मुंबई | नगर सहयाद्री
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ लाभार्थी महिलांसाठी दिलासादायक माहिती समोर आली आहे. योजनेच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर जुलै महिन्याचा हप्ता लवकरच खात्यात जमा होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
८ दिवसांत मिळणार ₹१५००
योजनेचा १३ वा हप्ता येत्या आठ दिवसांत खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. जुलै अखेर किंवा ऑगस्टच्या ५ तारखेपर्यंत रक्कम लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केली जाईल, असे सांगण्यात आले आहे. जूनपर्यंतचे सर्व हप्ते जमा झाले असून, जुलैचा हप्ता लवकरच मिळणार आहे.
दर महिन्याला मिळतात ₹१५००
राज्य शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या या योजनेत पात्र महिलांना दर महिन्याला ₹१५०० ची आर्थिक मदत दिली जाते. गेल्या काही महिन्यांपासून हप्ता उशिराने मिळत असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे यावेळीही जुलैचा हप्ता महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे.
२ कोटींपेक्षा जास्त महिलांना लाभ
या योजनेचा प्रारंभ तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. सुरुवातीला २ कोटींपेक्षा अधिक महिलांनी अर्ज केले होते. मात्र, अलीकडच्या काळात योजनेच्या पडताळणी प्रक्रियेमध्ये जवळपास १० लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे.
नवीन पात्रतेनुसार यादी तयार होणार
महिला व बालविकास विभागाला नवीन पात्र यादी तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये निकषात न बसणाऱ्या अर्जदारांना वगळून, पात्र लाभार्थींना पुढील हप्ते नियमितपणे दिले जातील.