spot_img
अहमदनगरश्रीेगोंद्यात एकाला पैशाची मस्ती अन् दुसर्‍याला टक्केवारीची!; मतदान संपताच बारामतीकडे रवाना होणार!

श्रीेगोंद्यात एकाला पैशाची मस्ती अन् दुसर्‍याला टक्केवारीची!; मतदान संपताच बारामतीकडे रवाना होणार!

spot_img

राहुल जगतापांचा पॅटर्न भावू लागला! कोणता साक्षात्कार झाला म्हणून, महायुतीचं समर्थन करणार्‍या ताई अचानक विरोधात बोलू लागल्या? / पाचपुते- नागवडे यांची मिलीभगत संपविण्यासाठी ‘रोडरोलर’ | गाडीत लाख सापडले याचा अर्थ उमेदवारी मिळवताना खोक्यातच मोजले हे स्पष्ट झाले!

थेट भेट / शिवाजी शिर्के

श्रीगोंद्यातील जनतेला पाचपुते आणि नागवडे या दोन घराणांनी कायम झुलवत ठेवले. या दोघांनाही त्यांच्याच घरात सत्ता पाहिजे असते आणि त्या सत्तेच्या माध्यमातून तालुक्यातील जनतेला कायम बटीकासारखं ठेवण्याच काम ते करत आलेत. दोन दिवस आधी महायुतीचं समर्थन करणार्‍या, लाडक्या बहिण योजनेचं कौतुक करणार्‍या आमच्या ताईंना अचानक साक्षात्कार झाला आणि त्या या विरोधात बोलू लागल्या! नागवडेंना पैशाची मस्ती असल्याचे त्यांनी स्वत:च दाखवून दिले आहे. दोन तासात उमेदवारी मिळवणार्‍यांच्या मुलाच्या गाडीत दोन लाखाची रोकड सापडली असली तरी ही रक्कम मोठी आहे. प्रकरण दडपून रक्कम कमी केलीय! मात्र, यावरुन अंदाज येतो की त्यांनी मुंबईत मातोश्रीवर किती खोके मोजले असतील! पस्तीस वर्षे ज्यांच्या ताब्यात तालुका दिला, त्यांनी कायमच कमिशनच्या टक्केवारीत आनंद मानला. कधीकाळी दोन-तीन टक्यांनी चालणारा कारभार या पाच वर्षात वीस टक्क्यांवर गेला. त्यांनी आणलेल्या निधीचा आकडा जर ते हजार कोटी सांगत असतील तर त्याच्या वीस टक्के म्हणजे दोनशे कोटीचे कमिशन यांना मिळाले. त्यांनी टक्केवारी घेतली नसती तर कामांचा दर्जा अधिक चांगला दिसला असता. या दोघांचीही मिलीभगत मिटवून टाकण्यासाठी तालुक्यातील जनतेने मला उभे केले आणि त्याच जनतेने मला ‘रोडरोलर’ हे निवडणूक चिन्ह मिळवून दिले. आता हा रोडरोलर या दोघांच्याही पापाचा घडा भरवण्यासाठी सज्ज़ झालाय. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार राहुल कुंडलिकराव जगताप यांनी ‘नगर सह्याद्री’ सोबत बोलताना त्यांची भूमिका मांडली.

बापूंनी कपाळावर हात मारला असता आणि यांना वाड्यातून हाकलून लावले असते!
स्व. कुडलिकतात्या आणि स्व. शिवाजीबापूंच्या विचारांचा मीच खरा वारसदार अन् मीच होणार आमदार यात आता शंका राहिलेली नाही. खरं तर आमदारकी मिळविण्यासाठी आठ दिवसातील यांची चार पक्षांतरे पाहून बापूंनी कपाळावर हात मारला असता आणि यांना वाड्यातून हाकलून लावले असते! याआधीही त्यांनी भाजपाची उमेदवारी केली होती. त्यावेळी बापू हयात होते. मात्र, त्यांनी कधीही त्यांच्या गळ्यात भाजपचा पंचा टाकला नव्हता. सातत्याने वेगळा विचार त्यांनी जपला.

