सुपा । नगर सहयाद्री
दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या पारनेर तालुक्यात वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी कोट्यवधीचे कामे सध्या चालू आहेत, मात्र यावर ना प्रशासनाचे लक्ष आहे ना गाव कारभारी यांचे, ग्रामस्थांनी तक्रार केली तर शासकीय अधिकारी जुमानत नाहीत तर ठेकेदार इतके पोहोचले आहेत की तक्रार करताल तर याद राखा असा दमच देऊ लागले असल्याने हा कोट्यवधींचा निधी पाण्यात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पारनेर तालुक्यातील रूईछत्रपती येथील हंगा नदीवर ढास वस्तीलगत लाखो रुपये खर्च करून केटीवेअर बांधला जात आहे. केटीवेअरचे सुरुवातीपासूनच काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू आहे. संबंधित ठेकेदाराने चक्क पाण्यात स्टिल रोवून काम उरकण्याचा प्रताप केला असून स्टिल कमी वापरणे, सिमेंट कमी वापरले जात असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली. यावर ठेकेदाराने माझ्या मर्जीनुसार काम होईल तुम्ही कामावर येऊन फोटो काढले आणि कामगारांनी तुम्हाला मारले तर मी जबाबदार नाही असा दमच ठेकेदार ग्रामस्थांना देत आहे.
सतत दुष्काळाशी सामना करावा लागत असलेल्या पारनेर तालुक्यात पावसाळ्यात हंगा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जाते. हे पाणी जाग्यावर आडवून ठेवल्यास त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल. यासाठी केटिवेअर होणे गरजेचे होते. अशी मागणी गेली अनेक वर्षांपासून ग्रामस्थ करत होते. यासाठी निधी ही मिळाला मात्र हे कामच अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असून याकामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.