अहिल्यानगरमध्ये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शहरातील इम्पेरियल चौक परिसरात एका अज्ञात इसमाने महापुरुषांविषयी आक्षेपार्ह व अपमानजनक लिखाण असलेले कागदाचे तुकडे सार्वजनिक ठिकाणी फेकून सामाजिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या कृत्यामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, याप्रकरणी योगेश वसंत थोरात (वय 35, रा. बुरुडगाव रोड) यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. 06) सायंकाळी सहाच्या सुमारास इम्पेरियल चौकातील उड्डाणपुलावरून एका अज्ञाताने रिक्षा स्टॉपजवळ दोन प्लॅस्टिकच्या पिशव्या फेकल्या. या पिशव्यांमध्ये अंड्यांसोबत कागदाचे तुकडे आढळून आले, ज्यावर महापुरुषांचा अवमान करणारा आणि समाजात तणाव निर्माण करणारा मजकूर लिहिलेला होता. हा प्रकार लक्षात येताच परिसरात एकच खळबळ उडाली आणि नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
घटनेचे गांभीर्य ओळखून अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे आणि पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी तातडीने फौजफाट्यासह घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण शांतता असून, खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी गस्त वाढवली आहे. समाजात वैमनस्य पसरवणाऱ्या या अज्ञात व्यक्तीचा पोलीस कसून शोध घेत आहेत.
आरोपींवर कारवाई करा
शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ उड्डाणपुलावरुन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह पत्रक भिरकविण्यात आली. शहरात जाती जातीमध्ये भांडणे लावून दंगल घडविण्याचा हा प्रकार संतापजनक आहे. याप्रकरणी तातडीने सखोल चौकशी करुन आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन आंबेडकरी समाज बांधवांच्यावतीने जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना देण्यात आले. शहरामध्ये दोन समाजामध्ये भांडणे लावण्याचा प्रकार घडला आहे. आक्षेपार्ह पत्रक भिरकवण्यात आली आहेत. त्यात आमदार संग्राम जगताप यांचा नावाचा उल्लेख केलेला आहे. सदर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून संबंधित आरोवर कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा समाजा बांधवांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदना देण्यात आला आहे. न्यामूर्ती सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याबद्दल सोमवारी निंदनीय प्रकार घडला. या घटनेचा निषेध नोंदवत आरोपीस कठोर शिक्षा करावी असे निवेदनात म्हटले. यावेळी सुरेश बनसोडे, अशोकराव गायकवाड, अजय साळवे, समेध गायकवाड, अतुल भिंगारदिवे, सागर ठोकळ, सिद्धार्थ आढाव, सुहास पाटोळे, सचिन शेलार, संदेश लांडगे, अंकुश मोहिते, भिमराव पगारे, पप्पू शिंदे, प्रमोद पडागळे, सतिष शिरसाठ, योगेश थोरात यांची निवेदनावर नावे आहेत.