अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
महाराष्ट्र कुणाचा? महायुती की महाविकास आघाडी? सत्तेत कोण आणि विरोधी बाकावर कोण बसणार? हे आज, म्हणजेच २३ नोव्हेंबर २०२४ रोजी स्पष्ट होईल. सकाळी ८ वाजतापासूनच मतमोजणीला सुरुवात होईल. उमेदवारांची आणि त्यांच्या समर्थकांची धाकधूक वाढली आहे. दरम्यान, अहिलानगरच्या १२ मतदारसंघाच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांना धक्का बसताना दिसत असून महाविकास आघाडीचे नेते पिछाडीवर आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून पिछाडीवर दिसते.
संगमनेर मतदारसंघातील काँग्रेसचेष्ठ नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात तब्बल 11 हजार मतांनी पिछाडीवर होते. नेवासा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आमदार शंकरराव गडाख देखील पिछाडीवर पडलेले दिसतात. श्रीगोंदा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अनुराधा नागवडे या देखील पिछाडीवर आहेत.
राज्याचे लक्ष लागलेल्या कर्जत-जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारपक्षाचे नेते आमदार रोहित पवार आणि भाजपचे आमदार प्रा. राम शिंदे यांच्यात कांटे की टक्कर आहे. राहुरी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आमदार प्राजक्त तनपुरे आणि भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्यात देखील जोरदार टक्कर सुरू असून, तिथं आठव्या फेरीपर्यंत शिवाजी कर्डिले आघाडीवर आहेत.
शिर्डीत पहिल्या फेरीपासून भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे पहिल्यापासून आघाडीवर आहेत. अहिल्यानगर शहर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप देखील पहिल्या फेरीपासून आघाडीवर आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वात जास्त मताधिक्य कोपरगाव मतदारसंघातील आमदार आशुतोष काळे यांनी सातव्या फेरीपर्यंत 61 हजार 742 घेतले होते. शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात अपक्ष उमेदवार माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील आघाडीवर होते. अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदार संघापैकी 09 मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत.