अहिल्यानगर । नगर सहयाद्री
कधीकाळी पहाटेच्यावेळी घरातील महिलां जात्यावर धान्य दळतांना निघनारा जात्याचा मंद असा गरगरनारा आवाज अन त्याला साजेसे गायले जाणारे मंजुळ गाणे काळाच्या ओघात लुप्त पावत गेले.त्याचबरोबर घरातील पाटा, वरवंटा व भाकरी थापण्याचे काठवत, लोखंडी तवा, चुल या जीवनावश्यक वस्तू घरातुन कालबाह्य झाल्या असून त्याची जागा आधुनिक यंत्रसामग्रीने घेतली आहे .बदलत्या काळानुसार आधुनिकीकरण वाढल्यामुळे ग्रामीण संस्कृतीचा अविभाज्य भाग बनलेल्या जुन्या पद्धती, जुनी साधने काळाच्या ओघात नामशेष होत आहेत.
पूर्वीच्या काळी धान्य दळताना महिलांच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या ओव्यांमधून सासरचा, महेरचा, घरातील व्यक्तीचा केलेल्या नामोल्लेखामुळे नात्यातील जिव्हाळा, प्रेम, आपुलकी व ओलावा ओसंडून वाहत होता. ओव्यातून देव देवताबद्दलची अपार श्रद्धा व्यक्त होत असायची. मात्र विज्ञानाने जशी प्रगती केली. तसं तसं ग्रामीण संस्कृतीचा आविभाज्य घटक बनलेल्या अनेक वस्तु लुप्त होत गेल्या.
ग्रामीण संस्कृतीचा बहुमोल खजिना कालबाह्य होत आहे. फक्त घरात लग्न समारंभातचं अडगळीत पडलेले जाते बाहेर काढले जाते. वधू-वरांच्या लगीन घरी हळद दळण्यासाठी जात्याची खास पूजा करण्यात येते. याचबरोबर दगडाच्या वरवंटा पाट्यावर वाटून केलेल्या भाजीची चव काही न्यारीच असते. हे नवीन पिढीला न समजणारे आहे. तसेच आईच्या हाताची काथवटीत थापलेली चुलीवर भाजलेली भाकरी इतिहास जमा झाली आहे.