अहिल्यानगर / नगर सह्याद्री :
पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा समावेश आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर आता भारताने पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या आहेत. सिंधू नदी पाणी वाटप कराराला स्थगिती देण्यात आली आहे. यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पहिल्यांदा भाष्य केले आहे.
अण्णा हजारे म्हणाले की, “पर्यटक हे पर्यटक असतात, ते कोणत्या देशाचे किंवा धर्माचे नसतात. काही देशविरोधी शक्तींना भारतातील शांतता, एकोप्याचे वातावरण खपवत नाही, म्हणूनच ते अशा खोडसाळ आणि क्रूर कृत्यांना प्रवृत्त होतात. अशा घटना अत्यंत दुर्दैवी आहेत. मात्र, आपण घाबरून न जाता एकत्र येऊन अशा हल्ल्यांचा विरोध करायला हवा.”
सिंधू नदीचं पाणी थांबण्याचा निर्णय योग्य
पहलगाम हल्ल्यानंतर सरकारनं सिंधू नदीचं पाकिस्तानात जाणार पाणी थांबण्याचा निर्णय घेतला, त्याचं हजारेंनी समर्थन केलं. ‘नाक दाबलं की तोंड उघडतं, अशी एक जुनी म्हण आहे. त्यामुळे सिंधू नदीचं पाणी थांबवणं ही कृती योग्य आहे,’ असे त्यांनी म्हटले आहे.
यावेळी अण्णा हजारे यांनी 1965 साली भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणीही सांगितल्या आहेत. “मी काश्मीरमध्ये होतो. आमच्या सैन्य तुकडीवर पाकिस्तानी लढवय्या विमानांनी हल्ला केला होता. त्यात अनेक जवान शहीद झाले होते आणि माझ्याही डोक्याला गंभीर जखम झाली होती. आजही देशविरोधी शक्तींविरोधात लढणारे आपले सैनिक सज्ज आहेत आणि त्यांच्यावर संपूर्ण देशवासियांचा विश्वास आहे,” असेही अण्णा हजारे यांनी सांगितले.
दरम्यान, भारत आणि पाकिस्तानमधील तणाव खूप वाढला आहे, परंतु तरीही पाकिस्तान आपल्या कृतींपासून थांबत नाही. त्याने सलग पाचव्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन केले. पाकिस्तानने बारामुल्लासह अनेक ठिकाणी गोळीबार केला. त्यांनी तुतमारी आणि रामपूर सेक्टरमधील भारतीय चौक्यांना लक्ष्य केले. भारतीय सैन्यानेही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले.