spot_img
अहमदनगरवांबोरीचा कारखाना सहकारी केल्यास मी पाठींबा द्यायला तयार ; कर्डिले यांचे रोखठोक...

वांबोरीचा कारखाना सहकारी केल्यास मी पाठींबा द्यायला तयार ; कर्डिले यांचे रोखठोक मुलाखतीत तनपुरे यांच्यावर जोरदार टिकास्त्र

spot_img

छत्रपती शिवरायांचं नाव हातोड्याने तोडून आजोबाचं नाव दिलं! तो कारखाना बंद पाडून बापाच्या नावानं कारखाना काढणारा दिवटा नातू राहुरीकरांना नकोय! / शिवाजीराव कर्डिले यांचे रोखठोक मुलाखतीत तनपुरे यांच्यावर जोरदार टिकास्त्र | राहुरीकरांमध्ये दहशत तुमचीच मग बोंबा माझ्या नावाने का मारता?

थेट भेट / शिवाजी शिर्के

मोठ्या महत्प्रयासाने जुन्या कारभार्‍यांनी राहुरीत छत्रपती शिवाजी महाराज यांने नावाचा सहकारी साखर कारखाना काढला. त्यात बाबुरावदादा तनपुरे यांचेही योगदान राहिले. मात्र, छत्रपतींपेक्षा आपण आणि आपल्या कुटुंबाचे मोठे योगदान असल्याचा त्यांना भास झाला. त्यातूनच त्यांनी या कारखान्यावरील छत्रपतींच्या नावाची पाटी छनी- हातोड्याने तोडली. पुढे जाऊन वांबोरीत स्वत:चा खासगी कारखाना उभा करताच या दिवट्याने आजोबाच्या नावाचा कारखाना बंद पाडला. हा कारखाना चालू करण्यासाठी जिल्हा बँकेसह अन्य ठिकाणाहून मदतीची भूमिका मी घेतलीय आणि तो मी चालू करुन दाखवणारच आहे. मात्र, वांबोरीतील खासगी साखर कारखाना तनपुरेंनी सहकारी करत जनतेच्या मालकीचा केल्यास मी त्यांना पाठींबा द्यायला तयार असल्याची भूमिका भाजपा महायुतीचे राहुरीतील उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी जाहीर केली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर सह्याद्रीला दिलेल्या विशेष मुलाखतीत कर्डिले बोलत होते. माझ्या विरोधात नरेटीव्ह सेट करत दहशतीचा मुद्दा मांडणार्‍या तनपुरे बाप- लेकांची राहुरीत कशी आणि किती दहशत आहे याचे पुरावे लवकरच मी जनतेसमोर मांडणार असल्याचे संकेत देतानाच हे पुरावे समोर आल्यानंतर जनताच योग्य तो निर्णय घेईल असा आशावाद शिवाजीराव कर्डिले यांनी व्यक्त केला.

शेतकर्‍याचं पोरगं, त्यानं तालिम केलीय अन् पहिलवान आहे!
शेतकर्‍यांच्या कुटुंबातील मुलांना आजही पहिलवानकीचा छंद आहे. माझं पोरगंही त्याला अपवाद नाही. त्याने तालिम केलीय आणि त्याने पहिलवानकी देखील केलीय! त्याने दंड थोपटल्याचा बाऊ केला जात आहे. पहिलवानांनी दंड थोपटले म्हणजे दहशत, दादागिरी केली असं नाही. मुळात त्यांना पराभव दिसू लागलाय. पराभव समोर दिसू लागल्यानेच आता त्यांच्याकडून विकासाचे मुद्दे सोडून दुसरीकडे लक्ष वेधण्यासाठी चुकीचे मुद्दे समोर आणले जात आहेत.

त्यांच्या विरोधात जनतेनेच दंड थोपटलेत!
मागील निवडणुकीतील पराभवानंतर मी सलगपणे जनतेचे प्रश्न सोडविण्यात व्यस्त आहे. मला मोठा प्रतिसाद मिळत आहे. आमदार नसल्याचे मला जाणवले नाही आणि जनतेला देखील. महिन्यापासून तरुणांचा मोठा लोंढा माझ्याकडे येत आहे. मागीलवेळी तनपुरेंनी भावनिक प्रश्न केले. आश्वासन दिले. मात्र, आश्वासन पूर्ती झाली नाही. म्हणून जनता माझ्यासोबत येताना दिसते. मतदारसंघात वातावरण बदलले असून त्यांंच्या विरोधात जनतेनेच दंड थोपटले आहेत.

