कर्नल सोफिया कुरेशी | पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण माहिती
Operation Sindoor: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. यातच पाकिस्तानकडून अनेक फेक न्यूज पसरवल्या जात आहेत. भारतीय तळांवरच्या हल्ल्यांसंबंधी पाककडून दिशाभूल सुरु आहे. मात्र पाकचे दावे भारताने फेटाळून लावले आहेत. कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी पाकिस्तानकडून सुरू असलेल्या हल्ल्याची आणि खोट्या दाव्याची माहिती दिली आहे.
सलग चौथ्या दिवशी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेतली. कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी या पत्रकार परिषदेत भारताची भूमिका स्पष्ट केली. भारताने केलेल्या प्रतिहल्ल्यात पाकिस्तानमधील 5 हवाई तळआणि 2 रडार तळ उद्ध्वस्त करण्यात आल्याची महत्त्वपूर्ण माहिती यापूवच समोर आली होती, ज्यामुळे पाकिस्तानची मोठी कोंडी झाली आहे.
कर्नल सोफिया कुरेशी यांनी सांगितले की, पाकिस्तानी सैन्याने भारताच्या पश्चिमी सीमेवर हल्ले केले असून, भारतीय लष्करी तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून सातत्याने गोळीबार सुरू आहे. श्रीनगरसह अनेक ठिकाणांहून हवाई घुसखोरीचा प्रयत्नही झाला, ज्याला भारतीय सैन्याने सडेतोड उत्तर दिले. उधमपूर आणि भटिंडा सारख्या ठिकाणी पाकिस्तानी हल्ल्यामुळे काही उपकरणांचे नुकसान झाले, तर पंजाबच्या हवाई हद्दीत क्षेपणास्त्र डागण्याचाही प्रयत्न झाला. इतकेच नव्हे तर, अनेक ठिकाणी वैद्यकीय सेवांनाही लक्ष्य करण्यात आले. भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या या सर्व हल्ल्यांना परतवून लावले आहे. पाकिस्तान नागरी विमानांचा गैरवापर करत असल्याचा आरोप करत, भारताने अत्यंत संयमाने प्रत्युत्तर दिल्याचे कर्नल कुरेशी यांनी नमूद केले.
पाकिस्तानकडून सुरतगड आणि चंदीगड सारख्या अनेक शहरांमधील शस्त्रसाठा नष्ट केल्याच्या खोट्या बातम्या पसरवल्या जात असल्याचा पर्दाफाशही त्यांनी केला. कुपवाडा, बारामुल्ला, पुंछ आणि अखनूर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून तोफ, मोर्टार आणि हलक्या शस्त्रांनी भीषण गोळीबार सुरू असून, भारतीय सैन्य त्याला जोरदार प्रत्युत्तर देत आहे. भारतीय हवाई दलाला नुकसान पोहोचवल्याचा पाकिस्तानचा दावाही कर्नल कुरेशी यांनी फेटाळून लावला. सिरसा आणि सुरत एअरबेसचे व्हिडिओआणि फोटो पत्रकार परिषदेत दाखवत, तेथे कोणतेही नुकसान झाले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच, भारत धार्मिक स्थळांवर हल्ले करत आहे किंवा अफगाणिस्तानवरही क्षेपणास्त्र फेकले यासारख्या अनेक खोट्या दाव्यांचीही पोलखोल त्यांनी केली.
आंतरराष्ट्रीय स्तरावरून शांततेचे आवाहन
भारत-पाकिस्तान तणावाच्या या गंभीर परिस्थितीत, जी 7 सदस्य राष्ट्रांनी कॅनडा , फ्रान्स , जर्मनी, इटली, जपान, युनायटेड किंग्डम अमेरिका आणि युरोपीय संघ दोन्ही देशांना तणाव कमी करण्याचे आवाहन केले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे ताणले गेले असून, सातत्याने एकमेकांवर हल्ले होत आहेत. जी 7 राष्ट्रांनी दोन्ही देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांशी आणि प्रतिनिधींशी चर्चा करून तणाव तात्काळ कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे.
हवाई तळांना पाकिस्तानकडून लक्ष्य
पाकिस्तानने जाणूनबुजून हवाई तळांना लक्ष्य केल्यामुळे भारतीय सशस्त्र दलांनी जलद आणि सुनियोजित प्रत्युत्तर कारवाई केली. रफीकी, मुरीद, चकलाला, रहीम यार खान, सुक्कुर आणि चुनियान येथील पाकिस्तानी लष्करी तळांना हवाई प्रक्षेपण, अचूक दारूगोळा आणि लढाऊ विमानांद्वारे लक्ष्य केले गेले. पसरूरमधील रडार साइट आणि सियालकोटमधील विमान तळाला देखील अचूक दारूगोळा वापरून लक्ष्य केले गेले. या कारवाई दरम्यान भारताने कमीत कमी नुकसान करण्याचा प्रयत्न केला आहे.
