spot_img
ब्रेकिंगशाळांमध्ये मुली सुरक्षित नसतील तर...; उच्च न्यायालयाने पोलिसांना फटकारलं; तपासावर कठोर शब्दांत...

शाळांमध्ये मुली सुरक्षित नसतील तर…; उच्च न्यायालयाने पोलिसांना फटकारलं; तपासावर कठोर शब्दांत ताशेरे!

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
Bombay High Court Sue Moto Hearing of Badlapur Case: बदलापूरमध्ये दोन लहानग्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना उघड झाल्यानंतर त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. समाजाच्या सर्वच स्तरातून यावर संताप व्यक्त होत असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली जात आहे. बदलापूर रेल्वे स्थानकावर तब्बल १० तास या मागणीसाठी रेलरोकोही करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाची स्यूओमोटो दखल घेतली असून त्यासंदर्भात आज पहिली सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने बदलापूर पोलिसांनी तपासात केलेल्या अक्षम्य चुकांवर बोट ठेवत परखड शब्दांत ताशेरे ओढले आहेत. लाईव्ह लॉनं यासंदर्भात त्यांच्या एक्स अकाऊंटवर सविस्तर माहिती दिली आहे.

आज सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे व न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने बदलापूर पोलिसांनी तपासात केलेल्या चुकांवर बोट ठेवलं. सरकारी पक्षाकडून वकील हितेन वेनेगावकर बाजू मांडत होते. त्यांना न्यायालयाने परखड शब्दांत सुनावलं आहे. “जर शाळामध्येच मुली सुरक्षित नसतील, तर मग शिक्षण अधिकाराचा काय उपयोग आहे? अगदी ४ वर्षांच्या मुलीही बळी पडत आहेत. ही काय परिस्थिती आहे? हे प्रचंड धक्कादायक आहे”, असं न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांनी नमदू केलं.

पोलिसांच्या दिरंगाईवर न्यायालयाचे ताशेरे
दरम्यान, पोलिसांनी गुन्हा नोंद करण्यात दाखवलेल्या दिरंगाईवर न्यायालयानं कठोर शब्दांत ताशेरे ओढले. “फक्त गुन्हा दाखल करण्यातच दिरंगाई केली असं नाहीये. शाळा प्रशासनानंही हा प्रकार उघड झाल्यानंतर त्यासंदर्भात तक्रार दाखल केली नाही. एफआयआरच्या कॉपीवरून हे लक्षात येत आहे. फक्त एकाच पीडितेचा जबाब नोंदवण्यात आला आहे. शिवाय जेव्हा आम्ही दुसऱ्या पीडित मुलीचा जबाब नोंदवला का? असं विचारल्यानंतर बचाव पक्षानं तो आज नोंदवला जाणार आहे असं सांगितलं”, असं खंडपीठानं सुनावलं.

“आम्हाला केस डायरी हवी, मोकळी कागदपत्र नकोत”
पोलिसांकडून न्यायालयात सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांवरूनही न्यायालयानं ताशेरे ओढले. “आम्हाला ही अशी एकेक कागदं नको आहेत. या प्रकरणाची केस डायरी कुठे आहे? सगळी कागदं एका फाईलमध्ये दिली जायला हवीत”, असं न्यायालयाने नमूद केलं.

शाळा व्यवस्थापनाविरुद्ध कारवाई का नाही?
दरम्यान, यावेळी शाळा व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा का दाखल करण्यात आला नाही? असा प्रश्न न्यायालयाने बदलापूर पोलिसांना केला. “एसआयटी स्थापन झाल्यानंतर आता शाळा व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचं काम ते करतील, असं तुम्ही सांगितलं. पण हे आधीच व्हायला हवं होतं. ज्या क्षणी पीडित मुलींच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली, त्याच क्षणी शाळा व्यवस्थापनावर गुन्हा दाखल व्हायला हवा होता”, असं न्यायालयाने नमूद केलं.