अर्धी- चतकोर भाकरी बापूंनी गरीबाच्या झोळीत टाकली, यांनी ती काढून घेतली!
२०१२ मध्ये मी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकारणात आलो. त्या दिवसापासून मी शरद पवार, स्व. कुंडलिक तात्या आणि स्व. शिवाजी बापू नागवडे या तीघांनाही दैवत मानले आहे. आजच यांचे फोटो वापरतो असे नाही. त्यांचे विचार आणि वारसा चालवण्याची क्षमता फक्त माझ्यातच असल्याचे स्व. बापूंनी मला आशीर्वाद देताना म्हटले होते. त्यांनी बापूंचा विचार, त्यांची शिकवण हे कधीच वांगदरीतील वाड्यात अडगळीला टाकून दिलेत. त्यामुळे स्व. बापूंचे आचार- विचार आणि त्यांची शिकवण समाजासमोर नेण्याचे काम मला करावे लागत आहे. तात्या-बापूंना गोरगरीबांबद्दल कणव होती. यांचे काय? बापूंच्या दारात कोणीही गोरगरीब गेला तर त्याच्या झोळीत अर्धी- चतकोर भाकरी पडायची! यांच्या दारात कोणी गेलं तर हे त्याच्या झोळीतील भाकरी काढून घेऊ लागले असल्याचे वास्तव आहे.

पाण्याच्या बाबत अजितदादा- वळसेपाटलांसमोर बोला; मी तुमचा सत्कार करतो!
पुणेकर पाणी पळवतात, त्यांच्या ताब्यातून पाणी आणण्याचे काम पाचपुतेच करू शकतात असा दावा ते करत आहेत. शरद पवार, अजितदादा, वळसे पाटील आदी पुणे जिल्ह्यातील नेत्यांसोबत हेच पाचपुते दादा मंत्रालयीन बैठकांमध्ये मांडीला मांडी लावून बसत होते! त्यावेळी त्यांच्यासोबत चहा घेताना त्यांनी कधीच या विषयावर बोललेले मला आठवत नाही! त्यांच्यात धमक असेल तर त्यांनी हा आरोप थेट अजितदादा- वळसे पाटील यांच्यासमोर उभे राहून नजरेला नजर लावून करावा, मी त्यांचा महम्मद महाराजांच्या पटांगणात जाहीर सत्कार करील! वास्तव मांडण्याचे आणि त्यावर काम करण्याचे काम त्यांनी कधीच केले नाही. जनतेची दिशाभूल करण्याचा जुनाच डाव आणि खेळ त्यांनी आता पुन्हा सुरू केल्याचे दिसतेय!

घोड- कुकडीसह साकळाईसाठी आमदारकी पणाला लावणार!
श्रीगोंदा व नगर तालुक्याचा पाणी प्रश्न निकाली काढण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे. घोड आणि कुकडीतून मिळणारे तालुक्यासाठीचे हक्काचे पाणी आता कोणीही रोखू शकणार नाही. साकळाई ही महत्वपूर्ण योजना नगर तालुक्याला वरदान ठरणारी आहे. या योजनांसाठी आमदारकी पणाला लावण्याचा मी शब्द देत आहे. ज्यांनी ३५ वर्षे या विषयावर मतदारांना झुलवले, त्यांनी प्रायश्चित्त घेण्याची गरज आहे. गेंडयाच्या कातडीचे ते झाले असल्याने ते प्रायश्चित्त घेणार नाहीत. कर्मचार्‍यांच्या पगारावर पोराबाळांचे लग्न लावणार्‍यांना या विषयाचे काहीच सोयरसुतक नाही. मात्र, दोन्ही तालुक्यासाठी महत्वपूर्ण असणारा हा पाणी विषय मार्गी लावण्यासाठी आमदारकी पणाला लावून हा विषय पुढच्या निवडणुकीत चर्चेत राहणार नाही असा शब्द मी यानिमित्ताने जनतेला देतो.

मी बोलायला लागलो तर तुम्हाला श्रीगोंदा सोडून जावं लागेल!
पैशांची घमेंड, मस्ती श्रीगोंद्यातील जनतेला चालत नाही. तुम्ही सारे काही विकत घेऊ शकत असला तरी जनतेचा स्वाभीमान विकत घेऊ शकत नाही. या दोघांनीही तालुक्याला एक-दोनदा नव्हे अनेकदा फसवले आहे. दोघे मिळून तालुका खात आहेत. यावेळी तिसरा पर्याय म्हणून मी पुढे आल्याने या दोघांचेही मानसिक संतुलन बिघडल्यासारखे दिसते. या दोघांच्या कर्तबगारीने अनेकांना त्रास दिला. त्याबद्दल मी बोलू लागलो तर त्यांना श्रीगोंदा सोडून निघून जाण्याची वेळ येईल.

