पारनेर। नगर सहयाद्री
आई-वडिलांच्या निधनानंतर गावकऱ्यांनी दिलेल्या आधारामुळेच आज या पदावर उभा आहे. आज माझा माझ्याच गावात सन्मान होत आहे, हे भारतरत्न मिळाल्यासारखं वाटतं, अशा भावूक शब्दांत पुणे विभागाचे अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे पोलिस उपायुक्त गणेश इंगळे यांनी आपले मत व्यक्त केले.
सनई-चौघड्यांच्या मंगल सुरात, फुलांच्या उधळणीसह आणि फटाक्यांच्या आतषबाजीत, गावकऱ्यांच्या उपस्थितीत पुणे विभागाच्या अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे पोलिस उपायुक्त गणेश इंगळे यांचा सत्कार करण्यात आला. वर्गमित्र-मैत्रिणींनी खास सजावट करून आपल्या बालमित्राचा गौरव केल्याने वातावरण भावनांनी भरून गेले होते.
वनकुटेकरांनी मला कधीच आई-वडिलांची उणीव भासू दिली नाही, असं कृतज्ञतेने सांगताना पोलिस उपायुक्त गणेश इंगळे भावूक झाले होते. पोलिस उपायुक्त गणेश इंगळे यांनी स्वप्न मोठं ठेवा, चिकाटी सोडू नका आणि अपयशाची भीती मनातून काढून टाका. आत्मचिंतन करा, शरीर तंदुरुस्त ठेवा. अंतःशक्ती जागी झाली, तर कुणीही तुमचं यश थांबवू शकत नाही, असा ठाम सल्ल गावातील युवकांना दिला.
शत्रूराष्ट्र तरुणांना व्यसनांच्या विळख्यात अडकवत आहेत. महाराष्ट्रात या संकटाविरुद्ध स्वतंत्र टास्क फोर्स स्थापन करण्यात आली असून, माझी त्यात नियुक्ती झाली आहे. मला कोणतेही व्यसन नाही, म्हणून अधिकारवाणीने सांगतो गावातील कोणीही या वाटेवर जाऊ नये, न्यथा मला कठोर कारवाई करावी लागेल. असा स्पष्ट इशारा पोलिस उपायुक्त गणेश इंगळे यांनी दिला. गावातील युवकांना व्यसनमुक्त राहण्याचा संदेश देताना त्यांचा स्वर कडक आणि संवेदनशील होता. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राजू डहाळे व योगेश मुसळे यांनी केले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.