अलिबाग। नगर सहयाद्री
विनायक मेटे यांच्या पश्चात बंद पडलेल्या शिवसंग्राम संघटनेची पुर्नबांधणी करण्यात आली आहे. मेटे यांचे बंधू राम हरी मेटे यांनी आज किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने ‘जय शिवसंग्राम’ या नवीन संघटनेची घोषणा केली.
विनायक मेटे यांचे अकाली निधन झाल्यानंतर शिव संग्राम संघटनेचे काम थांबले होते. परंतु त्यांनी पाहिलेल्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी या नवीन संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. विनायक मेटे यांच्या स्वप्नातील अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक पूर्ण होण्यासाठी पाठपुरावा करणार असून मराठा आरक्षण आंदोलनात सक्रीय सहभाग घेणार, असे राम हरी मेटे यांनी स्पष्ट केले. या खेरीज शेतकर्यांचे प्रश्न, राज्य लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्या परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांचे प्रश्न घेवून आम्ही लढा देऊ, असे मेटे यांनी सांगितले.
रामहरी मेटे हे संघटनेचे प्रमुख राहणार असून सुरेश शेटये पाटील यांची संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. किल्ले रायगडावरील छत्रपतींच्या पुतळयाला आणि श्री जगदीश्वर मंदिरात अभिवादन करण्यात आले. भगवे फेटे परिधान केलेले कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा जयघोष करीत होते.