अहमदनगर | नगर सह्याद्री
नगर शहर विधानसभा मतदारसंघात दुबार नावे, स्थलांतरित व मयत व्यक्तींची नावे असणार्या मतदार यादीवर मविआने हरकत घेतली आहे. याद्वारे मतदानाच्या दिवशी बोगस मतदान घडवून आणण्यासाठी प्रशासनाला हाताशी धरून काही सत्ताधारी राजकीय मंडळींनी सुनियोजित षडयंत्र रचल्याचा आरोप यापूर्वीच मविआने केला आहे. त्यानंतर निवडणूक प्रशासन जागे झाले असून मतदारांना नोटीसा बजविण्याचे काम सुरू केले आहे. हा निवडणूक प्रशासनाचा गलथान कारभार आहे. नोटिसा माञ मतदारांना बजावल्या जात आहेत. प्रशासनाने मतदारांना वेठीस धरणे तात्काळ थांबवावे असा इशारा महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेऊन दिला आहे.
याबाबत शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे, राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर, शिवसेना शहर प्रमुख संभाजीराव कदम यांच्यासह विक्रम राठोड, किशोर कोतकर, बाळासाहेब बोराटे, संजय झिंजे, मनोज गुंदेचा, दत्ता जाधव, विलास उबाळे, पप्पू भाले, उमेश भांबरकर, नलिनी गायकवाड, उषा भगत, सुजित क्षेत्रे, अभिनय गायकवाड, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. मविआने पत्रकार परिषद घेत प्रशासनावर शरसंधान साधण्यात आले.
यावेळी मविआने म्हटले की, खा.डॉ.निलेश लंके यांच्यासह तिन्ही पक्षांनी निवडणूक प्रशासनाकडे लेखी हरकत घेतल्यानंतर झोपी गेलेले प्रशासन खडबडून जागे झाले आहे. शहरातील तथाकथित कार्यसम्राट नेत्याशी संगनमत करत केलेल्या बोगस मतदार नोंदणीच्या स्कॅमचा भांडाफोड मविआने केला. आता प्रशासनाच्या मतदारांना नोटीसा म्हणजे मतदारांमध्ये गोंधळ निर्माण करण्याचे कुटील षडयंत्र असल्याचा आरोप नगर शहर मविआच्या नेत्यांनी केला आहे.
प्रांताधिकारी, तहसीलदारांना नोटिसा बजवायला हव्या होत्या
मविआने यावेळी म्हटले की, स्वतः संगनमत करत ज्या प्रशासनातील लोकांनी राजकीय नेत्यांच्या दबावातून मतदारांची फसवणूक करून त्यांच्या नावाचा गैरवापर करत दुबार नोंदणी केली आहे त्यांना नोटीसा बजवायला हव्या होत्या. यामध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणून नगर भागाचे प्रांताधिकारी व नगरचे तहसीलदार यांच्यावर प्रमुख जबाबदारी आहे. आम्ही जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे याबाबत लेखी तक्रार केली आहे. सर्वसामान्य मतदारांना नोटिसा बजावण्या ऐवजी प्रांताधिकारी, तहसीलदार यांना त्यांच्या गलथान कारभाराबद्दल नोटिसा बजवायला हव्या होत्या. मतदारांना नोटीसा म्हणजे ’चोर सोडून संन्याशाला फाशी’ असे म्हणण्याची दुर्दैवी वेळ आली असल्याचे यावेळी मविआ नेते म्हणाले.