एमआयडीसी पोलीस ठाण्यातील अंमलदार निलंबित
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शेंडी बायपास परिसरात ट्रक चालकांकडून अवैधरीत्या पैसे गोळा करणार्या प्रकाराचा पर्दाफाश झाला आहे. या गंभीर प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार विकास दळवी यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.
९ सप्टेंबर रोजी समाज माध्यमावर एक व्हिडीओ लिप व्हायरल झाली. या व्हिडीओमध्ये रात्री उशिरा एका व्यक्तीकडून ट्रक चालकाकडून रोख पैसे घेत असल्याचे स्पष्टपणे दिसत होते. तपासाअंती ही घटना ८ सप्टेंबर रोजी रात्री १० ते ११ वाजेदरम्यान घडल्याचे निष्पन्न झाले. प्राथमिक चौकशीदरम्यान संबंधित व्यक्ती हा होमगार्ड बाळू जाधव असल्याचे समोर आले. त्याचा जबाब नोंदवला असता, त्याने मान्य केले की, हे पैसे त्याने पोलीस अंमलदार विकास दळवी यांच्या सांगण्यावरून जमा केले होते.यापूर्वीही अशा प्रकारच्या काही तक्रारी प्राप्त झालेल्या असून, त्याबाबत समाज माध्यमांवरही व्हिडीओ व्हायरल झालेले होते.
सदर प्रकरणी चौकशी सुरू आहे. तसेच होमगार्ड बाळू जाधव यांचा कसुरी अहवाल पुढील कार्यवाहीसाठी गृह रक्षक दलाचे समादेशक तसेच अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचेकडे पाठविण्यात आला आहे.