Crime News: श्रीरामपुर तालुक्यातील नांदूर येथील ग्रामपंचायतच्या तळ्याजवळ नांदेड जिल्ह्यातील एका 28 वर्षीय तरुणाचा निघृण खून करून टाकण्यात आला होता. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.
राहाता तालुक्यातील नांदूर व श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत नांदूर ग्रामपंचायतच्या तळ्याजवळ असलेल्या गवतामध्ये शुक्रवारी एका इसमाचा मृतदेह आढळला. या घटनेची माहिती पोलिसांना कळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली.
पोलिसांनी त्या ठिकाणी जावून त्याची तपासणी केली असता सदर तरूणाच्या खिशात मोबाईल सापडला. त्या मोबाईलवरून त्यांनी संपर्क केला असता या तरूणाचे नाव नितेश आदिनाथ मैलारे, (रा. पाखंडीवाडी, ता. मुखेड, जिल्हा नांदेड) असे असून त्याच्या अंगावर मोठ्या प्रमाणावर जखमा आहेत.
सदर तरुणाचे वडील आदिनाथ मैलारे यांनी सांगितले की, आपल्या मुलाने डिप्लोमा केल्यानंतर वाळुंज येथे चेतक प्लास्टिक कंपनीत त्याला कामासाठी पाठवले होते. तेथे 6 महिने नोकरी केल्यानंतर तो अहिल्यानगरला दोन महिने कंपनीत नोकरीला आला.
नंतर दोन वर्षापासून शिक्रापूर, पुणे येथे नोकरीला असल्याचे त्याने आम्हाला सांगितले होते. मात्र, कोणत्या कंपनीत होता हे त्याने सांगितले नव्हते. दोन-तीन दिवसांतून तो आपल्याला व त्याच्या आईला फोन करून तसंच पाच-सहा महिन्यातून गावात येवून सात आठ दिवस राहून निघून जायचा.
परवा मयत नितेश याने त्याच्या आईला फोन केला होता व फोनवर तो म्हणाला होता की, आमच्या कंपनीमधील साहेबांसोबत मी, उद्या वैष्णवदेवीला जाणार आहे. तिकडून आल्यानंतर दसर्याला गावी येईल, मात्र, काल त्याचा मृतदेह हा नांदूरजवळील तळ्याच्या बाजूला मृत अवस्थेत आढळला.
त्याच्या डोक्यावर, चेहर्यावर ठिकठिकाणी मारहाण केल्याच्या खूना तसेच मानेवर तीन ठिकाणी टोकदार वस्तूने भोसकल्याच्या खुना आहेत. याप्रकरणी श्रीरामपूर पोलीस स्टेशनला आदिनाथ मारुती मैलारे यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध भा.दं. वि कलम बीएचएस (1) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख करत आहेत.