मुंबई । नगर सहयाद्री:-
राज्यात पुन्हा एकदा थंडी जाणवू लागली आहे, गेल्या आठवडाभरात राज्यातील अनेक शहरांमध्ये उष्णता, अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरण असं संमिश्र वातावरण दिसून आलं. मात्र, आता पुन्हा राज्यात गारठा वाढू लागला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे कमाल आणि किमान तापमानात पुन्हा घट होताना दिसत आहे. पुणे आणि मुंबईच्या तापमानातही मोठी घसरण झाली आहे.
उत्तर महाराष्ट्रात देखील गारठा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गारठा वाढल्यामुळे नागरिक ठिकठिकाणी शेकोट्या पेटवत आहेत, तर पुढील दहा दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रात गारठा आणखी वाढू शकतो. पुढील 5 दिवसात पुण्यात आणखी हुडहुडी भरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुण्यात आज 12 अंश तापमानाची नोंद झाली आहे. तर येत्या काही दिवसात पुण्याचे तापमान आणखी घसरून दहा अंशावर जाण्याची शक्यता आहे. मुंबईतही पुढील काही दिवसांत थंडी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
पुणे शहरात उत्तर भारतातून शीतलहरी सक्रिय होत आहेत. त्यामुळे पहाटेच्या तापमानात मोठी घट होण्यास सुरुवात झाली आहे. आजपासून (मंगळवारपासून) (दि. 10) शहराच्या किमान तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे. शहरातील किमान तापमान सोमवारी 16.4 अंशांवर होते. यात आज (मंगळवार) पासून घट होत जाईल आणि 13 डिसेंबरपासून पारा 10 अंशांखाली जाईल. अशीच थंडी पुढे 18 डिसेंबरपर्यंत सुरू राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळ मुंबईत तापमान घसरले आहे.सोमवारी मुंबईत महाबळेश्वर पेक्षाही कमी तापमानचा पारा होता. सोमवारी 13.7 अंशांवर असलेला तापमानाचा पारा आज वर चढला आहे. पण थंडीचा जोर कमी झाला नाही. पुढील 5 दिवस हे राज्यात थंडीचे असणार आहेत.आज मुंबईत किमान तापमान हे 23 अंशांपर्यंत जाईल. तर कमाल तापमान 28 अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.