अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
राज्यातील किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून अहिल्यानगरचे तापमान 10 अंशाच्या खाली आहे. बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी राज्यातील नीचांकी 9.4 अंश सेल्सिअस तापमान अहिल्यानगरमध्ये नोंदले गेले आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्यात थंडीचा कडाका निर्माण झाला आहे.
गत आठवड्यात अहिल्यानगरचे तापमान 12 ते 13 अंशापर्यंत होते. शनिवारपासून तापमानात घट होत गेली. रविवार, सोमवारी तापमान 10 अंशापर्यंत खाली आहे. मंगळवारी तापमानाचा पारा 9.7 अंशावर, तर बुधवारी 9.4 अंशापर्यंत खाली आला. त्यामुळे थंडीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. भारतीय हवामानशास्त्र संकेतस्थळावर विभागाच्या अहिल्यानगरच्या तापमानाची नीचांकी तापमान म्हणून नोंद करण्यात आली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील काळामध्ये देखील थंडीचा कडाका वाढणार आहे. ईशान्येकडून येणारे थंड वारे थंडीची तीव्रता अधिक वाढवणार आहेत, असेही हवामान विभागाने म्हटले आहे. आगामी आठ दिवस आकाश निरभ्र राहून सकाळी धुके पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.