अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या गॅस रिफीलींग सेंटरवर उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या पथकाने कारवाई केली. शुक्रवारी दुपारी वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यात गॅस सिलेंडर, गॅस रिफीलींग मशिन, वजन काटा असा सुमारे ३ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यातगुन्हा दाखल करण्यात आला आहे. विठठल राजु पारधे ( रा. मल्हार चौक, अहिल्यानगर), विनोद मनोज पोळ ( पाटील हॉस्पिटलच्या पाठीमागे, अहिल्यानगर), राजेंद्र भीमराज बडे ( बारादरी, अहिल्यानगर), बबन नाथू कातोरे ( केडगाव, अहिल्यानगर ) असे गुन्हा दाखल झालेल्यांचे नावे आहे.
शहरात बेकायदेशीररित्या गॅस रिफीलींग केली जात असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने पहिला छापा स्टेशन रॉड परिसरातील एका हॉस्पटिलच्या पाठीमागे सुरु असलेल्या गॅस रिफीलींग सेंटरवर टाकला. तसेच दुसरा छापा मल्हार चौकातील एका मेन्स पार्लरच्या पाठीमागील पत्राच्या शेडमध्ये सुरु असलेल्या अनधिकृतरित्या गॅस रिफीलींग सेंटरवर टाकला.
पथकाने दोन्ही ठिकाणी केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत गॅस टाक्या, पाईप, मशीन, पांढऱ्या रंगाची ओमानी, काळ्या रंगाची रिक्षा असे साहित्य जप्त करत कोतवाली पोलीस ठाण्यात दोन वेगवेगेळे गुन्हे दाखल केले आहे.