सहा खात्यांचा वापर ना राज्याला झाला, ना जिल्ह्याला आणि ना मतदारसंघाला झाला. सहा खात्याचे मंत्रीपद त्यांनी त्यांच्या तुंबड्या भरण्यासाठी आणि गोरगरीबांना लुटण्यासाठीच केला. डीपी दिल्याचे सांगणारा मंत्री कसा असतो? ज्या डिप्या दिल्याचे ते सांगत आहेत, त्यांची मंजुरी मी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांच्याकडून आधीच मंजूर करून घेतल्या होत्या. त्यांनी आराखडा तयार केला होता आणि त्यानुसार त्यांची कामे आचारसंहिता संपल्यानंतर मार्गी लागली. त्या कामांचे नारळ यांनी फोडले इतकेच! याचा अर्थ ही कामे, डीप्या त्यांनी मंजूर केल्या असे कसे म्हणता येईल?

वावरथ जांभळीकरांचा बोटीतील प्रवासाचा वनवास का सुटला नाही?
आदिवासी समाज राहत असलेल्या वावरथ जांभळी सारख्या दुर्गम भागातील नागरिकांनी बोटीची अनेकदा मागणी केली. कामे केल्याची बोंब ठोकणार्‍या तनपुरेंना या आदिवासी बांधवांना बोट उपलब्ध करून देता आली नाही. येथील समाज पाण्यात बुडावा आणि संपावा यासाठी त्यांनी देव पाण्यात घातले आहेत का? सहा खात्यांचे मंत्रीपद सांभाळणार्‍यांसाठी ही बाब अभिमानाची नक्कीच नाही. पंचवीस वर्षे त्यांचे वडिल आमदार- खासदार होते. आता हे मंत्री राहून देखील हा प्रश्न सुटला नाही. वावरथ जांभळी व परिसरातील गावांसाठी यांचे मंत्रीपद का कामाला आले नाही याचे उत्तर आता या भागातील जनता मागत आहे.

विरोधकांना संपवून टाकण्यासाठी मामा- भाच्यांनी लाल दिवे वापरले!
मतदारसंघात मी डोईजड होतोय असं वाटू लागल्याने मामाला हाताशी धरून माझ्याविरोधात कुभांड रचले गेले. अधिकार्‍यांना हाताशी धरत माफ्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. मामाने त्याचं मंत्रीपद जनतेच्या भल्यासाठी वापरण्यापेक्षा भाच्याच्या विरोधातील राजकीय नेत्यांना संपुष्टात आणण्यासाठीच वापरले. त्यांच्या मंत्रीपदाचा फायदा मतदारसंघातील जनतेला झालाच नाही. विरोधकांना संपवून टाकण्यासाठी मामा- भाच्यांनी त्यांचे लाल दिवे वापरले आणि सुडाचे राजकारण केले.

वांबोरी चारीच्या दुसर्‍या टप्प्याचे काय झाले?
वांबोरी चारीच्या दुसर्‍या टप्प्याचे आश्वासन दिले होते, त्याचे काय झाले हे आधी जनतेला सांगा. एकनाथ शिंदे यांचे सरकार आल्यावर आम्ही त्याचा पाठपुरावा केला अणि त्याचा कार्यारंभ आदेश काढला. महिन्यापूर्वी या योजनेचे भूमिपुजन पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते केले.

