अहमदनगर | नगर सह्याद्री
ग्राहक दक्षता कल्याण फाऊंडेशनच्या तक्रारीनंतर पुरवठा विभागाने नगर- मनमाड रस्त्यालगत एमआयडीसी हद्दीत सुरू असलेल्या अवैध गॅस रिफिलिंग सेंटरवर छापा टाकला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुरवठा निरीक्षक विदुला अनिल बेल्हे (रा. आगरकर मळा, नगर) यांनी फिर्याद दिली आहे.
राजु साहेबराव पवार (रा. लक्ष्मीआई मंदिरा जवळ, नागापूर), चंद्रशेखर त्रिंबक कांबळे (रा. गांधीनगर, बोल्हेगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून घरगुती वापराच्या सात भरलेल्या टाया, एक रिकामी टाकी, वजन काटा, इलेट्रीक मोटार, रिक्षा (एमएच १६ सीई २४९४), चार बॅटर्या असा ६१ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ग्राहक दक्षता कल्याण फाऊंडेशनच्या प्रशासकीय अधिकार्यांनी नगर शहरात स्टिंग ऑपरेशन राबवत घरगुती गॅस सिलेंडरच्या काळाबाजाराचा भांडाफोड केला. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने घरगुती गॅस सिलेंडरचा गैरवापर करणार्यांविरूध्द कारवाई करण्यात आली आहे. धान्य वितरण अधिकारी सपना भोवते, पुरवठा निरीक्षक बेल्हे, अव्वल कारकून घोलप, अनंता मुळे, ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशनचे अध्यक्ष नितीन सोळंके, रवींद्र ब्राह्मणे, कृष्णा पवार यांच्यासह एमआयडीसी पोलीस कारवाईत सहभागी झाले होते.