शिवाजी शिर्के | नगर सह्याद्री
दिल्लीत सध्या ज्या बैठकांचा जौर वाढला. त्यातून कुछ तो गडबड है, असं म्हणायला स्कोप नक्कीच आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानंतरच्या दुसऱ्या दिवशी राजकीय हालचाली गतीमान होणार आणि त्यांना त्यांच्याच पक्षाचे पाच खासदार सोडचिठ्ठी देणार असल्याबाबत यापूव सर्वात आधी ‘नगर सह्याद्री’ने वृत्त प्रकाशित केले होते. त्यावर शिक्कामोर्तब होत असताना आता दिसत आहे. दि. 13 डिसेंबर रोजी कार्यकर्त्यांची बैठक रद्द झाली असली तरी खासदारांची बैठक भाजपा नेत्यांसोबत झालीय हे नक्की!
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहकुटुंब दिल्लीतील निवासस्थानी गुरुवारी भेट घेतली. या पाठोपाठ उद्योगपती गौतम अदानी यांच्या दिल्लीतील घरी शरद पवार गटातील एक बडा नेता आणि भाजपच्या एका केंद्रीय नेत्याची बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीमुळे शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपसोबत सत्तेत सहभागी होणार का? अशी चर्चा रंगली.
केंद्रात आणि राज्यात महायुतीची आलेली स्पष्ट बहुमताची सत्ता पाहता विरोधात निवडून आलेल्या खासदारांसह आमदारांच्याही मनात विकास कामांबाबत साशंकता निर्माण झाली आहे. विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदारांनी सत्तेशिवाय कामे माग लागणार नाहीत अशी भूमिका दि. 4 डिसेंबर रोजीच्या गु्प्त बैठकीत घेतली. त्याच दरम्यान, नगरचे खासदार निलेश लंके यांनी ‘गुड न्यूज’ देणार असल्याचं भाकीत वर्तवले होते.
केेंद्रातील भाजपाची सत्ता अधिक बळकट करण्यासाठीच्या हालचाली गतीमान असताना राज्यात विधानसभेचा निकाल लागला आणि त्यात पवार गटासह महाविकास आघाडीला अपयश आले. राज्यातील सरकार स्पष्ट बहुमताने आले असताना देशातही भाजपाचीच सत्ता! या परिस्थितीत मतदारसंघातील कामे माग लावायची असतील तर सत्तेशिवाय पर्याय नसल्याचे मत खासदारांनी मांडले आहे.
त्याचाच एक भाग म्हणून पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हजेरी लावत त्यांना शुभेच्छा देऊन बाहेर पडलेल्या पाच खासदारांपैकी एकाने केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीचा संबंध खासदार फुटीशी लावला जाताच ही भेट मतदारसंघासाठी होती अशी पुष्टी त्यांनी जोडली. कारणे काहीही सांगितली जात असली तरी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गडबड नक्कीच आहे. येत्या काही दिवसात ही गडबड अधिक स्पष्टपणे समोर येणार हे नक्की!
अजित पवार यांच्यासोबत जाण्यात अनुकुलता!
लोकसभा निवडणुकीत भाजपाला नाकारत मतदारांनी आपल्याला निवडले असल्याने कोणत्याही परिस्थितीत भाजपा सोबत जायचे नाही असा निर्धार बंडखोरीच्या पवित्र्यात असणाऱ्या खासदारांनी घेतल्याचे वृत्त आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जायचे आणि तसे करताना पवार काका- पुतण्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करायचा अशी भूमिका घेतल्याचेही समोर आले आहे. मात्र, त्यात यश आले नाही तर अजित पवार यांच्यासोबत जाऊन मतदारसंघातील कामे माग लावण्याची भूमिका यातील काहींनी घेतल्याचे समजते.
नीलेश लंके होऊ शकतात समन्वयक!
नगरचे खासदार नीलेश लंके यांचे शरद पवार आणि अजित पवार या दोघांशीही संबंध आहेत. पवारांचा कालचा वाढदिवस नीलेश लंके यांना तलवारीने केक भरवून साजरा झाला. अजित पवार यांच्यासोबत लंके यांचा चांगला डायलॉग आहे. पवार काका- पुतण्यांमध्ये समन्वय घडवून आणत दोन्ही राष्ट्रवादीचा मेळ घालण्याची जबाबदारी नीलेश लंके हे घेताना दिसल्यास आश्चर्य वाटू नये. सत्तेशिवाय कामे होणार नसल्याचे आणि विरोधात राहिल्यास आपल्यासह कार्यकर्त्यांची कशी गळचेपी होते याचा अनुभव लंके यांना गेल्या दोन- अडीच वर्षात सर्वाधिक आला आहे. त्यामुळे लंके हेच पवार काका- पुतण्यांमध्ये समन्वयक म्हणून दिसल्यास आश्चर्य वाटू नये!