पारनेर | नगर सह्याद्री
पारनेरमध्ये आयडी घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. पारनेर पंचायत समितीचे तालुका व्यवस्थापक पदाचा प्रोजेक्ट कालावधी संपूनही बजरंग यशवंत औटी यांनी पारनेर पंचायत समिती व त्याअंतर्गत येणार्या सर्व ग्रामपंचायती कार्यालयांचे सर्व आयडी पासवर्ड (जीइएम, इजीआरएएम, इआरपी) यांचा त्यांनी काहीही अधिकार नसताना वापर केला व ते आजही करीत आहेत, अशी तक्रार पारनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दयानंद पवार यांनी पारनेर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांकडे केली असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
पंचायत समितीचे तालुका व्यवस्थापक बजरंग औटी यांनी सर्व आयडींचा वापर करीत प्रशासनातील अनेक व्यक्तींना वेठीस धरले आहे. तसेच सुपा येथील आयसीआयसीआय बँकेत एचओडी प्रशासनातील लॉगिंगला स्वत:चा मोबाइल नंबर व बनावट ई-मेल व स्वत:चे नाव लावले आहे, असे गटविकास अधिकारी दयानंद पवार यांनी तक्रारीत म्हटले आहे. औटी हे व्यवस्थापक पदावर नसतानाही तसे भासवून पदाचा गैरवापर केला आहे. अन्य अधिकार्यांशी ते अरेरावी करतात. महिला अधिकार्यांना वेठीस धरून त्यांची छळवणूक करतात.
औटी यांनी माझा जीएमइ पोर्टल आयडी पासवर्डचा वापर करून पंचायत समिती व ग्रामपंचायतींच्या स्तरावरून बनावट खरेदी प्रक्रिया पार पाडली आहे. एचओडी स्वत:ला भासवून ही खरेदी बजरंग औटी यांच्या नावावर झाली आहे. पंचायत समितीच्या अनेक वस्तू व गोपनीय माहिती त्यांच्याकडे आहे. तसेच कंपनीकडून येणारी स्टेशनरीही त्यांच्याकडे आहे. त्यांनी कुठलाही हिशोब दिला नाही. तरी त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी गटविकास अधिकारी श्री. पवार यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत केली आहे.