नवी दिल्ली / वृत्तसंस्था –
मराठा आरक्षणासंदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. मराठा आरक्षणाच्या जीआरला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे. मुंबई हायकोर्टाने मागच्या आठवड्यामध्ये हैदराबाद गॅझेटियरचा जीआर कायम राहणार असल्याचा मोठा निर्णय घेतला होता. याच निर्णयाला आव्हान करत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. बुधवारी याचिकाकर्त्यांनी हे हे प्रकरण मेंशन केले होते. सुप्रीम कोर्ट उद्या यावर काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबई हायकोर्टाने गेल्या आवठड्यामध्ये मराठा आरक्षणासंदर्भातील हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीला मान्यता देणाऱ्या शासन निर्णय म्हणजे जीआरला अंतरिम स्थदिती देण्यास नकार दिला होता. या निर्णयामुळे राज्य सरकारला दिलासा मिळाला. हायकोर्टाच्या याच निर्णयाला आव्हान देत आता सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील ऐन गणेशोत्सवात मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले होते. सरकारने मागण्या मान्य केल्यानंतर मनोज जरांगेंनी उपोषण मागे घेतलं. यावेळी सरकारने त्यांची हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीची मागणी मान्य करत जीआर काढला होता. या शासन निर्णयाविरोधात विविध संघटनांनी हायकोर्टात याचिका दाखल करत या आदेशाला आव्हान केले होते.
हा जीआर रद्द करावा अशी मागणी करण्यात आली होती. पण हायकोर्टाने आम्ही कोणताही अंतरिम दिलासा देण्यास सध्या इच्छुक नाही असे कोर्टाने सांगितले होते. त्यामुळे याचिकाकर्त्यांना धक्का बसला होता. आता हायकोर्टाच्या या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले आहे.