spot_img
अहमदनगरजिल्हा बँकच असुरक्षीत असेल तर सारंच अवघड!

जिल्हा बँकच असुरक्षीत असेल तर सारंच अवघड!

spot_img

नोकरभरती मुद्यावर विखेंच्या जोडीने थोरातांचीही चुप्पी बरीच बोलकी | कर्डिलेसाहेब, तडा गेल्यास जोडणं अवघडं होईल बरं!

मोरया रे / शिवाजी शिर्के –
गडकरींनी मांडलेल्या भूमिकेचं तोंडभरुन कौतुक करणारा बाप्पा रविवारच्या सुट्टीच्या दिवशी जिल्हा बँकेच्या दिशेने मार्केटयार्ड चौकातील निर्माणाधीन असणार्‍या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या आड उभा राहून दुर्बीण लावून बसलेला दिसला. मी दचकलोच! त्याची दोन कारणे! पहिले कारण याच दिशेने जिल्हा बँकेच्या अलिकडे माकॅट कमिटीच्या इमारतीत शिवाजीराव कर्डिलेंचे कार्यालय आणि शेजारी जिल्हा बँक! बाप्पा नक्की कोणावर वॉच ठेवून आहे याचा अंदाज येत नव्हता. मात्र, त्याचे लक्ष शिवाजी कडिले हेच असणार हे मी ताडलं!

मी- (बाप्पाच्या पाठीमागे हळूच उभा राहिलो अन् बाप्पाच्या खांद्यावर हात टाकला. बाप्पा एकदम गडबडला!) बाप्पा, काय रे? सीआयडीच्या भूमिकेत आहेस की काय?

श्रीगणेशा- इडी, सीबीआय, सीआयडी यात नवीन ते काय आहे रे? मोठ्या मातब्बरांच्या विश्वासाने आणि त्यांच्याच पुढाकारातून स्थापन झालेली राज्यातील आदर्श असणार्‍या जिल्हा बँकांपैकी एक असणारी तुमची नगरची जिल्हा बँक!

मी- बाप्पा होय ते अगदी खरं आहे. शेतकर्‍यांच्या हिताचं रक्षण या बँकेतून होतं आणि त्यामुळेच गावागावात या बँकेविषयी विश्वासाचे वातावरण आहे रे! बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, उपाध्यक्ष माधवराव कानवडे यांनी बँकेबाबतची भूमिका कालच मांडली! ती वाचण्यात आली. जवळपास १५ लाख ठेवीदारांच्या या बँकेत १० हजार ३३३ कोटींच्या ठेवी आहेत. हाच खरा विश्वास आहे. अत्यंत कमी मनुष्यबळात बँकेचे कामकाज गावागावात गेल्या अनेक वर्षांपासून चालू आहे.
जवळपास पावणेबारा कोटी रुपयांच्या नोटा बँकेत नोट बंदी काळात आल्या. त्या आजही तशाच पडून आहेत. अडीच हजार सेवकांची गरज असताना आज बँकेत अवघे ९६६ कर्मचारी कार्यरत आहेत.

श्रीगणेशा- झालं का तुझ आकडेवारी मांडून! नोकरभरतीच्या अनुषंगाने रकानेच्या रकाने भरुन बातम्या येत आहेत. त्यात आता लोकप्रतिनिधींनीही उडी घेतलीय! बँकेची परिस्थिती आणि नोकर भरती यावर पालकमंत्री म्हणून राधाकृष्ण विखे पाटील यांनी भूमिका मांडावी अशी मागणी होत असताना दुसरीकडे याच बँकेचे उपाध्यक्ष असणारे माधवराव कानवडे हे संगमनेरचे! ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा त्यांना वरदहस्त! जिल्हा बँकेची सत्ता भाजपाच्या ताब्यात असल्याचं वरकरणी दिसत असलं तरी त्यात तथ्य वाटत नाही. बँकेत सत्ता आहे ती विखे- थोरातांची! निवडणुकीनंतरचे अध्यक्ष अ‍ॅड. उदय शेळके यांचं आजारपणात निधन झाले. त्यानंतर संचालक मंडळात फाटाफूट झाली आणि थोरातांच्या पाठींब्यावर निवडून आलेल्या शिवाजीरावांनी विखेंच्या गोटात उडी मारली. त्यातून बँकेच्या अध्यक्ष निवडीत संचालकांमध्ये मतदान झाले आणि चंद्रशेखर घुले हे अध्यक्ष होता होता राहिले. शिवाजीरावांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडल्यानंतर विखेंच्या गोटात जल्लोष झाला. या सार्‍याचा इतिहास साक्षी आहे. मात्र, अलिकडे तुमची ही बँक गाजतेय ती नोकरभरती आणि बँकेच्या आर्थिकस्थितीच्या चर्चेने!

मी- राजकारण आहे रे बाप्पा त्यात! काहींना त्यांच्या मनाप्रमाणे झाले नाही आरोप करता येतात! त्यातूनच हे सारं चालू असावं!