कारखान्यावर ११० कोटींचे जिल्हा बँकेचे अन् अन्य बँकांचे ३०० कोटींचे कर्ज हे त्यांचे पाप!
राहुरीकरांची कामधेनू समजल्या जाणार्‍या साखर कारखान्यावर त्यांनी ११० कोटींचे कर्ज करून ठेवले. अन्य बँकांचे जवळपास ३०० कोटींचे कर्ज घेऊन ठेवले. कारखाना बंद पाडण्याचे काम केले. जिल्हा बँकेचे संचालक ते होते आणि मी देखील. त्यावेळी पांडुरंग अभंग बँकेचे अध्यक्ष होते. त्यावेळी कारखान्याकडे जवळपास ९५ कोटी रुपयांची साखर पडून होती. ती साखर विक्री करु नका असे सांगितले होते. कारण बाहेर साखर विक्री केली तर जिल्हा बँकेला पैसे देता येणार नाही असे मी आणि पांडुरंग अभंग यांनी त्यांना सांगितले. त्यांनी ते मान्य केले नाही. जिल्हा बँकेच्या पैशाची मला गरज नाही असे त्यांनी संचालक मंडळ बैठकीत सांगितले. त्यांनी ती साखर बाहेर बेकायदेशिर विकली. मी त्यावेळी त्यास अटकाव केला असता आणि कारखाना बंद पडला असता तर ते खापर त्यांनी माझ्यावर फोडले असते. त्यामुळे मी दुर्लक्ष केले. जिल्हा बँकेत संचालक असताना जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांना मदतीची भूमिका घेतली. शेतकर्‍याची कामधेनू वाचावी यासाठी मी भूमिका घेत आलोय. हा कारखाना चालावा यासाठी भूमिका घेतली. यानंतर कारखान्याची निवडणूक झाली. तनपुरे विरुद्ध विखे पाटील यांच्यात निवडणूक झाली. त्यावेळी मी तटस्थ राहिलो. ज्याच्या ताब्यात कारखाना जाईल त्याला जिल्हा बँकेतून मदत देईल अशी भूमिका मी मांडली. खासदाराच्या ताब्यात कारखाना आल्यानंतर मी मदतीची भूमिका घेतली.

सूत गिरणी बंद पाडण्याचे पापही यांचेच!
राहुरीकरांसाठी अत्यंत महत्वाची असणारी सूत गिरणी बंद पाडण्याचे पाप तनपुरेंनी केले. विद्यापीठासाठी अनेकांनी जमिनी दिल्या. त्या जमिन धारक प्रकल्पग्रस्तांना आजही शासनाकडे चकरा माराव्या लागत आहेत. त्यांचा तळतळाट या तनपुरेंना लागल्याशिवाय राहणार नाही. आजही या प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळाला नाही. २५ वर्षे यांना आमदारकी, खासदारकी, मंत्रीपद अशी संधी मिळाली असताना त्यांनी मतदारसंघात कोणता नवा उद्योग आणला? कोणती एमआयडीसी आणली? रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम केले?

जिल्हा बँक भरती नियमानुसारच होईल, पण तुम्ही कितीजणांना रोजगार दिला ते आधी सांगा!
जिल्हा बँकेत नोकरभरती आवश्यकच होती. त्याला राज्य शासनाने परवानगी दिलीय. भरती प्रक्रिया पारदर्शी होण्यासाठी एजन्सी नियुक्त झालीय. त्याठिकाणी मेरीटवरच नोकर्‍या मिळतील. माझ्यासह कोणाचाही त्यात हस्तक्षेप असण्याचे कारण नाही. त्यामुळे बँकेत नोकरी लावतो असे आश्वास द्यायला मी मूर्ख नाही. मात्र, तम्ही २५ वर्षे आमदार, खासदार, मंत्रीपदे घेतली. त्यामाध्यमातून किती स्थानिकांना रोेजगार दिला हे आधी सांगा? ज्यांना नोकर्‍या दिल्या, त्यांचे पगार घेण्याचे पाप तुम्ही करता! हेच पाप तुम्हाला या निवडणुकीत किंमत मोजण्यास भाग पाडणार आहे. तुमचा निष्क्रीयपणा झाकण्यासाठी लक्षविचलीत करणारे मुद्दे ते मांडत असल्याचे दिसून येते.

त्यांची पाठ टेकणार असल्याचे स्पष्ट झाल्यानेच ते रडीचा डाव खेळू लागलेत!
मुख्यमंत्र्यांच्या योजनेतील रोजगार सेवक म्हणून काम करणार्‍या जिल्हा बँकेतील रोजगार सेवकांना दमदाटी केली जाते. त्यांची सहा महिन्यांची मुदत आहे. त्यातील काहीजणांनी हे काम सोडले. मात्र, असे काम सोडणार्‍यांच्या तक्रारी घेऊन ते रडीचा डाव खेळत आहेत. त्यांच्या ताब्यातील शिक्षण संस्थेचे अनेक कर्मचारी आज त्यांच्या प्रचारासाठी जाहीरपणे फिरताना दिसतात. त्यांना ते चालते? त्यांच्या कर्मचार्‍यांचे पुरावे माझ्याकडे आहेत. मात्र, जनतेने त्यांना जागा दाखवून देण्याचा निर्णय घेतलाय! त्यांची पाठ टेकणार असल्याचे स्पष्ट झाल्यानेच ते रडीचा डाव खेळू लागले आहेत.