“हा इतका गंभीर गुन्हा आहे. दोन मुलींचं लैंगिक शोषण झालं आहे. पोलीस अशा प्रकरणात गांभीर्यानं कारवाई का करत नाहीत? आम्हाला पुढच्या सुनावणीच्या वेळी हे कळलं पाहिजे की शाळेतील मुलींच्या सुरक्षेसाठी कोणत्या उपययोजना केल्या जात आहेत. मुलींची सुरक्षा आणि संरक्षण या बाबतीत कोणतीही तडजोड होऊ शकत नाही”, असं न्यायमूर्ती मोहिते-डेरे यांनी नमूद केलं.

“हे आता नेहमीचं झालं आहे. जोपर्यंत अशा प्रकरणांत तीव्र असंतोष उफाळून येत नाही, तोपर्यंत व्यवस्था हलत नाही. आता तुम्हाला असं म्हणायचं आहे का की जोपर्यंत लोक रस्त्यावर उतरत नाहीत, तोपर्यंत गुन्ह्यांचा तपास गांभीर्याने केला जाणार नाही?” अशा शब्दांत न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी पोलिसांना जाब विचारला.

बदलापूरची शाळा RSS च्या विचारांची असल्याने सीसीटीव्ही फुटेज गायब : नाना पटोलेंचा गंभीर आरोप
बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुरड्या विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार झाला. शाळेत काम करणारा सफाई कामगार अक्षय शिंदे यानेच हे घृणास्पद कृत्य केलं. १३ ऑगस्टला घडलेल्या या घटनेचे पडसाद २० ऑगस्टला बदलापूरला कसे उमटले ते सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं आहे. या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीला फाशी द्या अशी मागणी २० ऑगस्टच्या आंदोलनात करण्यात आली. या प्रकरणावरुन राजकारणही रंगलं आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नामांकित शाळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असल्याचं सांगत गंभीर आरोप केले आहेत.

बदलापूरमध्ये काय घटना घडली?
बदलापूरमध्ये एका नामांकित शाळेतल्या सफाई कर्मचाऱ्याने दोन चिमुरड्यांचं लैंगिक शोषण केलं. १३ ऑगस्टच्या दिवशी ही घटना घडली. या प्रकरणात आरोपी अक्षय शिंदेला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचा निषेध २० ऑगस्टला नोंदवण्यात आला. बदलापूरमध्ये प्रचंड जनक्षोभ उसळला होता. बदलापूर रेल्वे स्टेशनवर ९ तास रेल रोको करण्यात आला. तसंच आरोपी अक्षय शिंदेचं घर फोडण्यात आलं. या सगळ्या प्रकरणावरुन आरोप प्रत्यारोप होत असताना आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शाळा आरएसएसशी संबंधित असल्याने सीसीटीव्ही फुटेज गायब करण्यात आलं असं म्हटलं आहे.

काय म्हणाले नाना पटोले?
पोलीस कारवाई करत नाहीत, आरोपीला पकडत नाहीत म्हणून जनतेचा आक्रोश निर्माण झाला त्यातून आंदोलन निर्माण झालं. हा कुठल्याही राजकारणाचा विषय नाही. सरकार या विषयाचे राजकारण करत आहे. २४ तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. महाराष्ट्राला काळीमा फासणाऱ्या सरकारला वठणीवर आणण्यासाठी बंद पुकारण्यात आला आहे. राज्यात २०१४ ते २०२४ या दहा वर्षात महिला अत्याचाराच्या सुमारे २२ हजार घटना घडल्याचंही नाना पटोलेंनी म्हटलं आहे.