 पाचपुते- नागवडे या दोघांनाही एकाचवेळी घरी बसविण्यासाठी जनतेनेच निवडणूक हाती घेतली!
आघाडीने उमेदवारी नाकारल्यावर मी नाराज झालो आणि श्रीगोंद्याकडे निघालो. दुसर्‍या दिवशी हजारो कार्यकर्ते घरी आले. आईने आशिर्वाद दिला आणि सार्‍यांनीच लढा असा आग्रह धरला. जनतेचे प्रेम पाहून त्यांना वार्‍यावर सोडायचे नाही ही भूमिका घेतली आणि लढण्याचा निर्णय घेतला. प्रतिकूल परिस्थितीत जनता सोबत असेल तर आपल्याला न्याय मिळतो ही शिकवण मला स्व. तात्यांनी दिलीय आणि त्याचा अनुभव मी याआधीही घेतलाय आणि या निवडणुकीत देखील यश मिळणार यात आता शंका नाही. मतदारसंघातील जनतेला नागवडे- पाचपुते या दोघांनीही कायम झुलवत ठेवले. त्यांच्यामुळेच तालुक्याची अधोगती झाली आणि त्या दोघांच्या कुटुंबाची प्रगती! मात्र, आता जनतेला तिसरा पर्याय मिळालाय आणि एकचवेळी दोघांनाही घरी बसविण्याची संधी देखील मिळालीय! जनतेनेच निवडणूक हातात घेतलीय!

स्व. तात्यांच्या जोडीने बापूंचे आशीर्वाद आणि शरद पवार साहेबांचे पाठबळ हीच माझी शिदोरी!
तालुक्यातील जनतेने मला याआधी एकदा संधी दिली. मात्र, त्यावेळी विरोधकांची सत्ता आली आणि मी विरोधी आमदार म्हणून बसलो. त्यावेळी भिमा नदी पट्ट्यातील रस्तांचा विषय मार्गी लावला.याशिवाय अनेक कामे केली. त्यावेळी तात्या आणि बापू यांचे आशीर्वाद माझ्यासोबत होते. त्यांचे आशीर्वाद, त्यांचे संस्कार आजही माझ्यासोबत आहेत. जोडीने शरद पवार साहेबांचा हात माझ्या पाठीवर आहेत. लढ म्हणणं वेगळं आणि लढण्यासाठी बळ देणं वेगळं! पवार साहेबांनी या दोन्ही गोष्टी सातत्याने मला दिल्यात! आजच्या निवडणुकीतही ते माझ्या पाठीशी असल्याने माझा विजय निश्चित आहे.

आमदार मीच होणार असल्याने मतदान संपताच बारामतीकडे रवाना होणार!
कोणी काही चर्चा करू देत! कोणी कितीही पैसे वाटू देत! मतदार या दोघांचेही पैसे घेणार आणि बटन माझेच दाबणार याची मला खात्री आहे. आमदार मीच होणार आहे. मतदान संपल्यानंतर निकालाची वाट मी पाहणार नाही. कारण जनतेने मला आजच कौल दिला आहे. मतदान संपताच बारामतीकडे माझी गाडी गेलेली तुम्हाला दिसेल. पवार साहेबांच्या चरणी लीन होऊन त्यांना लागलीच मी माझा पाठींबा जाहीर करणार!

श्रीगोंदा शहर विकसीत झालेले दिसेल!
श्रीगोंदा शहर हे तालुक्याचे मुख्यालय असले तरी या तालुक्याच्या ठिकाणी असणार्‍या या शहराला नियोजन पूर्वक विकसीत करण्याचे काम दुर्दैवाने झाले नाही. हे दोघेही बहाद्दर रोज या शहरात पडून आहेत. मात्र, त्यांना या शहराच्या विकासाचे काहीही सोयरसुतक असल्याचे दिसत नाही. पुढच्या दोन वर्षात तुम्ही ज्यावेळी या शहरात याल, त्यावेळी तुम्ही कुठल्यातरी मोठ्या शहरात आलात असा भास झाल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही.

खाबूगिरीत गरीबांना लुटणार्‍या प्रशासनाला पहिल्याच महिन्यात ‘नीट’ करणार!
तालुक्यातील शासकीय कार्यालयात प्रशासन अस्तित्वात नसल्याचा व जनतेची अडवणूक होत असताना पुढारी त्याकडे गांभिर्याने पाहत नसल्याचा आरोप होत आहे. त्यात तथ्य नक्कीच आहे. ३५ वर्षे तालुका सांभाळणारा म्हणणार्‍यांचे खरे तर हे पाप आहे. त्यांना सामान्य जनतेचे काहीच देणेघेणे नाही. टक्केवारी आणि त्यातून अधिकार्‍यांकडून केली जाणारी हप्तेखोरी यातून हे सारे घडले आहे. त्यात सुधारणा होताना दिसत नसल्याने मला जनतेच्या दरबारात यावे लागले आहे. खाबूगिरीत गरीबांना लुटणार्‍या प्रशासनाला निकालानंतरच्या पहिल्याच महिन्यात ‘नीट’ करणार!