माझं स्टेटस ठेवलं तरी धमक्या देतात!
कोण दादागिरी करतं हे राहुरीकरांना माहितीय! माझं स्टेटस ठेवलं तरी धमक्या देतात! माझ्यावरील गुन्ह्यांचे प्रतिज्ञापत्र देताना मी गुन्ह्यांचा उल्लेख केलाय. त्याची यादी हे वाचतात आणि मला गुंड असल्याचे मतदारांना भासवतात. मात्र, माझ्यावर गुन्हे दाखल होण्यासाठी त्यांनी त्यांच्या मामांचा कसा वापर केला आणि त्या मामाने ही यादी कशी वाढवली हे राहुरीकरांना चांग़लेच माहिती आहे. कोणत्याही गुन्ह्यात शिक्षा झाली नसताना अपप्रचार केला जात आहे. कोण खरे गुन्हेगार आहेत हे मी लवकरच उघडे करेल. विकासाच्या मुद्यावर न बोलता गुंडगिरी, धमक्यांच्या मुद्यावर बोलत आहेत.

दातीर पत्रकाराच्या हत्येत मास्टरमाईंड तुम्हीच!
राहुरी शहराच्या बाजूला असणार्‍या जमिनीवर आरक्षण टाकण्याचे काम त्यांनी केले. दातीर या पत्रकाराने याबाबतची माहिती मिळवली. त्याने खोलात जाऊन माहिती घ्यायला प्रारंभ करताच त्या पत्रकाराची हत्या करण्यात आली. त्या हत्येचे मास्टरमाईंड हेच! म्होरके हेच होते हे त्यावेळी स्पष्टपणे समोर आले होते. त्या पत्रकाराच्या कुटुंबावर दबाव टाकला आणि त्याच्याप्रमाणे तुमची देखील गत करू आणि संपवून टाकू अशा धमक्या त्याच्या कुटुंबियांना दिल्या गेल्या.

विरोध केला की त्याच्या जागेवर आरक्षण टाकले जाते आणि….
राहुरीत त्यांची प्रचंड दहशत आहे. त्यांच्या विरोधात कोणी भूमिका घेतली तर त्याच्या जागेवर आरक्षण टाकले जाते. हे आरक्षण उठवण्यासाठी यांच्या पाया पडावे लागते. पाया पडला नाही तर त्यांचे पंटर एजंट म्हणून पुढे जातात आणि ती जमिन कवडीमोल भावाने विकत घेतात. जमिन विकत घेताच येथील आरक्षण उठवले जाते. त्यांना मामाच्या कृपेने मिळालेले मंत्रीपद यांनी राहुरीतील विरोधकांची अशाप्रकारे जिरवण्यासाठी वापरले.

वाळू अन् मुरुम तस्करीचेही यांचेच पाप!
२०१९ मधील निवडणुकीत माझ्यावर वाळू तस्करीचा आरोप केला. तालुक्यातील वाळू मी उपसून टाकील असा आरोप झाला. मात्र, प्रत्यक्षात या तालुक्यातील वाळू आणि मुरुम याचा बेकायदा उपसा कोण आणि कसा करतंय हे समोर आले आहे. यांचेच पंटर त्या तस्करीत गुंतले आहेत. यांचेच हे धंदे आणि आरोप माझ्यावर! १९९५ पासून लोकप्रतिनिधी आहे. मी जर गुंडगिरी केली असती तर जनतेने मला स्वीकारले असते का?

