संगमनेर / नगर सह्याद्री
घुलेवाडी सप्ताह जे घडले ते तालुक्यातील जनतेने समजून घेतले पाहिजे. संगमनेर तालुका शांतता आणि बंधुतेचे वातावरण असणारा सुजलम सुफलाम तालुका आहे. मात्र धर्माच्या व्यासपीठावरून आणि धर्माच्या नावावर काही लोक राजकारण करत असून तालुक्यातील वातावरण खराब करत असल्याची टीका काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. याचबरोबर अशा अशांतता निर्माण करणाऱ्या शक्तींना वेळीच रोखून तालुक्याची सुसंस्कृत राजकीय परंपरा टिकवण्याची तालुक्यातील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
घुलेवाडी येथील सप्ताहात धार्मिक वातावरण निर्माण करण्यासाठी काही जातीयवादी शक्तींकडून नियोजन करून घडवण्यात आलेल्या प्रसंगाबाबत बोलताना ते म्हणाले, संगमनेर तालुका हा शांततेचे बंधुभावाचे वातावरण असणारा तालुका आहे. विकासाची सातत्याने वाटचाल करणारा हा तालुका आहे. अखंड हरिनाम सप्ताहामध्ये वारकरी संप्रदायाचे विचार मांडण्यासाठीचे ते व्यासपीठ आहे. आपल्या संतांचे विचार त्या व्यासपीठावरून मांडले गेले पाहिजे. त्या व्यासपीठाला काही मर्यादा आहेत. काही नियम आहेत. ते सर्वांनी पाळले पाहिजे. हे पथ्य किंवा नियम असे आहे की, या व्यासपीठावरून राजकारण होता कामा नये. कारण याठिकाणी सर्व लोक एकत्र येतात, बंधुभावाचे वातावरण त्याठिकाणी असते.
मात्र घुलेवाडी येथे तथाकथित महाराजांनी त्या व्यासपीठावरून राजकारण सुरू केले. राजकीय भाषण सुरू केले. याला नागरिक शांततेच्या मार्गाने विरोध करत होते हे लक्षात घेतले पाहिजे. त्यानंतर होणाऱ्या केसेस त्यांच्यावर लावली जाणारी खोटी कलमे, त्यातून छळ करण्याचा प्रयत्न चालला आहे. संगमनेर तालुक्यात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न चालला आहे. माणसा माणसांमध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न चालला आहे. आपल्या तालुक्याची शांतता बिघडून टाकण्याचे काम सध्या सुरू आहे.
जो तालुका सुजलाम सुफलाम आणि शांततेची वाटचाल करणारा तालुका आहे. ज्या तालुक्याचा राज्य पातळीवर गौरव होतो. त्या तालुक्याचा विकास कसा मोडता येईल याचा प्रयत्न काही शक्ती करत आहे आणि याचा तो भाग आहे. मागे विधानसभेच्या अगोदर एक मोर्चा काढण्यात आला निवडणूक आली की मोर्चा काढायचा, वाईट साईट भाषणे करायची आणि वातावरण खराब करायचे असा प्रयत्न काही लोकांचा आहे. आता पुन्हा निवडणुका आल्या आहेत म्हणून काही समजून न घेता मोर्चा काढून वातावरण बिघडवण्याचे काम काही शक्तींचे असून त्यांना तालुक्याचा विकास थांबवायचा आहे.
आपण जी राजकीय संस्कृती निर्माण केली आहे. बंधुभावाचे वातावरण निर्माण केले आहे. विकासाची वाटचाल सुरू आहे. आपली सुसंस्कृत राजकीय परंपरा आहे हे काही लोकांना पाहवत नाही. ती लोक आपल्या विकासाची वाटचाल आणि शांतता मोडण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणून प्रत्येकाने तालुक्याची अस्मिता जपण्यासाठी अशा अशांतता निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींना वेळीच रोखण्यासाठी कटिबद्ध राहावे, असे आवाहन करताना शांततेने आणि सुसंस्कृत राजकीय वाटचालीने आपल्याला तालुक्याची प्रगती साधायची असल्याने सर्वांनी हीच आपली शांतता व सुसंस्कृत राजकारणाची वाटचाल कायम ठेवावी असे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे.
वारकरी संप्रदायाकडून निषेध
वारकरी संप्रदायाला संत परंपरेचा मोठा वारसा आहे. मात्र सध्या अनेक कीर्तनकार लोकप्रियतेसाठी जातिभेद असे वाद निर्माण करून कीर्तनात वाहवा मिळवत आहे. वारकरी संप्रदाय हा भेदभाव न करता मानवतेचा संदेश देणारा आहे. तथाकथित कीर्तनकारांनी एका राजकीय पक्षाची बाजू घेऊन भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेणे चुकीचे असून झालेल्या प्रकाराबद्दल संगमनेर तालुका वारकरी संप्रदायाच्यावतीने निषेध नोंदवण्यात आला आहे.