नवी दिल्ली / वृत्तसंस्था :
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबतचे संबंध ताणलेले असताना मोदी सरकारनं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बोर्डात व्यापक बदल केले आहेत. रिसर्च अँड ऍनॅलिसिस विंग अर्थात रॉचे माजी प्रमुख आलोक जोशी यांच्याकडे बोर्डाचं अध्यक्षपद देण्यात आलेलं आहे. पाकिस्तान सोबतचे संबंध ताणलेले असताना आलोक जोशी यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बोर्डाच्या अध्यक्षपदी करण्यात आलेली नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे. राष्ट्रीय सुरक्षा आणखी मजबूत करण्याच्या दिशेनं हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बोर्डात आता ७ सदस्य असतील. ते विविध क्षेत्रांमधील तज्ज्ञ आहेत. बोर्डातील तीन जण सैन्याची पार्श्वभूमी असलेले आहेत. तर दोन जण भारतीय पोलीस सेवेतून (आयपीएस) निवृत्त झालेले अधिकारी आणि एक जण भारतीय परदेश सेवेतून (आयएफएस) निवृत्त झालेला अधिकारी आहे. सुरक्षा, गोपनीय माहिती आणि कूटनिती यांचं संतुलन राखण्यासाठी अशा प्रकारची रचना करण्यात आलेली आहे.
आलोक जोशी यांची नियुक्ती का महत्त्वाची?
आलोक जोशींना राष्ट्रीय सुरक्षा क्षेत्राचा मोठा अनुभव आहे. त्यांनी २०१२ ते २०१४ या कालावधीत रॉचे प्रमुख म्हणून काम केलं आहे. २०१५ ते २०१८ या कालावधीत ते एनटीआरओचे चेअरमन होते. जोशींनी शेजारी देशांमध्ये, विशेषत: पाकिस्तान आणि नेपाळमध्ये करण्यात आलेल्या गोपनीय कारवायांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या नेतृत्त्वात जोशी यांची झालेली नियुक्ती महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे. जोशी यांच्या नियु्क्तीमुळे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बोर्ड अधिक प्रभावी होईल.
जोशींच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बोर्ड सायबर सुरक्षा, दहशतवादी विरोधी रणनीती, भू-राजकीय आव्हानांवर विशेष लक्ष देईल, अशी अपेक्षा आहे. जोशी तांत्रिक पातळीवर निष्णात आहे. एनटीआरओमध्ये असताना त्यांनी केलेली कामगिरी पाहता सायबर सुरक्षेत ते छाप पाडू शकतात. तशी संधी त्यांना मिळालेली आहे.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बोर्ड भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा व्यवस्थापन प्रणालीचा महत्त्वपूर्ण भाग आहे. हे बोर्ड राष्ट्रीय सुरक्षा परिषदेला दीर्घकालीन विश्लेषण आणि सल्ला देतं. बोर्डाची स्थापना १९९८ मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार असताना झाली. तेव्हापासून या बोर्डानं राष्ट्रीय सुरक्षा धोरणांचा आकार देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. महिन्यातून किमान एका या बोर्डाची बैठक होते.
जर भारतीय सैन्याने कारवाई सुरू केली तर विनाशकारी परिणाम होतील
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले आहेत. याच पार्श्वभूमीवर भारत पुढील 24 ते 36 तासांत आपल्याविरोधात लष्करी कारवाई करणार असल्याची विश्वासार्ह माहिती आपल्याकडे असल्याचा दावा पाकिस्तान करत आहे. मध्यरात्री 2 वाजता बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पाकिस्तानचे माहिती मंत्री अत्ताउल्लाह तरार यांनी जर भारतीय सैन्याने कारवाई सुरू केली तर विनाशकारी परिणाम होतील असा इशारा दिला आहे.
“आमच्याकडे विश्वासार्ह गुप्तचर माहिती आहे की, भारत पुढील 24 ते 36 तासांत पाकिस्तानवर लष्करी हल्ला करण्याची योजना आखत आहे. भारताच्या कोणत्याही कृतीला पूर्ण ताकदीने उत्तर दिलं जाईल,” असा इशारा त्यांनी दिला आहे.
