सरकारी मालमत्तेची तोडफोड, गुटखा विक्री जोमात; संभाजी ब्रिगेड आक्रमक
श्रीगोंदा । नगर सहयाद्री
श्रीगोंदा शहरातील साळवण देवी रोडलगत मलंग बाबा ट्रस्टच्या जागेवर अवैध व्यवसायांना खुलेआम आश्रय दिला जात असून, या ठिकाणी गुटखा विक्री, बेकायदेशीर टपऱ्या, दुर्गंधीयुक्त चिकन दुकाने आणि सार्वजनिक शौचालयाची तोडफोड असे प्रकार घडत आहेत. यामुळे परिसरातील नागरिक, महिलां-विद्यार्थ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
१६ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजता अज्ञात व्यक्तींनी जेसीबीच्या सहाय्याने स्टॉप फलक हटवण्याचा प्रयत्न करत, नगरपरिषदेच्या सार्वजनिक शौचालयाची भिंत पाडली. ही थेट सरकारी मालमत्तेची तोडफोड असून, संबंधित जेसीबीवर त्वरित कायदेशीर कारवाई करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष नाना शिंदे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत श्रीगोंदा तहसीलदारांना निवेदन दिले आहे याच परिसरात गुटखा विक्रेत्यांवर पूर्वी डीवायएसपी खाडे यांनी छापा टाकून मोठा साठा जप्त केला होता.
तरीही साळवण देवी रोडवर उघडपणे गुटख्याची विक्री सुरूच आहे. स्थानिक नागरिक व शालेय विद्यार्थ्यांना यामुळे त्रास होत आहे. महिला व लहान मुलांसाठीही परिसर असुरक्षित होत चालला आहे. त्यामुळे गुटखा विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करावे, मलंग बाबा ट्रस्टच्या जागेवरील अवैध चिकन दुकाने हटवावे, जेसीबीच्या सहाय्याने झालेल्या सरकारी मालमत्तेच्या तोडफोडीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली असून जिल्हा उपाध्यक्ष नाना शिंदे यांनी अवैध धंद्यांवर कारवाई न झाल्यास, दिवाळीनंतर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला.