अहिल्यानगर | नगर सह्याद्री
नगर शहरातील सारसनगर भागातील माऊंट लिटेरी स्कूल बेकायदेशीर चालू आहे. या बाबत ठोस पुराव्यांसह गंभीर वस्तुस्थिती शिक्षण अधिकारी उपशिक्षण अधिकारी, महानगरपालिका शिक्षण विभाग आणि अतिक्रमण विभाग यांच्याकडे असूनही प्रशासन कारवाई करण्यास टाळटाळ करत असल्याचा आरोप शालिनी प्रतिष्ठानचे माजी संचालक सचिन कानडे यांनी केला.
अहिल्यानगर शहरात बुधवार दि. 04 रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सचिन कानडे बोलत होते. कानडे म्हणाले, जवळजवळ शंभर सव्वाशे पुराव्यांसह अर्ज करूनही केवळ राजकीय वरदहस्थामुळे सदरची संस्था बेकायदेशीर रित्या चालवली जात आहे. कुठलीही शैक्षणिक संस्था उभारताना संस्थेची जमिन बिगर शेती झालेली असणे आवश्यक असते. परंतु सदर संस्थची जमीन बिगर शेती झालेलीच नाही. इथेच सर्व नियम अटी आणि कायदे धाब्यावर बसवले आहेत. कुठल्याही प्रकारची बांधकाम परवानगी अस्तित्वात नाही. शैक्षणिक संस्थेला सादर केलेल्या मान्यता अर्जामध्ये खोटी माहिती देऊन प्राथमिक मान्यता मिळवली आहे.
सदरची मान्यता ज्या अधिकाऱ्याने दिली आहे. तो अधिकारी वादग्रस्त आहे. शिक्षण विभागाने आखून दिलेल्या कायदेशीर निकषाप्रमाणे संस्थेचे पक्के बांधकाम अस्तित्वातच नसून, सर्व वर्ग चक्क पत्राच्या खोलींमध्ये भरवले जातात. उन्हाळ्यामध्ये प्रचंड ऊष्णता, पावसाळ्यामध्ये पावसाचा प्रचंड आवाज, आणि हिवाळ्यामध्ये थंडी, अशा धोकादायक अवस्थेमध्ये पहिली ते दहावीपर्यंत शाळा चालवली जात आहे. त्यापैकी नववी आणि दहावी या वर्गांना अजिबात परवानगी नसताना सदर वर्गामधल्या मुलांचे व मुलींचे नावासह तक्रार अर्ज सादर केलेले असतानाही शिक्षण विभागाकडून कुठलीही कारवाई केली जात नाही.
बेकायदेशीर शाळा चालवली असता दहा हजार रुपये प्रतिदिन असा दंड आकारला जातो,अशी तरतूद आहे.त्यानुसार सन 20 14 पासून ते आज डिसेंबर 2024 पर्यंत करोडो रुपये होतो, परंतु केवळ राजकीय दबावापोटी विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे आणि सुरक्षिततेचे कुठलेही निकष न पाळता बेकादेशीरपणे ही शैक्षणिक संस्था चालवली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच पाच वर्षापासून सुरु असलेली लढाई आता जन आंदोलनाच्या स्वरूपामध्ये उभारणार असून शिक्षणाधिकारी, महानगरपालिका शिक्षण विभाग यांच्या दालनांमध्ये बेमुदत ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा सचिन कानडे यांनी पत्रकार परिषदेत दिला.