सचिन साबळे अन् प्रसाद साबळे दोघांचाही घातपात झाल्याचा संशय | संशयाची सुई संदीप थोरात याच्यावर | संशयास्पद मृत्यूची फाईल उघडण्याची आधार फाउंडेशनची मागणी
स्पेशल रिपोर्ट | शिवाजी शिर्के
जादा परताव्याचे अमिष दाखवत अनेकांना गंडा घालणाऱ्या संदीप थोरात याने मोठा गफला केल्याचे उघड झाले असून त्यातून मिळालेल्या रकमेतून त्याने रायगड जिल्ह्यात जमिनी घेतल्याची बाब समोर आली आहे. जवळच्या नातेवाईकांच्या नावे थोरात याने या जमिनी घेतल्या असून यासाठी संदीप थोरात याने त्याच्या विश्वासातील विश्वास पाटोळे याच्यावर जबाबदारी सोपविल्याचे समोर आले आहे. रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यातील वावेमांद्रज या गावातील सपना कदम आणि श्रीकांत कदम यांच्या मालकीची जमिन दि. 26 नोव्हेंबर 2024 रोजी खरेदी करण्यात आली आहे. संदीप थोरात याने त्याच्या अत्यंत जवळच्या नातेवाईकाच्या नावे ही खरेदी केली असल्याची कागदपत्रेच समोर आली आहेत. दरम्यान, संदीप थोरात याच्यासोबत कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या सचिन साबळे आणि प्रसाद साबळे या दोघांचाही संशयास्पद मृत्यू झाला असून त्यांचा घातपात संदीप थोरात यानेच केला असल्याचा संशय व्यक्त करत सदर प्रकरणाची फाईल पुन्हा उघडून त्याची चौकशी करण्याची मागणी आधार फौंडेशनच्या सचिन थोरात आणि अश्विन शिंदे यांनी पोलिस अधीक्षकांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. या दोघांनाही संदीप थोरात याच्या आर्थिक नाड्या माहिती होत्या आणि त्याने कोणाला कसे फसवले याचीही माहिती असल्याने संदीप थोरात यानेच त्यांचा घातपात केला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे.
नगर आणि महाबळेश्वरला घेतले राज्याचे अधिवेशन!
कंपनी कायद्यानुसार स्थापन झालेल्या निधी कंपन्यांचे महाराष्ट्र राज्य निधी डेव्हलपमेंट असोसिएशन स्थापन करुन त्याचे राज्यस्तरीय अधीवेशन संदीप थोरात याने नगरमध्ये घेतले होते. याचवेळी त्यानी महाबळेश्वर येथेही दोन दिवसांचे अधीवेशन घेतले. महाबळेश्वर येथील अलिशान हॉटेलमध्ये हे अधीवेशन झाले. राज्यभरातील निधी कंपन्यांचे प्रतिनिधी त्यासाठी निमंत्रीत करण्यात आले. त्यांच्याकडून प्रत्येकी सात हजार रुपये शुल्क आकारण्यात आले. याशिवाय नगरमध्ये एका हॉटेलमध्ये दि. 18 फेब्रुवारी 2019 रोजी एक दिवसाची निधी परिषदही घेण्यात आली होती.
सचिन साबळे याच्यावर होती सीइओ म्हणून जबाबदारी!
संदीप थोरात याच्या अत्यंत विश्वासू गोटातील कर्मचारी म्हणून सचिन साबळे हा राहिला. त्याच्या नावावर वेगवेगळ्या कंपन्या दाखवून संदीप थोरात याने त्याचा जसा गैरफायदा घेतला तसाच त्याने त्याच्यावर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या टाकूनही घेतला. नगर आणि महाबळेश्वर येथील निधी कंपन्यांच्या राज्यस्तरीय कार्यशाळा आणि बैठकांच्या नियोजनाची जबाबदारी संदीप थोरात याने याच सचिन साबळे याच्यावर दिली होती. त्यासाठी त्याला राज्यस्तरीय राज्य निधी डेव्हलपमेंट असोसिएशनचे सीईओ म्हणून नियुक्त केले होते. त्यावेळी या अनुषंगाने प्रसारीत करण्यात आलेल्या पत्रकांमध्ये आणि बातम्यांमध्ये सचिन साबळे याचा सीईओ म्हणून उल्लेख असल्याचे पुरावेही समोर आले आहेत.
गोरगरिबांचे पैसे बायकोच्या ‘माहेर’मध्ये गुंतवले!
संदीप थोरात याने सह्याद्री मल्टीनिधी कंपनीच्या विविध 19 शाखा दाखवल्या. त्या माध्यमातून नगर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून त्याने मोठ्या प्रमाणात पैसे जमा केले. जमा झालेल्या या पैशातून संदीप थोरात याने त्याच्या पत्नीच्या नावे माहेर ही वेगळी कंपनी स्थापन केली. ब्युटी पार्लरच्या नावाखाली ही कंपनी कार्यरत असल्याचे दाखवले. या कंपनीचे अत्यंत प्रशस्त असे ब्युट पार्लरही सुरू करण्यात आले. त्यासाठी संदीप थोरात याने सह्याद्री मल्टीनिधीतील सुमारे चाळीस लाख रुपये पार्लरच्या उभारणीत घातल्याची बाबही समोर आली आहे.
निधी कंपन्यांना एकत्र करत त्याचे फेडरेशन अन् त्याचा स्वयंघोषित अध्यक्ष!
राज्यभरात निधी कंपन्यांनी धुमाकूळ घातला असताना या कंपन्यांना एकत्रीत करण्याचे काम संदीप थोरात याने केले. राज्य आणि देशपातळीवर मल्टीस्टेट पतसंस्थांचे फेडरेशन आहे. काका कोयटे, सुरेश वाबळे, वसंत लोढा ही सहकारात काम करणारी दिग्गज मंडळी या फेडरेशनच्या माध्यमातून पतसंस्था चळवळीत काम करतात. त्यांच्या सारखेच आपणही राज्याचे नेते झालो असल्याचे संदीप थोरात याला वाटू लागले आणि त्याने राज्यभरातील निधी कंपन्यांना एकत्र करण्याची मोहीम राबवली. त्यातून काही कंपन्यांना हाताशी धरत त्याने राज्य निधी डेव्हलपमेंट असोसिएशनची स्थापना केली. या फेडरेशनची नोंदणी झाल्याचे आणि संदीप थोरात यांची राज्याच्या अध्यक्षपदी निवड झाल्याच्या बातम्या लागलीच त्याने छापून आणल्या. स्वत:च्याच अभिनंदनाची फ्लेक्स बोर्ड त्याने लावले. या फेडरेशनच्या उपाध्यक्षपदी महेंद्र गरुड यांची निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. यानंतर त्या माध्यमातून काम करत असताना सचिन साबळे याला या असोसिएशनचा म्हणजेच फेडरेशनचा सेीईओ म्हणून नियुक्त करण्यात आल्याचे दाखविण्यात आले. नगरमध्ये पहिली बैठक आणि कार्यशाळा दाखविण्यात आल्यानंतर महाबळेश्वर येथील राज्यस्तरीय दोन दिवसांची कार्यशाळाही घेण्यात आली. संदीप थोरात याने या साऱ्या भूमिका इतक्या बेमालूमपणे वठवल्या की त्याच्यावरचा विश्वास वाढत गेला. मात्र, काही दिवसातच त्याचा खोटेपणा समोर आला आणि अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या! अनेकांना ठेवींवर पाणी सोडावे लागले.