केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय; २०२६ पासून आयोगाच्या शिफारशी लागू होणार
8th Pay Commission: नववर्षातील अर्थसंकल्प सादर केला जाण्यापूर्वीच केंद्रातील मोदी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयाचा मोठा लाभ १.२ कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना होणार आहे.
याआधी 2016 मध्ये 7वा वेतन आयोग स्थापन करण्यात आला होता, ज्याचा कार्यकाळ 2026 मध्ये संपणार आहे. व्या वेतन आयोगाला 2026 पर्यंत अहवाल सादर करायचा आहे. त्यामुळे 2026 पासून नवीन वेतन आयोगाचा निर्णय लागू होण्याची शक्यता आहे. हा आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होऊ शकते, ते समजून घेऊया.
फिटमेंट फॅक्टरनुसार लागू होईल पगार
फिटमेंट फॅक्टर हा 7 व्या वेतन आयोगाद्वारे कर्मचाऱ्याच्या सध्याच्या मूळ पगारामध्ये वाढ करण्यासाठी लागू केला जाणारा एक आकडा आहे. फिटमेंट फॅक्टरच्या आधारावरच कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होते. समजा, 8व्या वेतन आयोगाने फिटमेंट फॅक्टर 2.28 निश्चित केला. तर अशावेळी कर्मचाऱ्यांच्या सध्याच्या पगारात 2.28 पट वाढ होईल.
समजा, पे लेव्हल 1 मध्ये जे कर्मचारी येतात, जसे की सफाई कामगार, लिपिक, सहाय्यक यांचा मूळ पगार हा 7व्या वेतन आयोगानुसार 18 हजार रुपये आहे. आता 8व्या वेतन आयोगाचे नियम लागू करताना हा मूळ पगार X फिटमेंट फॅक्टर लागू केला जाईल. म्हणजेच, 18 हजार X 2.28 = 40,944 रुपये.
अशाप्रकारे, 8व्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांचा पगार जवळपास 41 हजार रुपये असू शकतो. अशाच प्रकारची वेतन वाढ इतर पदांवरील व्यक्तींना देखील मिळेल. मात्र, 8वा वेतन आयोग किती फिटमेंट फॅक्टर लागू करणार यावर पगार ठरेल. या व्यतिरिक्त या पगारामध्ये महागाई भत्ता व इतर भत्ते समावेश केल्यास हा पगार अजूनच वाढतो. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वाहन भत्त्याचाही फायदा मिळतो. त्यामुळे त्यांच्या पगारात मोठी वाढ होते.