शाळा संघ आणि भाजपाशी संबंधित आहे त्यामुळेच
महाराष्ट्र हा गुजरातधार्जिणा करण्याचा सत्ताधाऱ्यांकडून प्रयत्न सुरु आहे. बदलापूरची शाळा भाजपा आणि आरएसएसच्या विचारांची असल्याने पोलिसांवर दबाव आहे. शाळेतले सीसीटीव्ही फुटेज गायब केलं गेलं. मुख्यमंत्री बदलापूरला जाऊन आले आणि त्यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोप नाना पटोलेंनी केला आहे. लाडकी बहीण योजनेच्या प्रचारासाठी चारशे कोटीहून अधिक निधीची उधळपट्टी करण्यात आली आहे. लोकांनी सांगितलं तुमचे दीड हजार नको आमच्या मुली सुरक्षित हव्या आहेत. महाराष्ट्रातील सरकार असंवैधानिक आहे. सरकारमधले तिघे तिजोरी पोखरत आहेत अशी बोचरी टीका नाना पटोलेंनी केली.

माझ्या मुलाने काही प्रकार केलेला नाही ; आरोपी अक्षय शिंदेच्या आई-वडिलांचा ‘दावा’
बदलापूरमधून एक अतिशय संतापजनक घटना समोर आली आहे. बदलापूरमधील एका शाळेत लहान मुलींवर शाळेतीलच सफाई कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याचे समोर आले. या घटनेचे पडसाद बदलापूरमध्ये उमटले असून रेल्वे स्थानकावर गेल्या अनेक तासांपासून रेल्वे रोको सुरू आहे. आरोपीला इथेच फाशी द्या अशी मागणी करत आंदोलकानी आक्रमक भूमिका घेतली आहे.

पीडित मुलींनी पालकांना जेव्हा माहिती दिली तेव्हा त्यांची वैद्यकीय तपासणी केली गेली. यानंतर पालकांनी शाळेत धाव घेत शाळा प्रशासनाला या संपूर्ण घटनेची माहिती दिली. यानंतर पीडित मुलींची खासगी रुग्णालयात तपासणी केल्यानंतर अत्याचार झाल्याचं उघड झालं. यानंतर पीडित मुलींचे पालक या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी गेले तेव्हा पोलिसांनीही त्यांची तातडीने दखल घेतली नाही.

१२ तास त्यांना रखडत ठेवण्यात आले आणि त्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात आली. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी दिरंगाई करणाऱ्या पोलिसांवरदेखील कारवाई केली. तसेच या प्रकरणातील संबंधितांना निलंबित करण्यात आले असून, आरोपीला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ‘अक्षय शिंदे’ असं या आरोपीचं नाव आहे.

आता आरोपी अक्षय शिंदेने या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा दावा केला जातोय. आता अक्षय शिंदेच्या वडिलांनी या सर्व आरोपांना फेटाळत अक्षय शिंदे निर्दोष असल्याचा दावा केला आहे.

अक्षयचे आई वडील माध्यमांशी बोलतांना म्हणाले,’अक्षयला फक्त १५ दिवस झाले होते शाळेत कामाला लागून, १७ तारखेला त्याला पोलिसांनी धरलं. अक्षयला धरुन नेलं इतकंच आम्हाला सांगण्यात आलं. पोलिसांनी अक्षयला मारहाण केली. माझ्या लहान मुलालाही पोलिसांनी मारलं. चौकीत गेल्यावर पोलिसांनी सांगितलं की, तुमच्या मुलाने चुकीचा प्रकार केला आहे. अक्षय फक्त ११ वाजता बाथरुम धुवायला जात होता. बाकी कुठलंही काम दिलेलं नव्हतं. त्यानंतर शाळेत झाडू मारायचा. संध्याकाळी साडेपाच वाजता शाळा सुटली की झाडू मारायला जायचो. आमचं सगळं कुटुंबच तिथे कामाला होतं. माझ्या मुलाने हा काही प्रकार केलेला नाही.’ असेही ते म्हणाले आहे.

