हरमनप्रीत कौरचा जबरदस्त डाव; त्या दोन षटकांत गेम फिरला, टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेच्या हातून ट्रॉफी हिसकावली
मुंबई / नगर सह्याद्री
भारताच्या पोरींनी कित्येक दशकांचा दुष्काळ संपवला. नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियममध्ये हरमनप्रीत आणि संपूर्ण टीमने भारतीयांचं स्वप्न पूर्ण केलं. भारताचं गेल्या अनेक वर्षांचं स्वप्न २०२५ मध्ये पूर्ण झालं. टीम इंडियाने (Women) पहिल्यांदा वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा मान पटकावला आहे. या मोठ्या विजयानंतर भारतीयांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. टीम इंडियाने वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तगड्या दक्षिण आफ्रिकेच्या हातून विजयाची ट्रॉफी हिसकावली आहे.
दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी २९९ धावांचं आव्हान होतं. या धावसंख्येचा पाठलाग करताना २ गडी गमावून ११४ धावा झाल्या होत्या. लौरा वोल्वार्ट पूर्णपणे क्रिजवर सेट झाली होती. त्यावेळी हरमनप्रीतने डोकं चालवत गोलंदाजीसाठी शेफाली वर्माला संधी दिली. हरमनप्रीतचा हा डाव यशस्वी झाला.
…अन् गेम फिरला
शेफालीने लुसला २५ धावांवर बाद केलं. लुसला बाद करत शेफालीने मोठी भागीदारी तोडली. यानंतर दक्षिण आफ्रिकेची स्टार खेळाडू मारिजाने कॅपला देखील अवघ्या ४ धावांवर बाद केलं. शेफालीची या दोन षटकांमधील गोलंदाजी टीम इंडियासाठी गेमचेंजर ठरली. तगडे खेळाडू बाद झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेला पुढे आव्हानाला सामोरे जाणे अवघड झाले.
‘हे’ आहेत भारताच्या ऐतिहासिक वर्ल्डकप विजयाचे ५ शिल्पकार
नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियम हे भारतीय संघासाठी नेहमीच लकी ठरतं, असं कर्णधार हरमनप्रीत कौर पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाली. हरमन असं का म्हणाली, हे संपू्र्ण वर्ल्डकप स्पर्धेत आपण पाहिलं. वर्ल्डकप २०२५ स्पर्धेत या मैदानावर खेळताना भारतीय संघाने एकही सामना गमावला नाही. भारताने निर्णायक सामन्यात बलाढ्य न्यूझीलंडचा पराभव केला. त्यानंतर सेमीफायनलमध्ये जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाला पराभूत केलं. शेवटी अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून पहिल्यांदाच वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली. दरम्यान कोण आहेत या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार? जाणून घ्या.
१) स्मृती मानधना
अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला चांगल्या सुरूवातीची गरज होती. भारतीय संघाकडून डावाची सुरूवात करण्यासाठी स्मृती आणि शफालीने मिळून शतकी भागीदारी केली. स्मृतीने ५८ चेंडूंचा सामना करत ४५ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान तिने ८ चौकार मारले. तिचं अर्धशतक थोडक्यात हुकलं. पण भारताला अंतिम सामन्यात जशी सुरूवात हवी होती, तशी सुरूवात मिळाली.
२) शफाली वर्मा
शफाली वर्मा ही भारतीय संघासाठी सरप्राईज पॅकेज ठरली. बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना प्रतिका रावल दुखापतग्रस्त झाली आणि त्यामुळे सेमीफायनलच्या सामन्यात शफाली वर्माला संघातस स्थान दिलं गेलं. स्फोटक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या शफाली वर्माला सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध हवी तशी सुरूवात करता आली नव्हती. तिला अवघ्या १० धावा करता आल्या होत्या. पण सेमीफायनलमध्ये तिने ८७ धावांची दमदार खेळी केली. यासह गोलंदाजी करताना २ गडी देखील बाद केले.
३)दीप्ती शर्मा
दीप्ती शर्मा या सामन्याची खरी शिल्पकार ठरली. भारतीय संघ अडचणीत असताना तिने फलंदाजीत ५८ चेंडूंचा सामना करून ५८ धावांची दमदार खेळी केली. या खेळीच्या बळावर तिने भारतीय संघाची धावसंख्या ३०० धावांच्या जवळपास पोहोचवली. त्यानंतर गोलंदाजी करताना तिने ५ गडी बाद केले. यासह ती या स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करणारी गोलंदाज ठरली.