बुर्‍हाणनगरमध्ये जे घडलेच नाही त्याची पोस्ट टाकून सहानुभूती मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न
प्रचाराच्या निमित्ताने ते बुर्‍हाणनगरमध्ये आले. त्यावेळी बाजार भरला होता. त्या बाजारात एका शेतकर्‍याने घोषणा दिल्या इतकेच! कोणीही त्यांना अडवले नाही आणि विरोध देखील केला नाही. काहीच झाले नाही. झाले असेल तर त्याची पोलिसांनी चौकशी करावी आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करावा. काहीच झाले नसताना उगीचच साप- साप म्हणून ओरडणार्‍यांनी सहानुभूती मिळविण्यासाठी हा केविलवाणा प्रयत्न केलाय. राहुरीत माझे स्टेटस ठेवले तर लागलीच त्याला घरात घुसून धमकी देण्यापर्यंत त्यांची मजल जातेच कशी? प्रचारात सहभागी होणार्‍यांना धमकी दिल्या जातात!

रिटायरमेंटच नरेटीव्ह बंद करा; टायगर अभी जिंदा है!
पराभव दिसू लागल्याने माझ्याबद्दल बोलताना ते सांगत आहेत की, कर्डिलेंची ही शेवटची निवडणूक आहे. त्यांचे हे वक्तव्य म्हणजे त्यांच्या बौद्धीक दिवाळखोरीचे लक्षण आहे. शरद पवार तुम्हाला चालतात. मी तर अजुन त्यांच्यापेक्षा तरुण आहे. माझ्या रिटायरमेंटची चुकीची चर्चा करून मतांचा जोगवा ते मागत आहेत. मात्र, त्यांनी हे लक्षात घ्यावे की अजुन वीस वर्षे हा टायगर सक्रिय राजकारणात राहणार आहे. कारण राहुरीकरांना तुमची दहशत, दादागिरी नकोय! राहुरीकरांना मोकळा श्वास घ्यायचा असेल तर मीच त्यांना हवा आहे. टायगर अभी जिंदा है, ही नोंद त्यांनी घ्यावी इतकेच!

प्रसाद शुगर २७०० भाव देते अन् मग प्रवरा ३२०० चा भाव कसे काय देतो?
खासगी साखर कारखाना काढल्याची टिमकी वाजवताना शेतकर्‍यांच्या हिताचा डांगोरा पिटवणार्‍यांनी प्रसाद शुगरच्या माध्यमातून अनेक शेतकर्‍यांची देणी थकवली आहेत. ते शेतकरी आजही त्यांच्या नावाने बोटं मोडत आहेत. तुमचा कारखाना खासगी असतानाही तुम्ही २७०० रुपयांचा भाव कसा देता? प्रवरा कारखाना ३२०० रुपयांचा भाव देत असेल तर तुमचा इतका निच्चांकी भाव का या प्रश्नाचे उत्तर जनतेला हवे आहे.

कामगारांचे शंभर कोटी थकवले, हे पापही त्यांचेच!
आजोबाच्या नावाचा साखर कारखाना असताना त्यांनी तो बंद पाडला आणि बापाच्या नावाने खासगी साखर कारखाना काढला. आजोबाच्या नावाने बंद पाडलेल्या साखर कारखान्यात राहुरी परिसरातील अनेकांना रोजगार मिळाला होता. कारखाना बंद पडल्यानंतर तेथील कामगारांचे शंभर कोटी रुपये त्यांनी थकवले. कामगारांचे थकीत शंभर कोटी थकवणार्‍यांनी या कामगारांच्या चुली बंद पाडल्या आणि हे राहुरीकरांच्या भल्याच्या बाता ठोकू लागले आहेत. हे म्हणजे सौ चुहे खा के, बिल्ली चली हज को; असे झालेय! प्रसादचा मलिदा खाताना बंद पाडलेल्या कारखान्यातील कामगारांच्या चुलींवर पाणी टाकले त्याचे काय?

मामाची पेढेतुला करणार्‍यांनी निळवंडेचे श्रेय घेण्याचा बालीशपणा केला!
जनतेसमोर जा आणि बोला! विकासाच्या मुद्यावर बोलतच नाहीत. मागील निवडणकुीत बीडला पाणी देणार असा आरोप माझ्यावर केला. माझं दोन बोटाच कागद आहे का? निळवंडेचं पाणी फक्त आणि फक्त मोदी आणि गडकरीसाहेबांच्या माध्यमातून पाणी मिळत आहेत. हे पाणी आमच्यामुळचे हे ते सांगत आहेत. मामाची पेढेतुला केली म्हणजे हे काम त्यांनी केले हे खोटे! पिचडसाहेबांनी विरोध केल्यानंतर मी विखे पाटलांच्या माध्यमातून प्रयत्न केले आणि प्रश्न निकाली निघाला. राहुरीतील जनतेला हे सारं माहिती आहे.