लैंगिक अत्याचाराचा प्रकार कधी समोर आला?
बदलापूर पूर्वेतील आदर्श विद्यालय या शाळेमध्ये एका चार वर्षांच्या आणि एका सहा वर्षांच्या मुलीवर शाळेतील शिपायाकडून अत्याचार करण्यात आला. लघुशंकेला घेऊन जाऊन या मुलींवर अत्याचार करण्यात आला. १२ ऑगस्ट रोजी एका मुलीसोबत दुष्कृत्य केले गेले, तर १३ ऑगस्टला आणखी एका दुसऱ्या चिमुरडीवर अत्याचार करण्यात आला.

या मुली शाळेत जायला तयार नसल्याने त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली, त्यानंतर हा गंभीर प्रकार उघडकीस आला.दोन्ही पीडित मुलींच्या कुटुंबीयांनी १६ ऑगस्ट रोजी पोलिस ठाण्यात धाव घेतली. मात्र गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी १२ तासांचा विलंब केल्याचा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे.

या प्रकरणी अक्षय शिंदे नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. यानंतर संतप्त झालेल्या लोकांनी बदलापूर स्थानक बंद ठेवत आंदोलन केले. तसेच आंदोलकांकडून आरोपीला फाशी द्या, नाहीतर आरोपीला आमच्या हवाली करा अशी मागणी करण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने घेतली दखल
बदलापूरमध्ये एका शाळेत सफाई कामगाराने दोन चिमुरड्या मुलींचे लैंगिक शोषण केल्याची घटना घडली आहे. यातील आरोपी अटक असून गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे. तर शाळेने संबंधितांना निलंबित केले आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे.

राष्ट्रीय बाल हक्क आयोगाचं पथक महाराष्ट्रात येणार
या प्रकरणाची राष्ट्रीय बालक आयोगाने दखल घेतली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी राष्ट्रीय बाल हक्क आयोगाकडून एक पथक बदलापूरला पाठवण्यात येणार आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल, असे राष्ट्रीय बालहक्क आयोगाने सांगितले आहे. केंद्र सरकारने निर्मित केलेल्या राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. यासाठी आयोगाकडून एक तपास पथक बदलापूर येथे पाठवण्यात येणार आहे. हे पथक या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करेल. तसेच पोलिसांनी पीडितेच्या पालकांना तक्रार नोंदवण्यासाठी 12 तास थांबवले, ही धक्कादायक बाब आहे. याप्रकरणी राज्य शासनाकडून संबंधित पोलीस अधिकाऱ्याची बदली करण्यात आली आहे, अशी माहिती माहिती बालहक्क आयोगाचे अध्यक्ष प्रियांक कानगो यांनी दिली आहे. तसेच राष्ट्रीय बाल हक्क आयोगाकडून पाठवण्यात येणाऱ्या या समितीवर माझेही लक्ष असेल. तसेच याप्रकरणी सहभागी असलेल्या सर्व दोषी पोलिस अधिकाऱ्यांना शिक्षा होईल. त्यासोबतच याप्रकरणाची सखोल चौकशी आम्ही देखील करणार असल्याची माहिती बालहक्क आयोगाचे अध्यक्ष प्रियांक कानगो यांनी दिली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कंटेनर चालकाचा प्रताप; दहा ते पंधरा गाड्यांना धडक, अनेकजण जखमी

पुणे / नगर सह्याद्री - चाकण शिक्रापूर रस्त्यावर भरधाव मालवाहतूक करणाऱ्या कंटेनरने दहा ते पंधरा...

मनपाचा ‘तो’ निर्णय अन्यायकारक! शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन जाधव म्हणाले, जनतेवर बोजा..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- महापालिकेने सर्वसामान्य नागरिकांकडून दुपटीने पाणीपट्टी लागू करण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी...

.. तर नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल; अविनाश घुले यांचा मनपाला इशारा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगर शहरातील नागरिकांना रोज पाणी पुरवठा करावा आणि मगच पाणीपट्टीत वाढ...

कोरठण खंडोबा यात्रोत्सव उत्साहात; लाखो भाविकांनी घेतले दर्शन

पारनेर | नगर सह्याद्री:- पिंपळगाव रोठा ता पारनेर येथील राज्यभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र...