Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर सडकून टीका केली आहे. चित्रा वाघ यांनी जरांगेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना जरांगेंनी स्पष्ट केले की, मी फडणवीस यांच्या आईविषयी काहीही बोललो नाही. जर काही शब्द चुकून गेला असेल तर मी तो माघारी घेतो.
पण याचवेळी जरांगेंनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका करत म्हटले की, पोलिसांनी आमच्या आई-बहीणींना मारले, त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. तुझी आई तुला प्रिय आहे, तशीच आमचीही आई आमच्यासाठी प्रिय आहे. मराठ्यांना आरक्षण दे, आम्ही तुझ्या आईची पूजा करू.त्याचप्रमाणे त्यांनी चित्रा वाघांवर नाव न घेता कडवट शब्दांत हल्ला चढवला.
ती जी बाई बोलली, कोण वाघीण… आमच्या तीन-चार वर्षांच्या पोरी रक्ताच्या थारोळ्यात होत्या, तेव्हा तू कुठे होतीस? आता जागी झाली? तू माझ्या नादी लागू नकोस, तुझं सगळं गबाळ उचकीन. संध्याकाळपर्यंत तुझी सगळी माहिती माझ्याकडे येईल, अशा शब्दांत त्यांनी प्रत्युत्तर दिले. २७ ऑगस्ट रोजी मराठा मोर्चा मुंबईकडे कूच करणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले. अंतरवाली सराटी येथे आयोजित पत्रकार परिषदेत हे वक्तव्य करण्यात आले. दरम्यान, मनोज जरांगेंच्या विधानांनंतर चित्रा वाघ काय प्रत्युत्तर देतात, याकडे राज्याचे लक्ष लागून आहे.