मुंबई / नगर सह्याद्री –
Weather Update | देशातील काही भागात थंडीची लाट पसरली आहे. तर महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाची स्थिती पाहायला मिळाली. यातच आता नववर्षाच्या मुहूर्तावर थंडी वाढणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. येत्या चार ते पाच दिवसात राज्यात पुन्हा किमान तापमानात घट होणार आहे. त्यामुळे नववर्षाच्या सुरुवातीला राज्यात पुन्हा थंडी जाणवायला लागणार आहे.
नव्या वर्षाची सुरुवात गुलाबी थंडीने होणार
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात 2-4 अंश सेल्सियसने तापमान घसरणार आहे. तर विदर्भात कमाल तापमानात फारसा परिणाम जाणवणार नाही. नव्या वर्षाची सुरुवात गुलाबी थंडीनं होणार असून राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून किमान तापमानात वाढ झाली असून याआधी 4-5 अंशांवर असणारा किमान तापमानाचा पारा 19-20 अंशांपर्यंत गेल्याच्या नोंदी झाली आहे. येत्या पाच दिवसात मध्य भारतातील तापमानात ३ ते ५ अंश सेल्सिअसने घट होणार आहे. तर ३१ डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीत हरियाणा, चंदीगड आणि पंजाबमध्ये थंडीची लाट येणार आहे. तसेच राजस्थानमध्ये ३० डिसेंबर ते २ जानेवारी दरम्यान थंडीची लाट येणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे.
तर हिमाचल प्रदेशात थंडीची लाट राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हिमवादळाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचवेळी उत्तर प्रदेशातील तापमानात येत्या दोन-तीन दिवसांत ३ ते ६ अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे, हिमाचल प्रदेशसह राजस्थान, पंजाब हरियाणा भागात थंडीची लाट राहणार आहे. तर जम्मू- काश्मीर आणि लडाखमध्ये किमान तापमान शून्य अंशाच्या खाली आला आहे.