जगदगुरू शंकराचार्यांच्या हस्ते पुरस्काराचे ठाणे येथे वितरण
अहिल्यानगर ।नगर सहयाद्री:-
केडगाव येथील सदगुरु शंकर महाराज मठाचे मठाधिपती अशोक महाराज जाधव यांना प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय विश्वसन्मान जीवन गौरव पुरस्कार व राष्ट्रीय धर्मगुरु पद जाहीर झाले आहे. येत्या ९ डिसेंबर रोजी श्रीक्षेत्र संगमेश्वर (ठाणे) येथे आंतरराष्ट्रीय विराट संमेलन व दर्शन आशीर्वचन महासन्मान सोहळा होत आहे. तेथे हा पुरस्कार जगदगुरू शंकराचार्य यांच्या हस्ते अशोक महाराज जाधव यांना प्रदान केला जात आहे.
केडगाव (अहिल्यानगर) येथील शंकर महाराज मठाच्या वतीने गेली आठ वर्षे अशोक महाराज जाधव हे शंकर महाराजांचे कार्य करीत आहेत. धार्मिक कार्यक्रमासोबतच अनेक सामाजीक उपक्रम जाधव हे मठाच्या माध्यमातून राबवित असतात. दिवाळीत अनाथाश्रमातील मुलांना वस्त्रदान, फराळ देण्याचा उपक्रम अनेक वर्षांपासून सुरु आहे. रेल्वेस्टेशन, बसस्थानक येथे अन्नदान केले जाते.
यासोबतच अशोक महाराज जाधव यांच्या पुढाकारातून अनेक ठिकाणी यज्ञाचे आयोजन झाले आहे. गेल्या महिन्यात देवगड येथे १३१३ कुंडात्मक यज्ञसोहळा झाला. मे २०२३ मध्ये नारायणबेट (पुणे) येथे एक हजार १११ यज्ञांचे आयोजन केले होते.श्रीगोंदे, केडगाव, कर्जत, पिंपळगाव लांगडा फाटा, पळसदेव (इंदापुर), सोलापुर, मायंबा (आष्टी), कराड या ठिकाणी यज्ञांचे आयोजन झाले. याच गणेशयाग, विष्णुयाग व दत्तयाग प्रामुख्याने करण्यात आले. त्यामाध्यमातून त्याभागातील हवेचे शुध्दीकरण करण्यासाठी मदत होती.
जाधव यांच्या या धार्मिक व सामाजीक कार्याची दखल घेत आंतरराष्ट्रीय विराट संमलेनात त्यांना जगदगुरू शंकराचार्यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय विश्वसन्मान पुरस्कार बहाल करण्यात येणार आहे. त्यासोबतच याच संमलेनात त्यांना राष्ट्रीय धर्मगुरु हे प्रतिष्ठेचे पदही प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.