मुंबई । नगर सहयाद्री:-
कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस झाला असून, अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. कोल्हापूर, सांगली, हिंगोली आणि रत्नागिरीमध्ये पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सप्टेंबरच्या अतिवृष्टीनंतर परतीचा पाऊस आणि आता अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
हवामान खात्याचे तज्ज्ञ मयुरेश प्रभुणे यांनी सांगितले की, मध्यपूर्व अरबी समुद्रावर तयार झालेला कमी दाबाचा पट्टा पुढील 3-4 दिवस उत्तर दिशेला सरकणार असून, कोकण आणि विदर्भात मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचबरोबर आग्नेय बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे 27 ऑक्टोबरला चक्रीवादळ तयार होऊ शकते, जे वायव्य दिशेने आंध्र प्रदेश आणि ओडिशा किनारपट्टीकडे सरकेल.
पावसाचे अलर्ट:
25 ऑक्टोबर: राज्यभरात यलो अलर्ट; नांदेड, हिंगोली, कोल्हापूर वगळता सर्व ठिकाणी पाऊस शक्य
26 ऑक्टोबर: मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, नगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड व संपूर्ण विदर्भात यलो अलर्ट
27 ऑक्टोबर: रायगड, पुणे, नगर, बीड, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, नागपूर व गडचिरोली यलो अलर्ट; उर्वरित भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता
28 ऑक्टोबर: सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नांदेड, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली यलो अलर्ट; दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलका पाऊस
तळकोकणात पावसाची रिपरिप सुरु आहे, त्यामुळे सिंधुदुर्गमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. मासेमारी ठप्प झाली असून, अनेक मच्छीमारी बोटी सुरक्षित आश्रयात आहेत. भात कापणीवर पावसाचा प्रतिकूल परिणाम होत असल्याने शेतकऱ्यांना मोठी आर्थिक तंगी भोगावी लागू शकते.