श्रीगणेशा- प्रताप ढाकणे यांनी भूमिका मांडताना बँकेचा आर्थिक डोलाराच कोसळणार असल्याचं भाकीत केलं आणि त्यातून ठेवीदारांच्या मनात संशयाचं मळभ तयार झालं. त्यात गैर काहीच नाही. ढाकणे यांच्यासारख्या अभ्यासू नेत्याने बँक अडचणीत असल्याचं जाहीरपणे बोलावं आणि ते गांभिर्याने घेऊ नये असं होणार नाही. सहकारी बँकांसह पतसंस्थांबाबत आधीच सामान्य ठेवीदारांमध्ये संशय निर्माण झाला आहे. चांगल्या- चांगल्या नावलौकीक असणार्‍या पतसंस्था डब्यात गेल्या! अनेक संस्थांना टाळे लागले! त्यातून हजारो कोटी रुपयांच्या ठेवी गायब झाल्या! ज्ञानदेव वाफारे याने संपदाच्या माध्यमातून केलेला मोठा घोटाळा आणि त्यानंतर पतसंस्थांच्या बाबत निर्माण झालेले अविश्वासाचे वातावरण आजही कायम आहे. पतसंस्था चळवळ रुळावर आलीय असं वाटत असतानाच राजे शिवाजी, गोरेश्वर या संस्थांमधील घोटाळे समोर आले. त्याच्याच जोडीने अन्य काही संस्थांमधील घोटाळे देखील समोर आले. त्यातून ठेवीदारांमध्ये कमालीचे संभ्रमाचे वातावरण तयार झाले. अनेक संस्थांमध्ये शेकडो कोटींच्या ठेवी अडकल्या आणि त्या मिळाव्यात म्हणून आजही ठेवीदार रस्त्यावर तर कधी पोलिस ठाण्यात ठाण मांडून आहेत. बहुतांश सहकारी पतसंस्थांच्या ठेवी ज्या जिल्हा बँकेत ठेवल्या जातात तीच जिल्हा बँक आर्थिक अडचणीत असल्याचं वक्तव्य केदारेश्वर कारखान्याचे सर्वेसर्वा अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांनी केले रे!

मी- बाप्पा, मुळातच त्यांच्या कारखान्याला जिल्हा बँकेने कर्ज दिले नाही! म्हणून त्यांनी आरोप केला असावा!

श्रीगणेशा- होय ते खरं असेलही कदाचित! मात्र, या कारखान्याकडे राज्य सहकारी बँकेच्या कर्जाची थकबाकी आहे. त्यातून एनपीए मध्ये आहे. एनपीएमध्ये असणार्‍या कारखान्याला कर्ज पुरवठा करता येत नसल्याचं धोरण असल्याने जिल्हा बँकेने कर्ज दिलं नाही असं समजतंय! मात्र, कारण काहीही असो! प्रतापकाकांनी जे भाष्य केलं ते समजून घेण्याची गरज आहे. बँकेतील ठेवीदारांमध्ये संशय निर्माण होईल आणि त्यांच्या बँकेसमोर रांगा लागतील असंच त्यांचं वक्तव्य राहिलं! खरं तर पतसंस्था असू देत किंवा बँक, त्या चालतात ठेवीदारांच्या विश्वासावर! दहा हजार कोटींच्या ठेवी मिळण्यासाठी ठेवीदारांनी रांग लावली तर रिझर्व्ह बँक देखील अशा ठेवी देऊ शकणार नाही. तुम्हाला कर्ज दिले नाही म्हणून लागलीच त्या संस्थेबाबत संभ्रम निर्माण करण्याची जी काही चाल ढाकणे यांनी खेळलीय तीच मुळात चुकीचे वाटते! संस्था उभी करण्यासाठी खस्ता खाव्या लागतात! त्या खस्ता ज्यांनी खाल्या त्यांनाच त्याची जाणिव असते रे! मात्र, याचा अर्थ बँक, पतसंस्था यांच्या संचालकांनी, पदाधिकार्‍यांनी आपण त्या संस्थेचे मालक नसून विश्वस्त आहोत ही भावना समजून घेण्याची गरज आहे. खरे तर राजकीय मतभेद ठीक आहेत! मात्र, याचा अर्थ चुकीच्या पद्धतीने वातावरण तयार करण्यात काहीच अर्थ नाही.

विळ्या-भोपळ्याचे सख्य असणार्‍या विखेंचे समर्थक कर्डिले हे अध्यक्ष आहेत आणि थोरातांचे समर्थक कानवडे हे याच बँकेचे उपाध्यक्ष आहे. ढाकणे यांच्या आरोपांना उत्तर देताना कर्डिले- कानवडे या दोघांनीही कायदेशिर कारवाईचे सुतोवाच केले आहे. वास्तव काय आहे हे सर्वश्रूत आहे. मात्र, आरोप करताना त्या संस्थेला तडा जाणार नाही याची काळजी घेण्याची गरज आहे. अशी कोणतीच काळजी न घेतल्याने आजही जिल्ह्यातील शंभरपेक्षा जास्त पतसंस्था व्हेंटीलेटरवर आल्यात याचं भान ठेवलं पाहिजे. नोकरभरती पारदर्शक झालीच पाहिजे. खरंतर ताकही फूंकून पिणार्‍या विखे – थोरात या दोघांनीही त्याची काळजी घेतलीच असणार! निवडणकीच्या तोंडावर नोकरभरती होत असल्याने त्याचे खापर आपल्यावर फुटणार नाही याची काळजी विखे- थोरात या नेत्यांसह त्यांचे समर्थक समजल्या जाणार्‍या बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले आणि व्यवसायाने वकिल असणार्‍या अ‍ॅड. माधवराव कानवडे यांनीही नक्कीच घेतली असणार! उगीचच साप-साप म्हणून भुई थोपटण्यात काहीच अर्थ नाही रे!

(बाप्पाने दुसर्‍या क्षणाला माझा त्याच्या खांद्यावरील हात बाजूला केला. समोर जिल्हा बँकेकडे लावलेल्या दुर्बिणीतून बाप्पा पुन्हा एकदा पाहू लागला आणि मी देखील त्याचा निरोप घेत माझ्या कार्यालयाकडे वळता झालो.)

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...