Kunal Kamra : लोकप्रिय स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेवर (शिंदे) विडंबनात्मक कविता सादर केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. तर, शिंदेंच्या शिवसैनिकांनी मुंबईतील खार भागात असलेल्या युनिकॉन्टिनेंटल स्टुडिओची तोडफोड केली आहे.
याप्रकरणी शिवसेनेकडून (शिंदे गट) एमआयडीसी पोलिसांत तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी कुणाल कामराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या घटनेवर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. भाजपा आमदार राम कदम यांनी यावर भाष्य केलं आहे.
कदम म्हणाले, “अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कुणाल कामरा काहीही बोलणार का? महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री व माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल तो जे काही बोलला ते वक्तव्य महाराष्ट्राच्या भूमीचा अवमान आहे.
कुणाल कामरा हा ठाकरे गटाची सुपारी वाजवतोय का? तुम्ही त्याने केलेल्या वक्तव्याचं टायमिंग बघा. दिशा सालियन खून प्रकरणात ठाकरे कुटुंबाचं नाव पुढे आल्यानंतर लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी कुणाल कामरा याने ही वेळ निवडली आहे का? असा सवाल त्यांनी केला.