श्रीगोंदा | नगर सह्याद्री
गुन्हेगारांसह अवैध धंद्यांचे माहेरघर अशी ओळख अशी नवी ओळख श्रीगोंदा शहराची तयार करण्यात सर्वाधिक वाटा आता पोलिसांनीच उचलला आहे की काय अशी शंका तालुक्यातील जनतेला येऊ लागली आहे. पोलिस ठाण्यात सामान्यांना न्याय मिळण्याऐवजी गुन्हेगारांचा गालिचे टाकण्याचा नवा पायंडा पोलिस अधिकार्यांनी पाडला असल्याचे समोर येत असून त्यातून पोलिस आणि खाकीवर्दीवरील विश्वास उडणार हे नक्की!
श्रीगोंदा शहरासह काष्टी शहरात आणि मोठ्या गावांमध्ये अवैध दारु, मटका, जुगार आदी अवैध धंदे जोरात चालू आहेत. काष्टी शहरात खुलेआम खेळला जाणारा जुगार आणि मटका व्यवसाय पोलिसांच्याच आशीर्वादाने असल्याचे लपून राहिलेले नाही. या व्यवसायाच्या आड येणार्या अथवा त्याबाबत तक्रार करणार्याच्याच विरोधात पोलिस कारवाई होताना अनेकदा दिसून आले आहे.
श्रीगोंदा पोलिस ठाण्याचा कारभार हा रामभरोसे असल्याचे दिसून येते. गुन्हेगारांना पोलिसांचा कोणताही धाक राहिलेला नाही. त्यातूनच गुन्हेगारी वाढत चालली असून गेल्या चार महिन्यात झालेल्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिस सपशेल अपयशी ठरले आहेत. खुषमस्कर्यांच्या टोळीचे सरदार अशीच काहीशी ओळख श्रीगोंदा आणि बेलवंडी या दोन्ही पोलिस ठाण्यातील प्रमुखांची झाली आहे. कायद्याचा धाक निर्माण करण्याचे सोडून माया जमविण्यात हे अधिकारी आणि त्यांचे वसुली फौजदार सक्रिय असल्याबाबतच्या तक्रारी आता तालुक्यातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच केल्या आहेत.