अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील साईनगर भागातील साई मंदिर ते पिंपळा रस्ता रस्त्यावर बेकायदेशीर अतिक्रमण केल्याबाबत वेळोवेळी ग्रामस्थ व सरपंच ग्रामपंचायत यांच्याकडून अर्ज देऊनही कार्यवाही न झाल्यामुळे सरपंच शरद पवार यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला असून सदर अतिक्रमण हटविण्यासाठी शुक्रवार दि. 24 जानेवारीला अहिल्यानगर जिल्हा परिषद कार्यालयासमोर ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्या समवेत आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हंटले आहे की, चिचोंडी पाटील येथील प्रभाग क्रमांक 1 मधील साईनगर भागातील लेन नंबर 1 साई मंदिर ते पिंपळा रस्त्यावर मागील काही दिवसापूव गावातील काही व्यक्तींकडून बेकायदेशीर अतिक्रमण केलेले आहे.सदर साईनगर भागाची लोकसंख्या 1000 ते 1200 असून विद्याथ, नागरिक, शेतकरी, ग्रामस्थ यांचा शाळेत, बसस्टॅन्ड, दुकानात, बाजारात जाण्याचा रस्ता बंद झाल्याने मोठा अडथळा व गैरसोय होत आहे.
सदर व्यक्तीने रस्त्यावर सुरुवातीला दगड आणून टाकले, नंतर तार कंपाऊंड केले, नंतर पत्र्याचे शेड केले आणि आता पक्के बांधकाम करण्याच्या तयारीत आहे. सदर रस्त्यावर जनसुविधा अंतर्गत 10 लक्ष रुपये खर्चाच्या रस्ता काँक्रिटीकरणाचे सुरु केलेले काम बंद झालेले असल्यामुळे निधी माघारी जाण्याची शक्यता आहे. तरी ग्रामस्थांनी व ग्रामपंचायतने वेळोवेळी अनेक अर्ज करूनही हे अतिक्रमण काढण्यासाठी पंचायत समिती प्रशासन, ग्रामविकास अधिकारी, यांच्याकडून कुठलेही सहकार्य, मार्गदर्शन मिळत नसल्याने गावात अन्य ठिकाणी सुद्धा अशा प्रकारचे अतिक्रमण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे ग्रामस्थ, विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय व कुचंबना होत आहे.
सदर व्यक्तीने चिचोंडी पाटील – सांडवे रस्त्यावर सुद्धा पक्का डांबरी रस्ता चार ठिकाणी उचकटून रस्त्यावर खड्डे केलेले आहेत. त्या ठिकाणी सुद्धा अतिक्रमण होण्याची शक्यता आहे, अनेक ग्रामस्थ त्या खड्ड्यामध्ये पडलेले आहेत. सदर व्यक्ती आरटीआय कार्यकर्ता आहे, गावामध्ये माजी ग्रामपंचायत सदस्य, माजी पंचायत समिती सदस्य राहिलेला आहे. त्यामुळे त्याची गावात दहशत आहे, ग्रामपंचायत स्तरावरून अतिक्रमणधारकांना 3 नोटीस देऊनही त्याने काही उत्तर दिले नाही. याबाबत पंचायत समितीला कळवूनही पंचायत समिती प्रशासन आम्हाला हे रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी काहीही सहकार्य करीत नाही. त्यामुळे मी व अन्य ग्रामपंचायत पदाधिकारी, स्थानिक ग्रामस्थांसह येत्या शुक्रवारी जिल्हा परिषद कार्यालय बाहेर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा सरपंच शरद पवार यांनी दिला आहे.