राहुरी एसटी डेपोचे काम आमच्या सरकारचे!
राहुरीतील एसटी डेपोच्या कामाचा प्रस्ताव जुनाच! हे मंत्री झाले तरी त्यांना हा विषय आठवला नाही. आमचे सरकार सत्तेत आल्यानंतर हा विषय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विखे पाटलांच्या माध्यमातून मांडला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी या कामात सकारत्मक भूमिका घेतली आणि त्यातून या एसटी डेपोच्या कामाचा विषय मार्गी लागला. अत्यंत देखणी अशी वास्तू येथे उभी राहणार आहे. या कामात त्यांचा काडीचाही संबंध नाही. आमदार असल्याने त्यांनी या कामाचे कितीही क्रेडीट घेण्याचा प्रयत्न केला तरी त्यात त्यांचा काहीही संबंध नाही.

पन्नास टक्के कामे आधीच मंजूर झालेली
चाळीस वर्षात त्यांना राहुरीत साधे ग्रामीण रुग्णालय त्यांना करता आले नाही, विकास कोणता केला? वांबोरी चारीचा दुसरा टप्पा करता आले नाही. वांबोरीतून मुरुम उपसा झाला. त्याची बोगस बिले काढली. लाखो रुपये त्यात खाल्ले! मळीचं पाणी वांबोरीत सोडून दिले. वांबोरी ग्रामपंचायतीची ३२ लाखांची पट्टी त्यांनी भरली नाही. मागायला गेल्यास ते दादागिरीची भाषा करतात!

कोरोना कालावधीत त्यांनी मांडलेला इंजेक्शनचा बाजार राहुरीकर विसरले नाहीत!
कोरोना कालावधीत मी आमदार नसतानाही अनेकांना मदतीचा हात पुढे केला. अहोरात्र जनतेच्या मदतीला धावलो. मंत्रीपदाच्या माध्यमातून रमडीसीव्हर इंजेक्शन मिळवून त्यांनी एजंटांच्या माध्यमातून चाळीस- पन्नास हजार रुपयांना हे इंजेक्शन विकले. राहुरीत यासाठी त्यांनी काही एज़ंट नेमले होते हे राहुरीकर विसरले नाहीत. त्यांनी दुकान मांडले होते. जो जास्त पैसे देईल त्याला यांनी इंजेक्शन दिले. मदतीचा हात पुढे करण्याऐवजी त्यांनी दुकान मांडले होते आणि हे दुकान आजही राहुरीकरांच्या डोळ्यासमोर आहे. वेळेवर उपचार भेटावे, रुग्णाला बेड मिळावा यासाठी प्रयत्न करण्याऐवजी यांनी स्वत:ला घरात कोंडून घेतले. मी आमदार नव्हतो, तरीही मी नगरमधील बहुतांश हॉस्पिटलमध्ये राहुरीतील मतदारांना बेड मिळवून देण्यासह त्यांचे बीलाची रक्कम आणि अन्य व्यवस्था करण्यात पुढे होतो.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

जिल्ह्यात महायुतीला सर्वाधिक जागा! दोन अपक्ष बाजी मारणार

महायुती 7, मविआ 3 तर 2 अपक्ष बाजी मारणार! नगर शहरात कमालीची उत्सुकता | श्रीगोंदा,...

शिरसाटवाडी मतदान केंद्रावर काय घडलं?; काय म्हणाल्या आमदार मोनिकाताईं राजळे? वाचा सविस्तर..

पाथर्डी | नगर सह्याद्री:- विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया बुधवारी पार पडली. आररोप प्रत्यारोप, कुठे पैशाचे...

अदानी अडचणीत; अमेरिकेमध्ये फसवणुकीचा खटला दाखल; काय आहे नेमके प्रकरण?

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - उद्योगपती गौतम अदानी यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे....

CM पदाबाबत संजय राऊत यांचे मोठे विधान; थेट तारीख आणि वेळच सांगून टाकली

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : विधानसभा निडवणुकीच्या मतदानानंतर बुधवारी समोर आलेल्या एक्झिट पोलमध्ये महायुतीच्या...