४)रिचा घोष
भारतीय महिला संघातील मधल्या फळीत अशी एक फलंदाज आहे, जी कुठल्याही क्षणी फलंदाजीला येऊन सामना फिरवू शकते. मोठे फटके खेळण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या रिचाने याआधीही अनेकदा स्फोटक खेळी करून भारताला विजय मिळवून दिले आहेत. या सामन्यात तिने ३ चौकार आणि २ षटकारांच्या साहाय्याने ३४ धावांची महत्वपूर्ण खेळी केली.
५) हरमनप्रीत कौर
हरमनप्रीत कौरला या सामन्यात फलंदाजीत हवं तितकं योगदान देता आलं नाही. पण नेतृत्वात ती कुठेही कमी पडली नाही. तिचा शफाली वर्माला गोलंदाजी देण्याचा निर्णय या सामन्यातील टर्निंग पॉईंट ठरला. शफालीने लागोपाठ २ षटकात पहिल्याच चेंडूवर १ विकेट घेऊन भारतीय संघाला मजबूत स्थितीत पोहोचवलं. यासह ती भारतीय महिला संघाला वर्ल्डकप जिंकून देणारी पहिलीच कर्णधार ठरली.
महिला संघावर BCCI चा ५१ कोटींचा वर्षाव, हरमनप्रीत कौर दिग्गजांच्या पंक्तीत
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) विश्वविजेत्या भारतीय महिला संघावर बक्षिसांचा वर्षाव केला आहे. विश्वचषक जिंकल्याबद्दल बीसीसीआयने हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघाला ५१ कोटी रुपयांचे भव्य बक्षीस जाहीर केले आहे. ‘या विजयामुळे हरमनप्रीत कौर आता कपिल देव आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या पंक्तीत जाऊन बसली आहे.’ १९८३ मध्ये कपिल देव आणि २०११ मध्ये महेंद्रसिंग धोनी यांच्यानंतर विश्वचषक जिंकणारी हरमनप्रीत ही तिसरी भारतीय कर्णधार ठरली आहे. भारतीय महिला संघाने प्रथमच विश्वचषक जिंकून इतिहास रचला, त्यामुळे बीसीसीआयकडून खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफसाठी ही मोठी रक्कम जाहीर करण्यात आली आहे. हा विजय भारतीय महिला क्रिकेटमधील एका नव्या युगाची सुरुवात मानला जात आहे.
विश्वचषकासोबत हृदयपण जिंकलं, विजयाचा जल्लोष सोडला अन् पराभवानंतर रडणाऱ्या आफ्रिकेच्या खेळाडूंना…
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील भारतीय महिला संघाने रविवारी क्रिकेट विश्वात नवीन अध्याय लिहिला. पहिल्यांदाच टीम इंडियाने वनडे विश्वचषकावर नाव कोरले. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया सारख्या संघाचा दबदबा असणाऱ्या स्पर्धेत भारतीय रणरागिणींनी इतिहास घडवला. पण विजयानंतर भारताच्या पोरींमध्ये कुठलाही माज अथवा उन्माद दिसला नाही. दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघातील खेळाडूंबाबत त्यांनी जे केले, त्याचं आज कौतुक होतेय. भारतीय महिला संघाने फक्त विश्वचषकच जिंकला नाही तर जगाचे हृदय जिंकलेय.
नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर भारतीय महिला संघाने ५२ धावांनी आफ्रिकेचा पराभव करत विश्वचषकावर नाव कोरले. अंतिम सामन्यात पराभव झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा महिला संघ भावूक झाला. त्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला. त्या धायमोकलून रडू लागल्या. भारतीय महिला खेळाडूंनी विजयाचे सेलीब्रेशन सोडलं अन् त्यांना आधार दिला. टीम इंडियाच्या याचं कृतीचे जगभरात कौतुक होतेय. याचे व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
सामना झाल्यानंतर मैदानावर नेमकं काय झालं?