दोघांच्याही विरोधात मोठी लाट, म्हणूनच महत्वाच्या संस्था माझ्या ताब्यात!
पाचपुते- नागवडे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे लपून राहिलेले नाही. जिल्हा सहकारी बँकेत मी माझ्या एकट्याच्या हिमतीवर निवडणूक केली आणि शंभरपेक्षा जास्त सोसायट्या माझ्या सोबत आल्या. त्यातूनच मी बिनविरोध निवडून आलो. मागील लोकसभेसाठी हे दोघेही विखेंसोबत होते. तरीही आम्ही नीलेश लंके यांना ३३ हजारांचे लिड दिले. तालुक्यातील बाजार समिती, खरेदी- विक्री, खादी ग्रामोद्योगसह ग्रामपंचायत- सोसायट्या यांनी एकत्र केल्या. तरीही मी त्या संस्था ताब्यात घेतल्यात!  याचाच अर्थ जनतेला या दोघांचाही वीट आलाय! सक्षम पर्याय म्हणून जनतेनेच राहुल जगताप हा पर्याय निवडलाय!

पोरांची लग्न कर्मचार्‍यांच्या पगारातून; देवस्थानच्या जमिनीही तुम्ही लाटल्या!
कारखान्याकडे पैसे थकले होते हे मान्य करतो! कारखाना चालवताना काही तांत्रिक अडचणी येतात! त्या कोणालाही येतात! माझ्यावर आरोप करणार्‍यांनीही ते थकवलेत! त्यातील एकाला तर कारखानाच विकावा लागला! मी सार्‍यांची देणी दिलीत! आम्ही कोणाचे बुडवले नाही. सार्‍यांचे दिले. त्यांनी लुटलेत! त्यांच्या पोरांच्या लग्नासाठी कर्मचार्‍यांचे पगार घेतले! त्यांनी कौटुंबिक कार्यक्रमासाठी कर्मचार्‍यांचे पगार घेतले! दूध संघ कर्मचार्‍यांचे आणि दूध संस्थांची देणी तुम्ही दिलीत का ते आधी पहा! देवस्थानच्या जमिनी यांनी लुटल्यात! देवस्थानच त्यांनी ताब्यात घेऊन खासगी प्रॉर्टी केल्यात!

बापूंच्या नावानं हॉस्पिटलसाठी दहा कोटी जमा केले, त्याची वीट अद्याप का लागली नाही?
आरोप करणार्‍यांबद्दल मी बोलू लागलो तर त्यांना निवडणुकीतून पळ काढावा लागेल. तालुक्यातील जनतेला ज्यांनी भरभरुन प्रेम दिलं, त्या आदरणीय बापूंच्या निधनानंतर त्यांच्या नावाने तालुक्यात सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल उभे करण्याची भूमिका मांडली गेली. त्यासाठी अनेकांनी मदतीचा हात पुढे केला. त्यांच्या ताब्यातील कारखान्यासह अन्य सर्वच संस्थांमधील कर्मचार्‍यांकडून यासाठी सक्तीने वसुली करण्यात आली. एक- एक महिन्याचे पगार घेतले गेले. जवळपास दहा कोटी रुपयांची रक्कम त्यावेळी अवघ्या एका महिन्यात स्व. बापूंवरील प्रेमापोटी जनतेने, कर्मचार्‍यांनी दिली. आज त्याला सहा वर्षांचा कालावधी उलटून गेला. सहा वर्षात या हॉस्पिटलच्या उभारणीसाठी साधी दहा रुपयांची वीट देखील राजेंद्र नागवडे यांनी मांडली नाही. ही रक्कम जनतेची आहे. त्या रकमेचं काय केलं हे आधी सांगा! सहा वर्षात हे हॉस्पिटल उभे राहिले असते आणि अनेकांना आरोग्य सेवा मिळाली असती. मात्र, त्यांना त्याचे काहीही देणंघेणं नाही. कशातही मलिदा खाण्यात तरबेज झालेल्यांना जनतेने ओळखले आहे.

