पारनेर | नगर सह्याद्री
तालुक्यात गेल्या दोन ते तीन दिवसापासून सतत मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामध्ये शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. खडकवाडी येथील शेतकरी विकास रोकडे यांच्या नऊ एकर क्षेत्रावर असलेल्या झेंडू पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. ही झेंडूची फुले बाजारात विकण्या योग्य न राहिल्यामुळे ती फेकून द्यावी लागणार आहेत. खडकवाडी परिसरातील तसेच तालुक्यातील नुकसान झालेल्या सर्व शेती पिकाचा पंचनामा कृषी अधिकाऱ्यांनी करावा या संदर्भात सूचना देण्यात आल्या असून सबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करून शेतकरी वर्गाला न्याय देणार असल्याचे आमदार काशिनाथ दाते यांनी सांगितले आहे.
खडकवाडी येथील विकास रोकडे यांच्या नुकसान झालेल्या शेतीमध्ये जाऊन आमदार दाते यांनी भेट दिली व संबंधित अधिकाऱ्यांना पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यावेळी कृषी अधिकारी तसेच तलाठी व यावेळी शेतकरी विकास रोकडे, डॉ. किशोर उर्फ बाबासाहेब ढोकळे, किरण वाबळे, साबाजी गागरे, विकास रोकडे, पंकज गागरे, गणेश चौधरी, काशिनाथ रोहकले, अरुण गागरे, सखाराम नवले, प्रसाद कर्णावट, अक्षय ढोकळे, आदी खडकवाडी येथील ग्रामस्थ शेतकरी यावेळी उपस्थित होते. खडकवाडी येथील प्रगतिशील शेतकरी विकास विठ्ठल रोकडे यांच्या नऊ एकरांवरील झेंडू पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच, विजय पवार आणि शेखर हुलावळे यांच्या झेंडू पिकालाही याचा फटका बसला आहे.
सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचले असून, झेंडूची फुले सडू लागली आहेत. येत्या पंधरा दिवसांत नवरात्र, दसरा आणि दिवाळी सणांमुळे पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद येथून झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते. मात्र, पावसाने ही संधी हिरावली आहे. खडकवाडी परिसरात झेंडू पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते, परंतु यंदा शेतकऱ्यांचे स्वप्न पाण्यात वाहून गेले आहे.
सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचल्याने कांदा आणि बाजरी पिकांचेही नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे पिकांच्या नुकसानाची पाहणी आणि पंचनामा करण्याची मागणी केली आहे. आमदार काशिनाथ दाते यांनी स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन एक पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, कृषी विभागाने त्वरित पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. सततच्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून, आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना प्रशासनाकडून तातडीने मदत मिळावी, अशी अपेक्षा आहे.
नुकसान भरपाई द्यावी
खडकवाडी व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात झेंडू पिकाचे उत्पादन घेतले जाते. सतत दोन दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे झेंडूच्या शेतीमध्ये पाणी साचले असून नुकसान झाले आहे. तरी कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी पीकपंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी. आमदार काशिनाथ दाते यांनी शेताच्या बांधावर येऊन नुकसानग्रस्त झेंडूच्या पिकाची पाहणी केल्यामुळे आम्हा शेतकऱ्यांना न्याय भेटेल अशी अपेक्षा.
विकास रोकडे, शेतकरी (खडकवाडी)