IND vs ENG 2nd Test: भारताने 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात इंग्लंडला तब्बल 336 धावांनी पराभूत केलं. या विजयासह भारतानं मालिकेत 1-1 नं बरोबरी केली आहे. बर्मिंगहॅममध्ये भारतीय संघानं पहिल्यांदाच कसोटीमध्ये विजय मिळवला आहे. कर्णधार शुभमन गिलची विक्रमी फलंदाजी आणि सिराज आणि आकाशदीप यांच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर भारतानं हा विजय खेचून आणला आहे.
बर्मिंघमध्ये भारतीय संघानं मिळवलेला हा पहिला कसोटी विजय ठरला. विशेष म्हणजे बर्मिंघममध्ये विजय मिळवणारा भारत हा संपूर्ण आशिया खंडातील पहिला देश ठरला आहे. धावांचा विचार करता भारताचा हा कसोटीमधील सर्वात मोठा विजय ठरला. तसंच भारतीय संघानं प्रथमच एका कसोटी सामन्यामध्ये एक हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे.
टीम इंडियाने सुमारे सहा दशकांत एजबॅस्टन मैदानावर विजय मिळवला आहे. या सामन्यात कर्णधार शुभमन गिलची सामनावीर म्हणून निवड झाली. दुसऱ्या कसोटीत शुभमन गिलने पहिल्या डावात द्विशतक आणि दुसऱ्या डावात शानदार शतक झळकावले. या सामन्यात गिलने 430 धावा केल्या. आकाशदीपने या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात 10 विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराजनेही भेदक गोलंदाजी केली आणि पहिल्या डावात 6 आणि दुसऱ्या डावात एक विकेट घेतली.
भारत पहिला डाव : भारताने पहिल्या डावात शुभमन गिल (269), यशस्वी जैस्वाल (87) आणि रवींद्र जडेजा (89) यांच्या शानदार खेळींच्या जोरावर 587 धावा केल्या.इंग्लंड पहिला डाव : प्रत्युत्तरात इंग्लंडने हॅरी ब्रूक (106) आणि जेमी स्मिथ (184) यांच्या खेळींच्या बळावर 407 धावा केल्या. भारताकडून मोहम्मद सिराजने 6 बळी घेतले. भारत दुसरा डाव : भारताने गिलच्या शतकी खेळीमुळे (161) 427/6 धावसंख्येवर आपला दुसरा डाव घोषित केला. इंग्लंड दुसरा डाव : जेमी स्मिथचा (88) अपवाद वगळता इंग्लंडच्या कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. आकाश दीपने 6 बळी घेत इंग्लंडचा डाव गुंडाळला.