हजारो कोटी आणल्याचे सांगणार्‍यांनी त्यातून काय दिवे लावले हे सांगावे!
चाळीस वर्षात विकास झाल्याचे सांगताना अलीकडील अडीच वर्षात हजारो कोटींचा निधी आल्याचा दावा पाचपुतेंकडून केला जात आहे. त्यात काहीच तथ्य नाही. पस्तीस वर्षे तुम्हीच आमदार होता. त्यावेळी काय केले. गेल्या अडीच वर्षात हजारो कोटी आणल्याचे सांगत असतील तर त्यातून कोणती आदर्शवत कामे झाली? जी कामे झाली त्याचा दर्जा काय? त्या कामांची आजची अवस्था काय? हजारो कोटींचे सोडा हो! फक्त हजार कोटी निधी आणला असे गृहीत धरले तर त्याचे वीस टक्के तर यांच्याच वाट्याला गेले. म्हणजेच दोनशे कोटी गेले.

आमच्या ताईला जिल्हा परिषदेत महिलांच्या सॅनिटरी नॅपकीन पुरल्या नाहीत!
शिवसेनेकडून महिलेला संधी दिलीय आणि बहिण लाडकी झालीय असा प्रचार केला जात आहे. मुळात मला त्यांच्या विषयी आदरच आहे. मात्र, त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये महिला व बालकल्याण समितीच्या सभापती असताना जिल्ह्यातील महिलांसाठी सॅनिटरी नॅपकीन खरेदी केले होते. बाजारातील किमतीपेक्षा जवळपास दहापट जास्तीच्या रकमेने ही खरेदी झाली. सदर विषय जिल्हा परिषदेत चांग़लाच गाजला! महिलांच्या योजनेत आलेले कोट्यवधी रुपये आमच्या याच बहिणीने दहापट जास्तीच्या रकमेने खरेदी दाखवून लुटले! हे उदाहरण नमुनादाखल आहे. जिल्हा परिषदेतील अन्य भानगडी समोर आणल्या तर त्यांना वांगदरीच्या बाहेर देखील पडता येणार नाही!

हेड आणि टेल यातील फरक सांगता का?
पाणी प्रश्नावर ते बोलत असतील तर हेड आणि टेल याच्याच जोडीने खरीपातील पिके कोणती आणि रब्बीची पिके कोणती हे त्यांनी सांगावे असा टोला अनुराधा नागवडे यांचा नामोल्लेख टाळत राहुल जगताप यांनी लगावला. श्रीगोंद्याला पाणी कसे येते, कोणत्या धरणातून येते आणि आवर्तन कसे आणि कोणत्यावेळी सोडले जाते याचा त्यांचा किती गृहपाठ आहे हे जनतेला माहितीय!

३५ वर्षे आमदारकी असतानाही पाणी प्रश्न कायम !
घोड-कुकडीसह तालुक्याचा पाणी प्रश्न आजही कायम आहे. गेल्या पंचेचाळीस वर्षांपैकी ते ३५ वर्षे आमदार राहिले. बापूंचे सात वर्षे आणि माझे पाच वर्षे त्याला अपवाद आहेत! मग, पस्तीस वर्षे यांनी काय केले? तुमच्याकडूनच हा प्रश्न सुटला असता तर आज तालुका कितीतरी पटीने पुढे गेला असता.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमध्ये आधी केलंय आता पारनेरमध्ये करुन दाखवणार; नेमकं काय म्हणाले संदेश कार्ले पहा..

नगरप्रमाणेच पारनेर तालुक्यातील प्रचार दौर्‍याला उत्स्फूर्त प्रतिसाद पारनेर | नगर सह्याद्री विधानसभा निवडणूक म्हटलं...

भुजबळांच्या बालेकिल्ल्यातच मनोज जरांगें कडाडले; म्हणाले मी ठरवलं तर…

नाशिक / नगर सह्याद्री - मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. काही...

राज्यात सत्तांतर होणार; शरद पवार यांनी सांगितले खरे कारण…

पुणे / नगर सह्याद्री – लोकसभा निवडणुकीत पक्षफोडी करणाऱ्या भाजपला जनतेने नाकारले आहे. तीच...

झुंडशाहीला लगाम घालण्यासाठी पुढे या!; काशिनाथ दाते काय म्हणाले पहा…

पारनेरमधील महायुतीचे उमेदवार काशिनाथ दाते यांचे मतदारांना पाच वर्षापूर्वीची चूक दुरुस्त करण्याचे आवाहन पारनेर |...