बिबट्याचा पाठलाग केला, मात्र तो उसाच्या दाट शेतात पसार झाला. शोधमोहीम राबवल्यानंतर, सुमारे ३०० मीटर अंतरावरील उसाच्या शेतात कविताचा मृतदेह आढळून आला. हे दृश्य पाहून आईने आक्रोश केला. संपूर्ण वस्तीमध्ये शोककळा पसरली असून नागरिक भयभीत झाले आहेत.
विशेष म्हणजे, याच देवठाण गावात मे महिन्यातही बिबट्याच्या हल्ल्यात विठावाई काळे (वय ५७) यांचा मृत्यू झाला होता. पुन्हा एकदा अशी दुर्दैवी घटना घडल्याने वनविभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे गावकऱ्यांनी वनविभागाकडे नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करण्याची तीव्र मागणी केली असून, पुढे अशी जीवितहानी टाळण्यासाठी तातडीची कारवाई होणे अत्यावश्यक आहे.