अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी आज (15 डिसेंबर) पार पडणार आहे. अवघे काही तास शपथविधीसाठी शिल्लक राहिले आहे. दुपारनंतर राजभवनात मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे. शपथविधीसाठी फोन न आल्याने इच्छुकांची घालमेल वाढली आहे. मंत्री मंडळ विस्तारात अहिल्यानगरचे भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव निश्चित मानले जात आहे. मात्र पक्षातून आ.शिवाजीराव कर्डिले, आ.मोनिका राजळे, प्रा. आ. राम शिंदे यांचेही नाव चर्चेत आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोणाला संधी देणार हे अजुनही गुलदस्त्यात आहे.
सोमवारपासून (ता.16) नागपूरमध्ये अधिवेशन सुरू होणार आहे. पाच डिसेंबरला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून तर, अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर दहा दिवसांनी मंत्रिमंडळाचा विस्तार होतो आहे. या मंत्रिमंडळात अजित पवार यांच्या वाट्याला 10 मंत्रिपदे तर एकनाथ शिदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला 12 मंत्रिपदे येण्याची शक्यता आहे. तर भाजपाला सर्वाधिक 21मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.
अहिल्यानगर जिल्ह्याला दोन मंत्रिपदे मिळण्याची शक्यता असून भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे मंत्रिपद निश्चित मानले जात आहे. तर आ.मोनिका राजळे, आ.राम शिंदे, आ.शिवाजीराव कर्डिले यांच्यामध्ये कोणाला संधी मिळणार याविषयी उत्सुकता आहे. आ.राधाकृष्ण विखे पाटील रविवारी शपथ घेणार, याचा विश्वास त्यांच्या समर्थकांत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी कोणाला संधी देणार, हा विषय अनुत्तरित आहे. सेनेकडून आ.विठ्ठल लंघे समर्थकांनी मंत्रिपदाची अपेक्षा ठेवली आहे. तर राष्ट्रवादीकडून आ.आशुतोष काळे व आ.संग्राम जगताप यांच्यापैकी कोण मंत्री होणार, याबाबत समर्थकांमध्ये उत्सुकता आहे.