पारनेर | नगर सह्याद्री
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो समाजबांधव मुंबईत दाखल झाले आहेत. जरांगे पाटील यांनी पाणी त्यागल्याने त्यांची प्रकृती खालावली असून, त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाल्यास सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा पारनेर तालुका सकल मराठा समाजाने दिला आहे.
आंदोलनादरम्यान आंदोलकांचे खाण्यापिण्याचे हाल होत असल्याने राज्यभरातून हजारो वाहने खाद्यपदार्थ, सुकामेवा आणि पाण्याच्या बाटल्या घेऊन मुंबईकडे रवाना झाली आहेत. पारनेर तालुक्यातील पारनेर शहर, सुपा, भाळवणी, कान्हूरपठार, हिवरेकोरडा, वडगावआमली, अळकुटी, निघोज, वडझिरे, म्हसोबा झाप या गावांमधून प्रत्येकी दोन गाड्या खाद्यपदार्थांसह मुंबईला पाठवण्यात आल्या आहेत.
पारनेर तालुका सकल मराठा समाजाने सोमवारी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंब्याचे निवेदन दिले. जर या आंदोलनातून आरक्षणाचा तोडगा निघाला नाही, तर शुक्रवार, दि. 5 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता सुपा येथील चौकात रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. मराठा समाजाच्या या एकजुटीने आंदोलनाला व्यापक पाठबळ मिळत असून, सरकारवर दबाव वाढत आहे.
नांदूर पठार, कारेगाव ग्रामस्थांचा मराठा क्रांती मोर्चाला पाठिंबा
नांदूर पठार आणि कारेगाव ग्रामस्थांनी रविंद्रशेठ राजदेव मित्र मंडळ आणि निलेश लंके प्रतिष्ठानच्या आव्हानाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत मराठा क्रांती मोर्चाला भक्कम पाठिंबा दिला. मोर्चासाठी ग्रामस्थांनी 3000 भाकरी, 70 किलो शेंगदाणा-मिरची, बिस्कीट आणि पाण्याच्या बाटल्या पाठवल्या. स्वतः रविंद्र राजदेव आणि त्यांच्या मित्रमंडळाने पीकअप गाडीतून ही सामग्री मुंबईला रवाना केली. यावेळी दत्तात्रय देशमाने, जनार्दन चौधरी, जयवंत आग्रे, हरिभाऊ आग्रे, भानुदास आग्रे, सुरेश आग्रे, रवी घोलप, मदन देशमाने, नामदेव आग्रे, नवनाथ पाटील घोलप, शंकर मामा आग्रे, आवड्या घोलप, सुनील राजदेव, रामदास राजदेव, सागर राजदेव, कैलास राजदेव, रमेश घोलप, बबन पाटील घोलप, अमोल गाडगे, सोन्या पानसरे, तसेच विकास विद्यालयातील विद्याथ आणि शिक्षक उपस्थित होते.