ठेवीदारांच्या रांगा | हवालदिल ठेवीदारांची केंद्रीय सहकार मंत्रालयाकडे तक्रार | पदाधिकारी नॉट रिचेबल
पारनेर | नगर सह्याद्री
मळगंगा (निघोज), राजे शिवाजी (कान्हूरपठार) आणि गोरेश्वर (गोरेगाव) या महत्वाच्या आणि मोठ्या पतसंस्थांच्या माध्यमातून हजारो ठेवीदारांना दगाफटका बसल्यानंतर आता सेनापती बापट पतसंस्थेतील ठेवीदार व्हेंटीलेटरवर आले आहेत. ठेवीदारांच्या ठेवी मिळत नसल्याने त्यांनी आता संस्थेच्या पदाधिकार्यांसह संचालकांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. संस्थेतील ठेवीदारांनी थट सहकार खात्याच्या आयुक्तांसह केेंद्रीय सहकार विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. सहा- सात महिन्यांपासून ठेवी मिळत नसल्याने आम्हाला न्याय द्या अशी मागणी आता ठेवीदारांनी केली आहे. दरम्यान, संस्थेचे अध्यक्ष रामदास भोसले हे आजारी असल्याचे आणि उपचारानिमित्त पुणे येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
याबाबतची अधिक माहिती अशी की, तालुक्यातील तेरा वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या संपदा पतसंस्थेतील कोट्यवधी रुपयांचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर दोन दिवसांपूर्वी या संस्थेचा संस्थापक ज्ञानदेव वाफारे, त्याची पत्नी आणि संस्थेतील दोन अधिकार्यांसह गोल्डव्हॅल्युअर अशा पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली. याशिवाय अन्य संचालकांसह काही कर्जदारांना दोषी ठरविण्यात आले. संपदामधील हे प्रकरण बाहेेर येण्याआधी तालुक्यातील निघोज येथील मळगंगा पतसंस्थेतील आर्थिक अनियमीतता बाहेर आली. या संस्थेने देवस्थान ट्रस्टच्या ठेव पावत्यांनाही गंडा घातल्याचे समोर आले. याशिवाय अन्य ठेवीदारांचा देखील विश्वासघात केल्याचे समोर आले आहे. संस्थेच्या कुलाबा शाखेत मोठी गडबड झाल्याचे समोर येताच ठेवीदार हवालदिल झाले.
मळगंगा पतसंस्थेचे प्रकरण चव्हाट्यावर येत असतानाच राजे शिवाजी आणि गोरेश्वर या दोन मोठ्या पतसंस्थेतील ठेवीदार अडचणीत आले. या दोनही पतसंस्थेच्या संचालकांनी व पदाधिकार्यांनी ठेवीदारांच्या ठेवीचा कसा चुकीच्या पद्धतीने विनियोग केला याचीही चर्चा झडली. त्यातून मोठ्या ठेवीदारांना शोधून त्यांना ठेवी काढण्यास सांगण्यात आले. मळगंगा पतसंस्थेत पदाधिकारीच चुकले! त्या पदाधिकार्यांना पाठीशी घालण्याचे काम लोकप्रतिनिधींकडून झाले. वास्तविक पाहता या पदाधिकार्यांच्या विरोधात प्रशासकीय कारवाई होण्यासाठी पाठपुरावा करण्याऐवजी त्यांना विधानभवनात बोलावून बैठका घेतल्या गेल्या आणि येथेच त्यांचे फावले.
गोरेश्वर पतसंस्थेच्याबाबतही तेच घडले. स्थानिक राजकारण आल्याचे वास्तव असले तरी ते थोपविण्याचे काम झाले नाही. उलटपक्षी त्यास खतपाणी घातले गेले. दरम्यान, तीन- चार पतसंस्थांमधील घोटाळे बाहेेर येत असताना तालुक्यातील ठेवीदार हवालदील झाले. त्याचा परिणाम अन्य पतसंस्थांवर झाला. त्यातून आर्थिक वर्ष संपत असताना या संस्था सावरत असल्याचे समोर येत असतानाच सेनापती बापट पतसंस्थेत आर्थिक अनियमीतता होत असल्याचे समोर आले. त्यातून ठेवीदारांना सहा- सात महिन्यांपासून रांगा लावून बसावे लागले आहे. ठेवी मिळत नसल्याने अनेकांना मोठ्या प्रश्नांना सामोरे जावे लागत असून त्यातून मार्ग कसा काढायचा असा प्रश्न ठेवीदारांसमोर पडला आहे.
ऐकीकडे पतसंस्था चालक चुकले अन् दुसरीकडे त्यांना कोंडीत पकडत निशाणा साधला गेला!
तालुक्यातील पतसंस्थांना ‘नीट’ करावे लागणार असल्याची वल्गना काही वर्षांपूर्वी करण्यात आली. त्यानंतर हळूहळू या संस्थांच्या विरोधात वेगवेगळ्या कारणांनी रान पेटविण्यात आले. त्या-त्या संस्थांच्या मुख्यालय अथवा कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायत निवडणुकीत या संस्था टार्गेट करण्यात आल्या. राजे शिवाजी हे त्याचे उत्तम उदाहरण! कान्हूरपठार ग्रामपंचायत निवडणुकीत मर्जीतील कार्यकर्त्यांसाठी सकारात्मक भूमिका घेतली नाही तर राजे शिवाजी संपवू अशा वल्गनाच केल्या गेल्या! त्यातून राजे शिवाजीमधील मोठ्या ठेवीदारांना ठेवी काढून घेण्याचे फर्मान सुटले आणि त्यातून एकाचवेळी मोठ्या ठेवीदारांना ठेवी द्याव्या लागल्या! पतसंस्था अडचणीत येण्यास त्यातून हातभारच लागला! यातून ठेवीदार भरडला जात असल्याचे लक्षात आल्यानंतर ठेवीदारांना न्याय मिळवून देणार असल्याचे सांगणार्यांनी प्रत्यक्षात तशी कोणतीच कृती केली नाही!