पाकिस्तानचा घुसखोरीचा प्रयत्न
पाकिस्तानी सैन्य पश्चिम सीमेवर सतत हल्ले करत आहे, त्यांनी भारताच्या लष्करी ठिकाणांवर हल्ला करण्यासाठी ड्रोन, लांब पल्ल्याची शस्त्रे, युद्धसामग्री आणि लढाऊ विमानांचा वापर केला आहे. पण भारताने पाकिस्तानचे हे हल्ले परतवून लावले. तरीही पाकिस्तानने 26 हून अधिक ठिकाणी हवाई मार्गाने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी उधमपूर, भूज, पठाणकोट, भटिंडा येथील हवाई दलाच्या तळांवर नुकसान केले. त्यांनी पहाटे पंजाबच्या हवाई तळाला लक्ष्य करण्यासाठी हाय-स्पीड क्षेपणास्त्रांचा वापर केला.
भारतातील 32 विमानतळ बंद
भारत-पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा थेट फटका आता हवाई वाहतुकीवर बसत आहे. देशभरातील एकूण 32 विमानतळ तात्पुरते बंद करण्यात आले असून, मुंबई आणि दिल्लीतील 25 अंतर्गत हवाई मार्गही बंद करण्यात आले आहेत. 9 ते 14 मे 2025 या कालावधीत आधमपूर, अंबाला, अमृतसर, अवंतीपूर, भटिंडा, भूज, बिकानेर, चंदीगढ, हलवारा, हिंडन, जैसलमेर, जम्मू, जामनगर, जोधपूर, कंडला, कांगडा, केशोड, किशनगढ, कुल्लू मनाली (भुंतर), लेह, लुधियाना, मुंद्रा, नालिया, पठाणकोट, पटियाला, पोरबंदर, राजकोट (हिरासर), सरस्वा, शिमला, श्रीनगर, थोईसे, उत्तरलाई हे विमानतळ बंद ठेवण्यात आली आहेत.
गोळीबारात आयुक्त थापांचा मृत्यू
पाकिस्तानच्या गोळीबारात जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी याबाबत माहिती दिली आहे. यासंदर्भात त्यांनी एक ट्विट केले आहे. राजौरीहून आलेली ही धक्कादायक बातमी आहे. आपण जम्मू-काश्मीर प्रशासन सेवेतील एक समर्पित अधिकारी गमावला आहे. आज पाकिस्तानने राजौरी शहराला लक्ष्य करत केलेल्या गोळीबारात अधिकाऱ्याच्या निवासस्थानावर हल्ला झाला, ज्यामध्ये आमचे अतिरिक्त जिल्हा विकास आयुक्त श्री. राजकुमार थप्पा यांचा मृत्यू झाला. या भयानक जीवितहानीबद्दल मला धक्का आणि दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो…असा मजकूर ओमर अब्दुल्ला यांनी केलेल्या ट्विटमध्ये आहे.
भारताने पाकिस्तानचे लाँच पॅड उडवले
पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराने आणखी एक मोठी कारवाई केली आहे. बीएसएफने पाकिस्तानातील सियालकोटमधील दहशतवादी लाँच पॅड पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहे. बीएसएफने या कारवाईचा व्हिडिओही जारी केला आहे.पाकिस्तान भारतीय सीमेत दहशतवादी पाठवत होते तेच लाँच पॅड पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहे. या लाँच पॅड्सच्या विनाशामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तान संतापला आहे. यामुळेच तो नियंत्रण रेषेला लागून असलेल्या गावांवर सतत गोळीबार करत आहे. तथापि, भारतीय सैन्यही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत आहे.
पाकिस्तानचे ‘बुन्यान-उल-मर्सूस’ नापाक मिशन
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानला ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे जोरदार उत्तर देत आहे. भारताने दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ला केल्यानंतर 7 मे रोजी पाकिस्तानने भारताच्या सीमावत भागात गोळीबार केला. दरम्यान, पाकिस्तानने जम्मू काश्मीर, पंजाब आणि राजस्थानच्या अनेक शहरांमध्ये हल्ले केले. या ऑपरेशनला पाकिस्तानने बुन्यान-ए-मर्सूस असं नाव दिले आहे. बुन्यान ए मर्सूस हा एक अरबी शब्द आहे. याचा अर्थ एक भक्कम पाया असा होता. साध्या भाषेत सांगायचे झाले तर, एखादी इमारत किंवा पाया जो खूप मजबूतीने संरक्षण करतो, तो जणू सिसासारख्या मजबूत भिंतीसारखा आहे.