मुंबई / नगर सह्याद्री –
“आपले ५४ पैकी ४४ आमदार पळवले, ते पळवण्यात आंबेगावचे आमदारही सहभागी होते”, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरद पवार) अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर टीका केली आहे. शरद पवार म्हणाले, “मोठ्या विश्वासाने त्यांच्यावर (दिलीप वळसे पाटील) जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या. मात्र, त्यांनी त्याचा गैरफायदा घेतला. असं कधी घडेल हे मला स्वप्नातही वाटलं नव्हतं”. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीप्रकरणी शरद पवारांनी अजित पवार व दिलीप वळसे पाटलांवर टीका केली आहे.
आंबेगाव येथील प्रचार सभेत शरद पवार म्हणाले, “पक्षाच्या ५४ पैकी ४४ आमदारांना ते (अजित पवार) घेऊन गेले. त्या भूमिकेत आंबेगाव तालुका देखील सहभागी झाला होता. मोठ्या विश्वासाने मी त्यांच्यावर (दिलीप वळसे पाटील) काही जबाबदार सोपवल्या होत्या, त्यांना अधिकार दिले होते, सत्ता दिली. परंतु, दुर्दैवाने त्यांनी वेगळा निर्णय घेतला. दिलेल्या सत्तेचा गैरफायदा घेतला. त्यांच्याकडून असं कधी घडेल हे मला स्वप्नातही वाटलं नव्हतं.
दिलीप वळसे-पाटील यांनी अजित पवार यांच्या गटाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शरद पवार आणि वळसे-पाटील यांच्या कुटुंबात दुरावा निर्माण झाला आहे. पक्ष फुटीनंतर शरद पवार हे दुसऱ्यांदा आंबेगाव तालुक्यात आले होते. याआधी ते गेल्या महिन्यात आंबेगावला गेले होते. त्यावेळी शरद पवार म्हणाले होते, “अनेकांचा आग्रह होता की आंबेगाव तालुक्यात येऊन जावं. राज्याच्या राजकारणात काही बदल झालेत. सत्ता येते आणि जाते, पण सत्तेला चिकटून राहायचं नाही. चिकटून राहण्याची भूमिका घेतल्यानंतर लोक कधी ना कधीतरी कायमचा निकाल दिल्याशिवाय राहत नाही. आंबेगाव तालुक्यात एक जाहीर सभा घ्यावी हा आग्रह याची पूर्तता लवकरच करेन.” त्यानंतर आज (३१ ऑक्टोबर) शरद पवारांनी आंबेगावला सभा घेतील.
शरद पवार म्हणाले होते “महाराष्ट्रात आणि बाहेर सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संस्थापक कोण, ते सर्वांना ठाऊक आहे. त्यामुळे लोकांची भावना ही अनुकूल आहे, असं आमचे लोक सांगतात, त्यात तथ्य आहे. कुणी वेगळी भूमिका घेतली असेल, तर तो त्यांचा लोकशाहीमधील अधिकार आहे. त्यावर मी भाष्य करू इच्छित नाही.”
मविआमधील बंडखोरी कशी थोपवणार?
१०-१२ मतदारसंघात जे काही थोडेफार मतभेद आहेत ते दूर होतील. जिथे दोन उमेदवारांनी अर्ज भरले आहेत तिथे मार्ग काढला जाईल. ६ नोव्हेंबरपासून मी, राहुल गांधी, उद्धव ठाकरे आणि इतर सगळेच प्रचार सुरु करणार आहोत. महाराष्ट्रातील जनता आम्हाला साथ देईल.