अहमदनगर । नगर सहयाद्री
नगर तालुक्यातील इमामपूर शिवारात फिरायला जाण्याचा बहाणा करत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी बलात्कारासह बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. आदिनाथ लोंढे (हल्ली रा. भराट गल्ली, भैरवनाथ मंदिराशेजारी, खासगी होस्टेलमध्ये, नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.
अधिक माहिती अशी: फिर्यादी अल्पवयीन मुलगी नगरमध्ये राहते व अकरावीमध्ये शिक्षण घेते. तिची आदिनाथ सोबत ओळख झाली ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. मात्र ही मैत्री अल्पवयीन मुलीस महागात पडली आहे. आदिनाथने मैत्रीचा फायदा घेत तिला दुचाकीवरून बुधवारी (दि. २९) दुपारी साडेबाराच्या सुमारास इमामपूर (ता. नगर) शिवारातील एका लॉजवर नेले.
लग्न करण्याचे आमिष दाखवून बळजबरीने अत्याचार केला. घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली. दरम्यान सदरचा प्रकार फिर्यादी अल्पवयीन मुलीने नातेवाईकांना सांगितला. त्यानंतर त्यांनी रात्री एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी पीडितेच्या फिर्यादीवरून आदिनाथ लोंढे विरोधात गुन्हा दाखल केला आहे.