लोणी । नगर सहयाद्री:-
संविधानाने देशातील प्रत्येक माणसाला स्वातंत्र्य, समता, बंधूता आणि न्यायाचा मंत्र दिला आहे. जगातील सर्वच देशात आपले संविधान हे सर्वश्रेष्ठ मानले जाते. संविधानाच्या आधारानेच आपला देश वाटचाल करीत असून, विकास प्रक्रीयेमध्ये सुध्दा सामान्य माणसाचे हक्क आणि आधिकार अबाधित ठेवले असल्याचे प्रतिपादन जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
संविधान दिनाच्या निमित्ताने प्रवरानगर येथे पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर मंत्री विखे पाटील यांनी संविधानाचे पूजन करून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. याप्रसंगी संविधान पत्रिकेचे सामूहिक वाचनही करण्यात आले.
मंत्री विखे पाटील म्हणाले की, संविधानाचे महत्व नव्या पिढीला समजावे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशामध्ये संविधान दिन सुरु केला. या माध्यमातून संविधानाचा संदेश समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचत आहे. केंद्र आणि राज्य सरकारने नेहमीच संविधानाचा आधार घेऊन समाजातील शेवटच्या घटकाला न्याय देण्याची भूमिका घेतली आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक समरसतेचा जो मंत्र दिला होता त्याअनुषंगानेच आज योजनांची अंमलबजावणी होत असल्याचे त्यांनी सांगितले.
या देशात विरोधकांकडून केवळ संविधान बदलाची भाषा करून, राजकारण केले जाते. समाजामध्ये दिशाभूल करण्याचा प्रयत्नही होतो. मात्र संविधानाचे महत्व नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यातील महायुती सरकारने सर्व शासकीय प्रशिक्षण संस्थामध्ये संविधान मंदिर उभारण्याचा निर्णय घेतला असल्याचे मंत्री विखे यांनी सांगितले.



