नागपूर | नगर सह्याद्री:-
गेल्या अडीच वर्षांपासून रिक्त असलेल्या विधान परिषद सभापतीपदासाठी भाजपाचे आमदार प्रा. राम शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांतदादा पाटील, उदय सामंत, जयकुमार रावल ही उपस्थित होते.
उपसभापती निलम गोऱ्हे यांनी विधानपरिषदेच्या सभागृहात या निवडणुकीची घोषणा केली. सभापती पद संपुष्टात येणार आहे. त्यामुळे नियमानुसार, राज्यपालांनी सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी 19 डिसेंबर 2024 हा दिवस निश्चित केला आहे.
दरम्यान, महायुतीकडून विधानपरिषद आमदार राम शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली. भाजप पक्षाकडून तशी घोषणा करण्यात आली होती. बुधवारी अर्ज दाखल करण्यात आला.
आमदार प्रा. राम शिंदे नेमकं काय म्हणाले?
लोकशाहीमध्ये विरोधकाला सुद्धा अपेक्षा असते की सभापतीने आपलं सुद्धा म्हणणं ऐकलं पाहिजे. बिनविरोध सभापतीपदाची नेमणूक होणं हे लोकशाहीसाठी चांगलं असल्याचे मत भाजप नेते राम शिंदे यांनी व्यक्त केलं. अधिकृत रित्या माझी उद्या राज्यपालांच्या संदेशानुसार विधानपरिषदेच्या सभापतीपदी निवड होईल असे राम शिंदे म्हणाले.
भाजपच्या राम शिंदे यांचा विधानपरिषदेचा सभापती होण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचाही अप्रत्यक्ष हातभार लागल्याचे बोलले जात आहे. निलम गोऱ्हे यांनी पक्षांतर केल्याने त्यांच्या अपात्रतेचे प्रकरण अद्याप संपुष्टात न आल्याचा मुद्दा अनिल परब यांनी विधानपरिषदेत दोन दिवसांपूर्वी उपस्थित केला होता.
यामुळं भाजपनं हे कारण पुढे करत राम शिंदे यांच्या सभापतीचा मार्ग मोकळा करुन घेतल्याची चर्चा सुरु आहे. अनिल परब यांनी उपस्थित केलेल्या मुद्याबाबत देखील राम शिंदे यांनी विचारण्यात आले. यावेळी शिंदे म्हणाले की, त्रयस्त दोन माणसातल्या चर्चेबद्दल आता बोलण्यात अर्थ नाही. मला आनंद झालाय की मी सभापती झालो आहे असे राम शिंदे म्हणाले.