पाकिस्तान कोणत्याही परिस्थितीत आपल्या जमिनीचं रक्षण करेल आणि पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देईल, असं तरार म्हणाले आहेत. “आमचा देश आपल्या सार्वभौमत्वाचे आणि प्रादेशिक अखंडतेचे प्रत्येक प्रकारे रक्षण करेल. जर भारताने पाकिस्तानवर युद्ध लादण्याचा प्रयत्न केला तर होणाऱ्या विनाशकारी खर्चासाठी ते पूर्णपणे जबाबदार असतील,” असंही ते म्हणाले आहेत.
पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग असल्याचा कोणताही पुरावा दिला नसल्याचा दावा करताना मंत्र्याने भारत निराधार आणि बनावट आरोपांच्या आधारे आपल्यावर हल्ला करण्याची योजना आखत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला.
“भारताची न्यायाधीश, ज्युरी आणि फाशी देणारे होण्याची सवय पाकिस्तानने नाकारली आहे”, असंही ते पुढे म्हणाले.पाकिस्तानी सैन्याकडून नियंत्रण रेषेवर वारंवार युद्धबंदीचे उल्लंघन होत असताना, पाकव्याप्त काश्मीरला वेगळे करणाऱ्या लष्करी सीमेचे रक्षण करणाऱ्या भारतीय सैनिकांना चिथावण्याचा प्रयत्न होत असताना तरार यांनी हा दावा केला आहे.
मंगळवारी पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनीही भारतासोबत संभाव्य युद्धाचा इशारा दिला होता. आसिफ यांनी जिओ न्यूजला सांगितले की, “जर काही घडलेच तर ते दोन किंवा तीन दिवसांत होईल.”
पाकिस्तानी सैन्य घाबरलं, पाक रेंजर्सनी चौक्या सोडल्या
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला असून दोन्ही देशाचे सैन्य अलर्ट झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून पाकिस्तानविरुद्ध रणनीती आखली जात असून तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांसोबत त्यांच्या बैठका सुरू आहेत. मंगळवारी सायंकाळी संरक्षणमंत्री राजनाथसिंह, सीजीए अजित डोवाल यांच्यासह तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांसोबत मोदींनी चर्चा केली. या बैठकीत सैन्य दलास संपूर्ण अधिकार देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. भारताकडून उचलली जात असलेली पाऊले पाहता पाकिस्तान घाबरुन गेला आहे. पाकिस्तानी सैन्यालाही धडकी भरली असून जम्मू काश्मीरच्या एलओसी बॉर्डरवर सीझफायर झाल्याची माहिती आहे. पाकिस्तान रेंजर्सकडून सिझफायरिंगनंतर भारतीय सैन्यानेही जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानी रेंजर्संना प्रत्त्युतर दिल्याने पाक सैन्य बिथरलं आहे. सीमारेषेवरील काही पाकिस्तान सैन्याने आपली चौकी सोडून पळ काढलाय. विशेष म्हणजे पाकिस्तानी सैनिकांनी स्वत:च त्यांच्या चौक्यांवरील झेंडा खाली उतरवल्याचीही माहिती आहे. LOC सीमारेषेवरील 20 चेक पोस्टवर जोरदार चकमक झाल्याची माहिती आहे, पाकिस्तानकडून हा गोळीबार होत असून भारतीय सैन्य दलही आत घुसून जशास तसे प्रत्त्युतर देत आहे. सीमारेषेवरील नौशेरा, सुंदरबनी, अखनूर, बारामूला आणि कुपवाड़ या सीमारेषेला लगत असलेल्या प्रदेशात ही चकमक सुरू आहे.
भारताकडून लवकच हल्ला होण्याची भीती पाकिस्तानला वाटत आहे, त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी सैन्य आणि राज्यकर्त्यांनीही गतीमान हालचाली सुरू केल्या आहेत. भारताकडून कोणत्याही क्षणी एअर स्ट्राईक होऊ शकतो, त्यामुळे पाकिस्तानने इस्लामाबाद आणि लाहोरसाठी 2 मे पर्यंत नोटम म्हणजे नो टू एअरमॅन जारी केले आहे. त्यानुसार, आता हे दोन्ही राज्य नो फ्लाय झोन करण्यात आले आहेत. त्यामुळे, या प्रदेशातून कुठलीही हवाई वाहतूक होणार नाही, कुठलेही विमान व हेलिकॉप्टर उड्डाण करणार नाही. दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर भारताने गंभीरतेने पाकिस्तानची कोंडी करायला सुरुवात केली आहे. त्यातच, भाग म्हणून 5 मोठे निर्णय भारत सरकारने घेतले आहेत.