आयुक्त यशवंत डांगे | नवीन वर्षातील करवसुलीला सुरुवात | 10 टक्के सवलतीचा लाभ घ्यावा
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
नागरिकांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे मागील आर्थिक वर्षात महानगरपालिकेने विक्रमी कर वसुली केली आहे. आता नवीन वर्षात 100 कोटी वसुलीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून कर भरणा सुरू झाला आहे. सावेडी प्रभाग समिती कार्यालयात आगाऊ कर भरणाऱ्या पाच नागरिकांचा सत्कार करण्यात आला आहे. मालमत्ताधारकांनी नियमित कराचा भरणा करावा व एप्रिल महिन्यात देण्यात येणाऱ्या संकलित करावरील 10 टक्के सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.
महानगरपालिका प्रशासनाकडून नवीन आर्थिक वर्षातील कराची बिले तयार केली जात आहेत. लवकरच त्याचे वितरणही सुरू होणार आहे. एप्रिल महिन्यात संकलित करावर 10 टक्के सवलत दिली जाते. नियमित कर भरणाऱ्या मालमत्ताधारकांनी बिले तयार होण्याआधीच आगाऊ कर भरण्यास सुरुवात केली आहे. त्यांना सवलतीचा लाभ देण्यात आला असून सावेडी प्रभाग समिती कार्यालयात त्यांचा सत्कारही करण्यात आला आहे. नागरिकांच्या सोयीसाठी प्रत्येक शनिवारी, तसेच सर्व शासकीय सुट्टीच्या दिवशी दुपारी 2 वाजेपर्यंत वसुलीचे कामकाज व कार्यालय सुरू राहणार आहेत.
नवीन आर्थिक वर्षात महानगरपालिकेने 100 कोटींच्या वसुलीचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यादृष्टीने वसुलीचे नियोजन सुरू आहे. या आर्थिक वर्षात महानगरपालिकेने शास्तीमध्ये सवलत न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे थकबाकीदारांनीही तत्काळ थकीत कराचा भरणा करावा. थकबाकीदारांची यादी तयार करण्यात येत आहे. पुढील आठवड्यापासून थकबाकीदारांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले आहे.