अंतिम सामना संपताच भारतीय खेळाडूंकडून जल्लोष केला गेला. कित्येकवेला तुटलेले स्वप्न साकार झाल्यामुळे भारतीय महिलांचा आनद गगणात मावत नव्हता. पण दुसरीकडे मैदानावर दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना अश्रू आवरता आले नाहीत. विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघ यावेळीही ट्रॉफीपासून दूर राहिला. मैदानावरच खेळाडूंच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. हे पाहताच भारतीय खेळाडूंनी आपला आनंद बाजूला ठेवत त्यांच्या दुख सावरण्याचे काम केले अन् त्यांना धीर दिला.
कर्णधार हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, दीप्ती शर्मा आणि शफाली वर्मा यांच्यासह इतर खेळाडूंनी दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना मिठी मारत धीर दिला. पराभवामुळे खचलेल्या खेळाडूंना धीर देत सांत्वन केले. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुकही केले. या प्रसंगाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत.
जनरल डब्यातून प्रवास, ना बेड ना आवश्यक सुविधा… असा होता भारतीय महिला क्रिकेटचा प्रवास, माजी कर्णधारांनी सांगितल्या आठवणी
भारतीय महिला क्रिकेट संघाने ५२ वर्षांत पहिल्यांदाच आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकला आहे. हरमीनप्रत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने रविवारी रात्री उशिरा नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव करून ऐतिहासिक विश्वचषक जिंकला. विश्वचषक जिंकणे हा भारतीय महिला क्रिकेटसाठी एक ऐतिहासिक क्षण आहे. महिला क्रिकेटमध्ये एकदिवसीय विश्वचषक १९७३ मध्ये सुरू झाला आणि भारताचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न आता ५२ वर्षांत प्रथमच पूर्ण झाले आहे. विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघाला बीसीसीआयकडून ५१ कोटी आणि आयसीसीकडून सुमारे ४० कोटींचे बक्षीस मिळाले.
असा होता भारतीय महिला क्रिकेटचा प्रवास
भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडूंना एकेकाळी सामान्य डब्यातून प्रवास करावा लागत असे. त्यांना रात्र शाळेत घालवावी लागत असे आणि स्वत:चे अंथरूण स्वत: प्रवासात घ्यावा लागत असे.
भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार शांता रंगास्वामी यांनी हे स्वत: सांगितले. शांता रंगास्वामी यांनी भारतीय महिला क्रिकेटपटूंना त्यांच्या सुरूवातीच्या काळात आलेल्या अडचणी आठवल्या.
शांता रंगास्वामी त्या कठीण दिवसांची आठवण करतात. जेव्हा महिला क्रिकेटपटूंना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून फारसा किंवा कोणताही पाठिंबा मिळत नव्हता. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या पहिल्या कर्णधार शांता रंगास्वामी यांनी १९७६मध्ये पदार्पण केले आणि १९९१ पर्यंत खेळल्या. त्या काळात महिला संघ ट्रेनच्या जनरल डब्यांमधून प्रवास करत असे आणि सामन्यांसाठी दौऱ्यावर असताना अनेकदा वसतिगृहाच्या मजल्यावरच झोपत असे. “आम्हाला जनरल डब्यांमध्ये प्रवास करावा लागत अशे आणि वसतिगृहाच्या मजल्यावर झोपावे लागत. शिवाय आम्हाला व्यवस्थित बेड आणि इतर आवश्यक सुविधा स्वत:च्या स्वत: सोबत घेऊन जाव्या लागत असे. आम्ही आमचे क्रिकेट किट पाठीवर बॅकपॅकसारखे बांधायचो आणि एका हातात सुटकेस घेऊन जायचो”, असे रंगास्वामी म्हणाल्या होत्या.
आताच्या संघाला करोडो रूपये…
शांता रंगास्वामी म्हणाल्या की, “आम्हाला खूप आनंद आहे की भारताच्या सध्याच्या महिला खेळाडूंना त्यांच्या पात्रतेच्या सर्व सुविधा मिळत आहेत. भारतीय महिला क्रिकेटने खरंच प्रगती केली आहे.” भारताच्या विश्वचषक विजयानंतर बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी खेळाडू आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांसाठी ५१ कोटींचे बक्षीस जाहीर केले. बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी हा भारतीय महिला क्रिकेटसाठी एक मोठा क्षण असल्याचे म्हटले. आयपीएलचे अध्यक्ष अरूण धुमल यांनीही या विजयाची तुलना पुरूष संघाच्या १९८३च्या विश्वचषक विजयाशी केली.



